लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी

नमस्कार.

२००५ सालच्या मुंबई फेस्टिव्हल साठी ६३ मुलांना घेऊन मी मंगेश पाडगांवकरांनी लिहिलेली “तुझा सूर्य उगवे आम्ही प्रकाशात न्हातो” ही प्रार्थना सादर केली. याच प्रार्थनेने या सोहळ्याचा प्रारंभ झाला. ही आनंदाची गोष्ट आहे. दुःखाची बाब अशी की पुढच्या ३ तासांच्या सोहळ्यामध्ये नाना पाटेकर यांनी केलेले उत्स्फूर्त भाषण सोडले, तर मराठीचे एकही अक्षर उच्चारले गेले नाही.

ही वस्तुस्थिती आज आपल्याला सर्वत्र पाहावयास मिळते. महाराष्ट्रात मुंबई आहे पण मुंबईत महाराष्ट्र कुठे दिसत नाही. मुंबईच्या एकाही व्यावसायिक रेडियो वाहिनीवर एकही मराठी गाणं लागत नाही. आपल्या मातृभाषेत आपल्याला भाजीपाला विकत घेता येत नाही, आपल्या मातृभाषेत एका जागेवरून दुस-या जागी जाता येत नाही.  आपल्याच राजधानीत मराठीला दुय्यम स्थान मिळतं ही खेदाची गोष्ट आहे.

प्रश्न फक्त मुंबईचाही नाही. मराठी लोकांमध्ये मराठीच्या बाबतीत एक औदासिन्य आहे की काय अशी शंका येत राहते. चळवळीच्या नावाखाली काही हिंसक घडामोडी, जाळपोळ आणि भयंकर अस्थिर वातावरण एवढंच मराठीच्या वाट्याला येतं. तुमच्या आमच्यासारखी माणसं या तथाकथित चळवळींचा हिस्सा होत नाहीत आणि याची कारणं स्पष्ट आहेत. पण म्हणून मराठीची अवहेलना होण्याचं थांबत नाही.

मला प्रामाणिकपणे वाटतं की एक चळवळ जनसामान्यांमधूनच जन्मली पाहिजे. मराठीसाठी आपण मराठी भाषिकांनी एकत्र यायची आज जितकी गरज आहे तितकी यापूर्वी कधीच नव्हती. अमराठी लोकांनी मराठीचा आदर बाळगण्याचा आग्रह धरण्याआधी मराठी लोकांमध्ये मराठीचा अभिमान रुजवायची गरज अधिक आहे.

मराठीला एका अभिमानगीताची गरज आहे.
लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

सुरेश भटांच्या या शब्दांना मी संगीत दिलं आहे. हे गीत प्रचंड मोठ्या प्रमाणात, म्हणजे ३०० गायक आणि १०० वादक यांच्या ताफ्यात ध्वनिमुद्रित करण्याचा माझा मानस आहे. मराठीतल्या सर्व गायक – वादकांचा यात सहभाग असावा अशी माझी इच्छा आहे.

या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाला लागणारा खर्च खरं तर सहज एका प्रायोजकाकडून उपलब्ध होईल. पण तसं केलं तर ते एक व्यावसायिक ‘प्रॉडक्ट’ होईल जो मुळात या मागचा हेतू नाही. ही एक चळवळ आहे आणि त्याचं उगमस्थान जनसामान्यांतच असावं. दोन हजार लोकांनी ५०० रुपये दिले तर या ध्वनिमुद्रणाचा खर्च निघू शकेल.

यात तुमचा सहभाग असला तर मला आनंद होईल. हे काही नेहमीचं मदतीचं आवाहन नाही. हे आमंत्रण आहे – मराठीच्या चळवळीत तुम्ही सहभागी होण्याचं.

आपला,

कौशल श्रीकृष्ण इनामदार.

