धुळीतला ध्रुवतारा...!

..........................................
धुळीतला ध्रुवतारा...
..........................................

मी अलगद कोठे कधी झेलला गेलो ?
आदळलो, फुटलो, किती ठेचला गेलो !

मी सुखात होतो मागे, पडद्यामागे...
मी पुढे, तरीही पुढे, रेटला गेलो !

केली न कुणाच्या घरात मी घुसखोरी...
मी रस्त्यावरती कसा खेचला गेलो ?

मी आलो नाही जगात आपखुशीने...
हाणली कुणीशी लाथ; फेकला गेलो !

मी बनलो आपोआप बेट दुःखाचे...
मी आय़ुष्याने जसा वेढला गेलो !

मी म्हटले त्यांना - `जवळ जरा जाऊ द्या`
मी तुझ्यापासुनी दूर ठेवला गेलो !

केली न विनवणी कुठल्या सवंगड्याची...
मी जिकडे-तिकडे सदा एकला गेलो !

जिंकलीच मैफल, तेव्हा तेव्हा समजा...
मी जेव्हा जेव्हा कमी लेखला गेलो ! 

बहरेनच नक्की...आज, उद्या वा परवा...
मी मनात आता तुझ्या पेरला गेलो...!

होईल धन्य तेव्हाच राखरांगोळी...
जर तुझ्या अंगणी कधी रेखला गेलो !

आहेतच काही सूर मधुर जपलेले...
मी उगाच नाही पुन्हा छेडला गेलो...!

मी तिथून केला मुक्त कोंडलां वारा...
मी जिथे पहारेकरी नेमला गेलो !

ते म्हणोत मजला हलकासलका आता...
मी त्यांना कोठे कधी पेलला गेलो ? 

मी पडून आहे - धुळीतला ध्रुवतारा...
मी अजून नाही कसा वेचला गेलो ?

- प्रदीप कुलकर्णी

गझल: 

प्रतिसाद

वाव्वाव्वा! अगदी अत्युत्तम गझल. शाहकार :)  लांब पल्ल्याच्या ह्या गझलेतले जवळपास सगळेच शेर फार फार आवडले.


अफलातून, जबरदस्त........

प्रदीप,
भेटशील तेव्हा बोलू...
....योगेश
 

सगळेच शेर जबरदस्त!
क्रान्ति {रोज सकाळी असे काहि वाचावे सुंदर | अवघे जीवन भरून जावे आनंदाने!}

हे  शेर  खास  वाटले-

जिंकलीच मैफल, तेव्हा तेव्हा समजा...
मी जेव्हा जेव्हा कमी लेखला गेलो ! 

बहरेनच नक्की...आज, उद्या वा परवा...
मी मनात आता तुझ्या पेरला गेलो...!

होईल धन्य तेव्हाच राखरांगोळी...
जर तुझ्या अंगणी कधी रेखला गेलो !

आहेतच काही सूर मधुर जपलेले...
मी उगाच नाही पुन्हा छेडला गेलो...!

ते म्हणोत मजला हलकासलका आता...
मी त्यांना कोठे कधी पेलला गेलो ?
 

दिलखुलास प्रतिसादांबद्दल सगळ्यांचे  मनापासून आभार. लोभ आहेच; असाच राहू द्यावा.

व्वा प्रदीपजी काय जबरी गझल आहे. एकूण एक शेर आवडले...
दर वेळी वाचली की नविन शेर आवडतात :)

मी तिथून केला मुक्त कोंडलां वारा...
मी जिथे पहारेकरी नेमला गेलो ! - व्वा!

या तीन ओळी आवडल्या. ( माफ करा, रंग कसा बदलायचा माहीत नसल्यामुळे तोच रंग कंटिन्यु होत आहे.)

बाकी शेर साधारण आहेत. 'हाणली कुणीशी लाथ, फेकला गेलो' ही शब्दनिवड आवडली नाही.

आपल्याकडे हळुवार व ओघवती भाषा व शब्दसंचय आहे. दीर्घ अनुभव व हुकुमतही आहे. मनापासून वाटते की एक तरी गझल अशी करावीत ज्यात अजिबात 'मी' किंवा 'तू' नाही किंवा असलेच तर अत्यल्प!

