...पेटारा !

...................................
...पेटारा !
...................................

चार किरणांच्या गजांचा घेतला थारा कधी मी ?
बेइमानी तुजसवे केली न अंधारा कधी मी !

मी रहस्ये घेतली जाणून साऱयांचीच सारी....
शेवटी कळणार का माझा मला सारा कधी मी ?

मी धुळीच्याही कणाला मानतो पृथ्वीप्रमाणे...
उंच आकाशातला होईन का तारा कधी मी ?

वेगळे गाणे जरी हे चारचौघांहून माझे...
सूर आहे लावलेला, सांग तू, न्यारा कधी मी ?

पाठलागाची तुला नाही दिली बिलकूल संधी...
पाहुनी दुःखा तुला केला न पोबारा कधी मी !

मी कधी दिसलो कुणाला ? लागलो हाती कुणाच्या ?
...भासलो वारा कधी मी ! ...वाटलो पारा कधी मी !

पाहिले निष्पर्ण त्या झाडाकडे मी तुच्छतेने...
व्हायचो नाही जणू अजिबात म्हातारा कधी मी !!

भेट आयुष्या तुझीही थेट होईना अताशा...
सांग, तुज भेटायला येऊ कुणाद्वारा, कधी मी ?

ज्या चिजा दिसल्या तुम्हाला, मामुली आहेत साऱया...
आणला तुमच्यापुढे सारा न पेटारा कधी मी !

- प्रदीप कुलकर्णी
...................................

गझल: 

प्रतिसाद

पाहिले निष्पर्ण त्या झाडाकडे मी तुच्छतेने...
व्हायचो नाही जणू अजिबात म्हातारा कधी मी !!अत्युत्तम!! खूप चांगली गझल!!

जबरदस्त  आहे  गझल!
मतला, पोबारा, म्हातारा  हे  तर  अगदी  उच्चतम.

ज्या चिजा दिसल्या तुम्हाला, मामुली आहेत साऱया...
(मामुली  चिजाच  अशा  असतील, तर  पेटारा  उघडल्यावर  काय  होईल  हो  आमचे!)

भन्नाट

मी रहस्ये घेतली जाणून साऱयांचीच सारी....
शेवटी कळणार का माझा मला सारा कधी मी ?

मी धुळीच्याही कणाला मानतो पृथ्वीप्रमाणे...
उंच आकाशातला होईन का तारा कधी मी ?

वेगळे गाणे जरी हे चारचौघांहून माझे...
सूर आहे लावलेला, सांग तू, न्यारा कधी मी ?

पाठलागाची तुला नाही दिली बिलकूल संधी...
पाहुनी दुःखा तुला केला न पोबारा कधी मी !

सहमत आहे...
-मानस६

म्हातारा आणि पेटारा हे शेर फार आवडले! मस्त गझल!!

सगळेच शेर एकापेक्षा एक! जबरदस्त गझल!
 
क्रान्ति {रोज सकाळी असे काहि वाचावे सुंदर | अवघे जीवन भरून जावे आनंदाने!}

दिलखुलास प्रतिसादांबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. लोभ आहेच; असाच राहू द्यावा.

निष्पर्ण झाडाचा शेर तर अप्रतिम!
सोनाली

ही एक श्रेष्ठ गझल आहे.

अभिनंदन

आपली ही गझल फार आवड्ली.

मी कधी दिसलो कुणाला ? लागलो हाती कुणाच्या ?
...भासलो वारा कधी मी ! ...वाटलो पारा कधी मी !

पाहिले निष्पर्ण त्या झाडाकडे मी तुच्छतेने...
व्हायचो नाही जणू अजिबात म्हातारा कधी मी !!    

हे शेर उत्तम आहेत.

` खलिश '-अहमदाबाद. १८-०६-२००९.

प्रदीपसाहेब,

ही गझल पुन्हा वाचल्यावर आणखीनच आवडली. सगळेच शेर उत्कृष्ट!
त्यातही धुळीच्या कणालाही पृथ्वीप्रमाणे मानणे अन पेटारा हे सर्वोत्तम शेर आहेत.

गुणगुणावेसे  वाटत आहेत अन गुणगुणतही आहे.

धन्यवाद!

शेवटचा शेर सर्वाधिक आवडला...
चुभूद्याघ्या...
***********************
वाहत्या गर्दीत माझा चेहरा पाहू नको तू
मुखवटे आहेत तेथे, त्यात हा 'नचिकेत' नाही!!

पारा,म्हातारा खूप आवडले प्रदीप!
एकंदरीत गझल छान!

नेहमीप्रमाणेच अप्रतिम गझल...
सर्वच शेर आवडले

मी कधी दिसलो कुणाला ? लागलो हाती कुणाच्या ?
...भासलो वारा कधी मी ! ...वाटलो पारा कधी मी !

वा मस्त आहे!

या अप्रतिम (ज्याना तुम्ही मामुली म्हणता) चिजा वाचुन काय लिहावे हा प्रश्न पडतो तर पेटारा उघडला तर वाचाच बंद...
नेहमीप्रमाणेच अव्वल नंबरी...
आरती