हे गीत प्रत्येक मराठी घरात ऐकले जावे आणि प्रत्येक मराठी कार्यक्रमात गायले अथवा वाजवले जावे या उद्देशाने सहभागी होणा-या प्रत्येक व्यक्तीला एक ध्वनिमुद्रिका आणि त्यासोबत माहितीपुस्तिका विनामूल्य घरपोच केली जाईल. हा आपण  सर्वांनी साकारलेला प्रकल्प असल्याने माहितीपुस्तिकेत आपलं नाव असेलच पण त्याच बरोबर मराठीबद्दल उपयुक्त माहितही असेल. ही मराठी अभिमानगीताची सीडी १ मे २००९ रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून प्रकाशित करण्याचा माझा प्रयत्न आहे.

धनादेश 'मराठी अस्मिता' ( Marathi Asmita) या नावाने काढून

मराठी अस्मिता, द्वारा कौशल श्रीकृष्ण इनामदार
१०२, त्रिवेणी, शुचिधाम, फिल्म सिटी मार्ग
दिंडोशी बस आगाराजवळ
गोरेगांव (पू)
मुंबई—४०० ०६३, महाराष्ट्र, भारत

 या पत्त्यावर पाठवावेत. कृपया धनादेशासोबत आपलं नांव, पत्ता, दूरध्वनी क्र., आणि ई-मेल ही माहिती पाठवावी.

सुरेश भटांची मला आवडलेली रचना: 

प्रतिसाद

आपल्याबद्दल ऐकून होतोच. आपल्या या संकल्पनेला माझा पूर्ण पाठिंबा आहे. माझ्यापरीने इतरांनाही यात सहभागी करण्यासाठी मी निश्चितच प्रयत्न करीन. तरी या आर्थिक गोष्टी असल्याने प्रत्यक्ष संपर्क झाल्यास निश्चितच चांगले. आपल्या उपक्रमास शुभेच्छा!

अजय अनंत जोशी, पुणे
९९२३८२०८४२

कलोअ चूभूद्याघ्या

स्पृहणीय..उत्तम..संकल्पना.. ह्या आवाहनाला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त प्रसिद्धी
मिळण्यासाठी असे सुचवावेसे  वाटते..
१) सर्व मराठी संकेत-स्थळांवर हे आवाहन प्रसिद्ध करणे
२)ह्या आवाहनाच्या साध्या कागदावर छायांकित प्रती काढून महाविद्यालये, शाळा, रेल्वे-फलाट, आणि इतरही योग्य वाटतील त्या ठिकाणी लावाव्यात
३) मराठी अस्मिता वाहिनी वर हे निवेदन प्रसिद्धीस द्यावे
४)मराठी वर्तमानपत्रात द्यावे(त्यांनी हे विनामूल्य प्रसिद्ध करायला हरकत नाही)
५)परदेशातील महाराष्ट्र मंडळात द्यावे

 पुढील आठवड्यात यथाशक्ती धनादेश पाठवितोय
-मानस६

शुभश्च शीघ्रम......या शिवय आणखी  काही  सं़़़।गवेसे वाट्त नाही वरिल प्रतिसदामधे lihilyapramane kelyas baki kaahich urat naahi ......tyamule amhisuddha hya goshti vaastavat kadhi utartil yachich vaat baghtoy.....
ya sankalpanela manapasun shubheccha

मला काही प्रश्न आहेत.[ ह्या विषयावरील आपले प्रश्न ह्यापुढे व्यक्तिगत निरोपातून विचारावेत, ही विनंती. विश्वस्त]
 
सहमत

अजय अनंत जोशी, मानस६, महेश गोरे

आपले मनापासून आभार. आपल्या प्रतिक्रियांनी बळ दुप्पट झालं आहे. आपल्या सक्रीय सहयोगाची मला गरज आहे.

