वाढतो आहे पसारा कागदांचा..
=================
मी तुझ्या गावात नाही येत हल्ली
हे तुझ्या लक्षात नाही येत हल्ली..
एकदा शब्दाविना संवाद व्हावा
स्वप्न हे सत्यात नाही येत हल्ली
या जगाचा वेग इतका वाढला की,
गाय ही रस्त्यात नाही येत हल्ली
मोकळ्या दारास हे पुसतात वासे,
'का कुणीही आत नाही येत हल्ली?'
आजही ती सांगते ख्यालीखुशाली
कंप आवाजात नाही येत हल्ली !
वाढतो आहे पसारा कागदांचा..
अर्थ का शब्दात नाही येत हल्ली?
-ज्ञानेश.
=================
गझल:
प्रतिसाद
सोनाली जोशी
सोम, 13/07/2009 - 18:09
Permalink
अर्थ
वा! मक्ता अतिशय आवडला.
चांदणी लाड.
सोम, 13/07/2009 - 18:13
Permalink
@एकंदर गझल
मोकळ्या दारास हे पुसतात वासे,
'का कुणीही आत नाही येत हल्ली?'
आजही ती सांगते ख्यालीखुशाली
कंप आवाजात नाही येत हल्ली !
क्रान्ति
सोम, 13/07/2009 - 18:21
Permalink
अप्रतिम!
सगळीच गझल अप्रतिम!
क्रान्ति {रोज सकाळी असे काहि वाचावे सुंदर | अवघे जीवन भरून जावे आनंदाने!}
भूषण कटककर
सोम, 13/07/2009 - 20:38
Permalink
आणखीन एक बातमीपत्र
'गाय ही' हे दोन शब्द नसावेत बहुधा! तसे असते तर 'एक विशिष्ट गाय' हल्ली रस्त्यात येत नाही असे वाटले असते. :-)
बाकी बातम्या आहेत.
शेवटचा शेर ठीक!
हल्ली बरेच काही येत नाही असे झाले आहे असे नुकतेच समजले:-)))
( अनुल्लेख मला जमत नाही.)
चित्तरंजन भट
मंगळ, 14/07/2009 - 13:00
Permalink
मतला आणि गाय विशेष
गझल चांगली, सहज, सफाईदार झाली आहे. आवडली. मतला आणि गाय विशेष.
ज्ञानेश.
बुध, 15/07/2009 - 17:48
Permalink
आभार.
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
केदार पाटणकर
गुरु, 16/07/2009 - 13:09
Permalink
मोकळ्या
मोकळ्या दारास हे पुसतात वासे,
'का कुणीही आत नाही येत हल्ली?'
अरे वा..! अगदी खास उतरला आहे हा शेर.
.केदार पाटणकर
अजय अनंत जोशी
शुक्र, 17/07/2009 - 18:40
Permalink
मला आवडली
एकंदर आवडली. पहिली द्विपदी, गाय, वासे आवडले.
वाढतो आहे पसारा कागदांचा..
अर्थ का शब्दात नाही येत हल्ली? छान.
आणखी कुठेतरी अशाच अर्थाचे वाचल्यासारखे वाटते. आठवत नाही.
फ्लो चांगला जमला आहे. शुभेच्छा!
कलोअ चूभूद्याघ्या