काही दशके त्याचे.... पाल्हाळ कशासाठी


हा जन्म कशासाठी हा काळ कशासाठी
अप्राप्य क्षितीजांचे आभाळ कशासाठी

तात्पर्य कथेचे ज्या बदले न कधी मृत्यो
काही दशके त्याचे पाल्हाळ कशासाठी

काढू सण एखादा ज्याला न 'उद्या' आहे
हे ईद दिवाळी वा नाताळ कशासाठी

पंखात बळे येता आकाश पुढे जाते
करतोस स्वतःला तू घायाळ कशासाठी

दुनियेत तुझ्या सध्या मीही जगतो आहे
बनतेस तुझ्यापुरती वेल्हाळ कशासाठी

अवतार तुझा हल्ली डरपोक मला वाटे
खांबातच लपण्याला आयाळ कशासाठी

आतून स्वतःला मी जाणून पुरा आहे
बाहेरच प्रतिमेचा सांभाळ कशासाठी

अवघड नव्हते देवा काहीच तुझ्यासाठी
दुष्काळ कशासाठी.... आबाळ कशासाठी

अपुले अपुले जगणे अपुले अपुले जाणे
देहास मनाची मग ही नाळ कशासाठी

आगीस कधी कोणी लावेल कशा आगी
कोणास विचारावे हा जाळ कशासाठी

गझल: 

प्रतिसाद

अवतार तुझा हल्ली डरपोक मला वाटे
खांबातच लपण्याला आयाळ कशासाठी     ...व्वा!

आतून स्वतःला मी जाणून पुरा आहे
बाहेरच प्रतिमेचा सांभाळ कशासाठी        ... व्व्वा!!
हे ही पहा...
ग्रहणात तुला बघुनी हसलो, मग सावरलो...
हा मान्य गुन्हा केला, मग आळ कशासाठी ?
कलोअ चूभूद्याघ्या

मला वाटले फक्त मलाच दिसत होती :-)))

जोमदार गझल आहे!
पाल्हाळ शेर अप्रतिम! आबाळ, आयाळ आणि नाळ हे शेरही आवडले.
आबाळ मधे मामुली बदल सुचवतो -
अवघड नव्हते देवा काहीच तुझ्यासाठी
हे पूर कशासाठी... दुष्काळ कशासाठी...

@फक्त मतला आवडला......जबरदस्त आहे.

हा जन्म कशासाठी हा काळ कशासाठी
अप्राप्य क्षितीजांचे आभाळ कशासाठी

धन्यवाद अजय, पुलस्ती व चांदणी!

आभाळ, सांभाळ, आयाळ हे शेर विषेश आवडले.
आबाळही छान. पुलस्तींनी सुचवलेला दुष्काळ अजुन जास्त चांगला वाटला.

अगदी आत्ताच मी भटसाहेबांची 'एल्गार' मधील पृष्ठ ८०वरील 'गीते' ही गझल वाचली.

सोडून तुझा गेलो संसार तुझ्यासाठी
माझी न हवा झाली आधार तुझ्यासाठी

हेच वृत्त व 'कशासाठी' ही रदीफ मी माझ्या गझलेत घेतली. मात्र त्यावेळेस भटसाहेबांची गझल वाचलेली असती तर मला माझी गझल जास्त चांगली रचता आली असती.

सर्व प्रतिसादकांचे आभार!

आगीस कधी कोणी लावेल कशा आगी
कोणास विचारावे हा जाळ कशासाठी
सुंदर !!

व्वा सुंदर पाल्हाळ व नाळ आवडले

प्रतिमेचा सांभाळ आणि पाल्हाळ दोन्ही शेर आवडले