कौशल श्रीकृष्ण इनामदार

इनामदारांचे  आवाहन, त्यावरील  आक्षेप  आदी  वाचले.
माझ्या  मते- "एक  मराठी  माणूस, एका थोर  मराठी  कवी ची (ज्याचे  आपण  चाहते  आहोत!) एक  उत्तुंग  रचना  स्वरबद्ध  करू  पाहतोय, तेही  कुण्या  धनाढ्याचे  प्रायोजकत्व  न घेता केवळ  मराठी  माणसाच्या  दातृत्वावर  विसंबून..." 
..एवढी  एकच  गोष्ट  मदतीचा  हात  पुढे  करण्यासाठी  पुरेशी  आहे.
@इनामदार  साहेब- माझा  खारीचा  वाटा  उचलतो आहे. धनादेश  लवकरच पोचता  करतो.
(आणि  तुमची  परवानगी  असेल तर  काही  समविचारी  साईट्सवर  या  प्रकल्पाच्या  मदतीसाठी  आवाहन  करतो.. अर्थात, तुम्ही  परवानगी  दिलीत, तरच.)
तुमच्या  धडपडीला सुयश  चिंतीतो.
  एक  विनंती  आहे-
१ मे पर्यंत या  प्रकल्पाच्या  उत्तरोत्तर  होणा-या  प्रगतीविषयी  या धाग्यावर  माहिती  दिलीत, तर  बरे  होईल.  

प्रिय ज्ञानेश आपलं म्हणणं रास्त आहे. www.marathiasmita.org या संकेतस्थळावर वेळोवेळी या प्रकल्पाबद्दल माहिती दिली जाईल तसंच Facebookवर मराठी अस्मिता या कट्ट्यावरही या चळवळीची माहिती मी वेळोवेळी पुरवत राहणार आहे.
फेसबुकवर मराठी अस्मिता.
आपल्या आस्थेबद्दल ऋणी.

कौशल श्रीकृष्ण इनामदार

२००५ सालच्या मुंबई फेस्टिव्हल साठी ६३ मुलांना घेऊन मी मंगेश पाडगांवकरांनी लिहिलेली “तुझा सूर्य उगवे आम्ही प्रकाशात न्हातो” ही प्रार्थना सादर केली. याच प्रार्थनेने या सोहळ्याचा प्रारंभ झाला. ही आनंदाची गोष्ट आहे. दुःखाची बाब अशी की पुढच्या ३ तासांच्या सोहळ्यामध्ये नाना पाटेकर यांनी केलेले उत्स्फूर्त भाषण सोडले, तर मराठीचे एकही अक्षर उच्चारले गेले नाही.
माननीय कौशल इनामदार,
आजही हीच स्थिती आहे असे खेदाने म्हणावे लागते आहे. माझी आपणांस मनापासून विनंती आहे की, फिल्म फेस्टिवलला मराठी रंग देऊ शकाल काय? तोंडाला रंग फासून येणार्‍या मराठी लोकांना याची जाणीव करून द्याल काय? यांची जबाबदारी कोण घेणार? लोकांच्या गळ्यातला ताईत बनणारी मराठी चंदेरी दुनियाच प्रथम बदलायला हवी.
आम्ही (विशेषकरून मी) या प्रकल्पात जरूर सहभाग घेऊ. पण या चंदेरी दुनियावाल्यांना कोण समजाविणार?