मी नवा निराळा आशय
वजन एखादे नवे
एक नाते
तुझ्या हळुवार स्पर्शांनी
वादळ
पेटारा

या व्यतिरिक्तही अनेक गझलांमधे प्रामुख्याने स्वतःचे वर्णन वा दुसर्‍याबाबत नाराजी / टीका असे आहे. हे माझे मत विचारात घ्यावेत / मला दुरुस्त करावेत अशी विनंती! ( अर्थात, हे वैयक्तिक मत म्हणून सोडूनही देता येईल.) पण तोचतोपणाची जाणीव होते.( गझलेत 'मी' येणारच हे मला माहीत आहे. पण सर्वांना लागू होतो असे वाटणारा 'मी' न येता 'एक विशिष्ट मी' येत आहे असे वाटते. विशिष्ट संदेश देणारे काव्य माझ्यामते तौलनिकदृष्ट्या अल्पायुषी असावे. )

शेरातील विचार दीर्घायुषी होण्यासाठी ते 'स्पेसिफिक' ऐवजी 'जनरल' स्वरुपाचे ( निदान काही प्रमाणात ) असावेत असे माझे सध्या मत बनले आहे. मीही सतत बदलत असल्याने माझ्या या मतावर आपल्याकडून किंवा चित्तरंजन / अनंत यांच्यापैकी कुणाकडून काही सांगीतले जावे अशी इच्छा आहे.

धन्यवाद!


संपुर्ण गजल अतिशय सुन्दर आहे. तरिही सर्वात जस्त आवड्लेले शेर ,



जिंकलीच मैफल, तेव्हा तेव्हा समजा...
मी जेव्हा जेव्हा कमी लेखला गेलो !


मी बनलो आपोआप बेट दुःखाचे...
मी आय़ुष्याने जसा वेढला गेलो !

मर्मावर बोट टेवणे तुम्हाला बरोबर जमते. वरील दोन शेर म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील
व्यथा मांडत आहेत. खरोखरिच उत्तम.

बेट आणि वारा हे शेर फार आवडले!!

हा प्रतिसाद थोडा विसंगत वाटेल, त्यासाठी माफ करा. पण मनोगत नावाच्या संकेतस्थळावर प्रदीप यांनी नुकतीच दिलेली साहसे ही गझल वाचली. त्यात माझ्या 'या रचनेवरील' आधीच्या प्रतिसादातील अपेक्षा नेमक्या पुर्ण झाल्या, म्हणून हा प्रतिसाद!


जिंकलीच मैफल, तेव्हा तेव्हा समजा...
मी जेव्हा जेव्हा कमी लेखला गेलो ! 

बहरेनच नक्की...आज, उद्या वा परवा...
मी मनात आता तुझ्या पेरला गेलो...!
फार आवडले...
विशेषतः आज, उद्या वा परवा हे कसं सहज, आणि वृत्तातही जमून गेलंय... वा...
चुभूद्याघ्या...
***********************
वाहत्या गर्दीत माझा चेहरा पाहू नको तू
मुखवटे आहेत तेथे, त्यात हा 'नचिकेत' नाही!!

संपुर्ण गझल आवडली.

बहरेनच नक्की...आज, उद्या वा परवा...
मी मनात आता तुझ्या पेरला गेलो...!

आहेतच काही सूर मधुर जपलेले...
मी उगाच नाही पुन्हा छेडला गेलो...!

ते म्हणोत मजला हलकासलका आता...
मी त्यांना कोठे कधी पेलला गेलो ?
हे शेर कमाल आहेत, फारच आवडले.

मी सुखात होतो मागे, पडद्यामागे...
मी पुढे, तरीही पुढे, रेटला गेलो !

वा मस्त आहे!

मी बनलो आपोआप बेट दुःखाचे...
मी आय़ुष्याने जसा वेढला गेलो !


सर्वात जास्त आवडला!

बहरेनच नक्की...आज, उद्या वा परवा...
मी मनात आता तुझ्या पेरला गेलो...!

खुप सुन्दर...