कुठलेच स्वप्न आता - डी. एन. गांगण

कुठलेच स्वप्न आता माझ्या उशास नाही
कुठलाच गंध उरला सुकल्या फुलास नाही

तो चेहरा कुणाचा मी आठवू कशाला?
कुठलीच आस आता या आरशास नाही

खुणवीत रोज होते खोटे तुझे दिलासे
फितवून मी मनाला केला प्रवास नाही

बहुतेक माणसांची चाहूल ही असावी
रानात वनचरे ही का आसपास नाही

या ऐस-पैस मोठ्या तू सावलीप्रमाणे
आलास अंगणी, पण थांबावयास नाही

 

डी. एन. गांगण

संग्रहाचे नाव - तोच रस्ता त्याच वाटा

प्रतिसाद

वावा! उत्तम गझल आहे. काहीच प्रतिसाद का नाहीत काही समजत नाही. अतिशय चांगली गझल आहे ही.

खुपच सुन्दर गझल आहे ही.....

 
कुठलेच स्वप्न आता माझ्या उशास नाही
कुठलाच गंध उरला सुकल्या फुलास नाही

तो चेहरा कुणाचा मी आठवू कशाला?
कुठलीच आस आता या आरशास नाही
या ऐस-पैस मोठ्या तू सावलीप्रमाणे
आलास अंगणी, पण थांबावयास नाही

हे ३ शेर फारच आवडले!

ह्ज़रत,
ग झ ल  छान आहे.
हे शेर फा र आवडले.
तो चेहरा कुणाचा मी आठवू कशाला?
कुठलीच आस आता या आरशास नाही
खुणवीत रोज होते खोटे तुझे दिलासे
फितवून मी मनाला केला प्रवास नाही
` ख़लिश '
" रेख़ता  रुतबेको  पहुंचाया हुआ उसका  है...
मोअतकि़द कौन नहीं  ` मीर ' की उस्तादी का ? " ......