चळवळीच्या नावाखाली काही हिंसक घडामोडी, जाळपोळ आणि भयंकर अस्थिर वातावरण एवढंच मराठीच्या वाट्याला येतं. तुमच्या आमच्यासारखी माणसं या तथाकथित चळवळींचा हिस्सा होत नाहीत आणि याची कारणं स्पष्ट आहेत. पण म्हणून मराठीची अवहेलना होण्याचं थांबत नाही.
त्यात या गाण्याची भर पडू नये यात विशेष लक्ष घालावे लागेल.
वेगवेगळ्या लोकांनी मांडलेले प्रश्न-उत्तरे-मते वाचली. प्रश्न हा नाही की या प्रकल्पातून काय उभे राहील, प्रश्न हा आहे की मराठी जोपासनेसाठी काय करावे?
एक गाणे जर बदल घडवू शकत असेल तर मी पूर्णपणे कोणत्याही अटीशिवाय या प्रकल्पात सहभागी होईन.
 गाणे बनले-प्रसिद्ध झाले-गायक वादकांची तारीफ झाली-यासाठी मदत करणार्‍यांची नावे प्रसिद्ध झाली-प्रत्येक मराठी कार्यक्रमात हे गाणे वाजविण्याची प्रतिज्ञा घेतली गेली-वगैरे सर्व झाले. पण नन्तर हवा तो अपेक्षित परीणाम झालाच नाही तर..? या संबंधी कौशलजी आपण विचार केला आहे काय?
तसेच, याचा अपेक्षित परीणाम होऊन मराठीच्या चळवळीला बळकटी आली तर आत्ता नाही-नाही म्हणणार्‍यांनी उगाच नंतर बोलू नये.
मी दोनही बाजूनी विचार केला म्हणून सांगितला.
व्यावहारीकतेतून सांगतो : मराठीपणाचा विचार हा मराठी माणसाचा कच्चा दुवा (सॉफ्ट कॉर्नर) आहे, तसेच सुरेश भट हा या संकेतस्थळावर लिहिणार्‍यांचा कच्चा दुवा आहे. भटसाहेबांचे नाव निघाले कि आम्ही तिथे आलोच. या सर्व गोष्टीतून प्रत्येकाने विचार करावा.
मा. कौशलजी,

मला हे जाणून घ्यायचे आहे की आपण सर्वजण (माझ्यासहित) मराठी चळवळीसाठी हे गाणे करीत आहोत. त्यात ३०० गायक आणि १०० वादक म्हणजे ४०० लोक असणार आहेत. हे सर्वजण या चळवळीचा भाग मनापासून असणार आहेत काय? म्हणजे विना मोबदला आपल्या मराठी मातेसाठी हे सर्वजण सहभागी होणार आहेत काय? जर तसे असेल आणि तसेच घडले तर माझे आपल्याला मनापासून वंदन.  (पण हे घडणार नसेल तर हा फक्त एक कार्यक्रम होऊन राहील.) आपण जरा हे स्पष्ट करावेत अशी माझी विनंती आहे. त्याने बर्‍याच लोकांच्या मनातील प्रश्न सुटतील.

प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी माझा सदैव पाठिंबाच असतो आणि राहणारच.
आपला,
अजय अनंत जोशी, पुणे.

कलोअ चूभूद्याघ्या

प्रिय अनंत जोशी साहेब,

आजही हीच स्थिती आहे असे खेदाने म्हणावे लागते आहे. माझी आपणांस मनापासून विनंती आहे की, फिल्म फेस्टिवलला मराठी रंग देऊ शकाल काय? तोंडाला रंग फासून येणार्‍या मराठी लोकांना याची जाणीव करून द्याल काय? यांची जबाबदारी कोण घेणार? लोकांच्या गळ्यातला ताईत बनणारी मराठी चंदेरी दुनियाच प्रथम बदलायला हवी.
आम्ही (विशेषकरून मी) या प्रकल्पात जरूर सहभाग घेऊ. पण या चंदेरी दुनियावाल्यांना कोण समजाविणार?

जोशीसाहेब, फिल्म फेस्टिवलला मराठी रंग द्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं हे मला कळलेलं नाही. एक गोष्ट स्पष्ट करतो. मी एक संगीतकार आहे म्हणून मला या अभिमानगीताची संकल्पना सुचली. प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात हाच विचार पुढे न्यावा अशी अपेक्षा आहे. गाणं हे उत्तम प्रेरणास्थान होऊ शकतं असं मला वाटतं.

