भूमिका


पाठ वा़ऱ्याने फिरविली ती दिशा माझीच होती
मूक, हळवी, दीन, शापित नायिका माझीच होती

 दैव दुबळे;  शाप माझा भोगते जन्मांतरी मी
राम तो नव्हता, अहिल्येची शिळा माझीच होती

 एकही नव्हता दिवा, ना काजवा होता कुठेही
चांदणे ना चंद्र, अवसेची निशा माझीच होती

भंगले फुलताक्षणी का स्वप्न माझे मोहराचे?
वादळाने मोडलेली वाटिका माझीच होती

संशयाने गोठल्या संवेदना माझ्याच होत्या,
जाळली क्रोधाग्निने ती संहिता माझीच होती

काळजाला विंधणाऱ्या आप्तस्वकियांच्या विषारी
बोलण्यावर चालली उपजीविका माझीच होती

ज्या कथेला वाचता आले तुझ्या डोळ्यांत पाणी,
काय सांगू? ती खरी आख्यायिका माझीच होती

राख झाल्या भावना फासून पिंगा घालणाऱ्या
सावल्यांनी वेढलेली ती चिता माझीच होती

मी कधीही अढळपदि ना राहिले, उल्काच झाले,
नेहमी पडत्या फळाची भूमिका माझीच होती


गझल: 

प्रतिसाद

अनेक शेर आवडले.





( जमीन ! )

क्रान्ती,
भन्नाट..

गझल जाम आवडली...
ज्या कथेला वाचता आले तुझ्या डोळ्यांत पाणी,
काय सांगू? ती खरी आख्यायिका माझीच होती

@गझल आवडली. 
पाठ वाऱ्याने फिरविली ती दिशा माझीच होती
चांदणे ना चंद्र, अवसेची निशा माझीच होती     माझ्या दोन्ही नावाचा उल्लेख :)

मी कधीही अढळपदि ना राहिले, उल्काच झाले,
नेहमी पडत्या फळाची भूमिका माझीच होती    (सही आहे हा शेर आवडला. शेर वाचुन माझ्या एका जुन्या कवितेची आठवण झाली.)
मनापासुन शुभेच्छा..!!

क्रांती, ही स्वरयमकांची गझल चांगली  झाली आहे. उपजीविका, आख्यायिका आणि भूमिका विशेष!

क्रांती, ही स्वरयमकांची गझल चांगली  झाली आहे. उपजीविका, आख्यायिका आणि भूमिका विशेष!

सगळेच  शेर  वैशिष्ठ्यपूर्ण  आहेत.

अभिनंदन.

गझल आवडली.
दिशा, निशा अशी यमके असतांना वाटिका कसे आले? मतल्यातच  सूट घ्यावी म्हणजे इतर स्वरयमके चालतील आणि गझल अधिक निर्दोष होईल असे मला वाटले.

दिशा आणि निशा अशी यमके मतल्यात असताना नंतर वाटिका, भूमिका अशी यमके चालणार नाहीत. कृपया योग्य ते बदल करावेत. हे लक्षात न आल्याबदल क्षमस्व.

हे बदल योग्य वाटताहेत. 

छान बदल केले आहेत.

अभिनंदन!

मूक शापित दीन हळवी नायिका माझीच होती - व्वा!


ज्या कथेला वाचता आले तुझ्या डोळ्यांत पाणी,
काय सांगू? ती खरी आख्यायिका माझीच होती
मस्तच.
कलोअ चूभूद्याघ्या