त्यात या गाण्याची भर पडू नये यात विशेष लक्ष घालावे लागेल.
पुन्हा एकदा आपलं म्हणणं लक्षात आलं नाही. हे गाणं या तथाकथित चळवळींना पर्याय आहे म्हणूनच याचं प्रयोजन. गाणं हा एक आपल्या भाषेचा अभिमान जागृत करण्याचा अहिंसक मार्ग आहे. या प्रकल्पात सर्वांना सहभागी होता येईल असं माझ्या लक्षात आलं म्हणूनच मी ही कल्पना पुढे नेली आणि त्याला अपेक्षित असा प्रतिसादही मिळतोय.

एक गाणे जर बदल घडवू शकत असेल तर मी पूर्णपणे कोणत्याही अटीशिवाय या प्रकल्पात सहभागी होईन.
तुमच्या या एका वाक्यातच तुम्ही "अटीशिवाय" असंही म्हटलं आहे आणि "गाणं बदल घडवू शकत असेल तर" अशी अटही ठेवलीय! जोशीसाहेब, मला ठाऊक नाही हे गाणं नेमकं काय साधेल, पण हे गाणं तयार होणं हीच एक मोठी उपलब्धी असेल कारण यामुळे किमान २५०० लोक एकत्र येतील.

पण नन्तर हवा तो अपेक्षित परीणाम झालाच नाही तर..? या संबंधी कौशलजी आपण विचार केला आहे काय?
हो साहेब, मी या बद्दल विचार केला आहे. पण अपेक्षित परिणाम ही भविष्यवाणी झाली. मी काही ज्योतिषी नाही. मला एकच गोष्ट ठाऊक आहे की हे काम अतिशय प्रामाणिकपणे करत आहे. आज ना उद्या या कामाची दखल घेतली जाईल यात मला शंका नाही.

मला हे जाणून घ्यायचे आहे की आपण सर्वजण (माझ्यासहित) मराठी चळवळीसाठी हे गाणे करीत आहोत. त्यात ३०० गायक आणि १०० वादक म्हणजे ४०० लोक असणार आहेत. हे सर्वजण या चळवळीचा भाग मनापासून असणार आहेत काय? म्हणजे विना मोबदला आपल्या मराठी मातेसाठी हे सर्वजण सहभागी होणार आहेत काय? जर तसे असेल आणि तसेच घडले तर माझे आपल्याला मनापासून वंदन.  (पण हे घडणार नसेल तर हा फक्त एक कार्यक्रम होऊन राहील.) आपण जरा हे स्पष्ट करावेत अशी माझी विनंती आहे. त्याने बर्‍याच लोकांच्या मनातील प्रश्न सुटतील.

जोशी साहेब. हे गाणं मी करतोय आणि मी त्याचे पैसे घेत नाहीच आहे पण आपल्या खिशातून खर्चही मी या गाण्यासाठी केला आहे आणि करणार आहे. सगळ्यांनी हे काम फुकट केलं तर खर्च कशाला झाला असता? या प्रकल्पातली जवळपास सगळी गायक मंडळी विनामूल्य गात आहेत, पण सगळ्या वादकांना आणि तंत्रज्ञांना त्यांचे पूर्ण पैसे मिळावेत अशी माझी अपेक्षा आहे. या कलाकारांचं पोट त्यांच्या हातावर आहे. मी हे आपल्यापुढे स्पष्टपणे मांडत आहे. आपल्याला हे पटलं नसल्यास आपण या प्रकल्पात सहभागी नाही झालात तरी चालेल. यात महत्त्वाचा भाग आहे की गाणं होतय. आणि आपल्याला मी मदत मागत नाहीये आपला सहभाग मागतो आहे, हे कृपया लक्षात घ्या. या सहभागाबद्दल आपल्याला ही सीडी आणि त्याबरोबर एक माहितीपुस्तिका मी विनामूल्य घरपोच करणार आहे, याची ही नोंद घ्यावी. हा सहभाग कुठल्याही प्रकारचं दान किंवा मदत नाही हे मी स्पष्ट करू इच्छितो. आणि यात सहभागही ऐच्छिक आहे.

[आयई ६ वर काही अडचणी येत असल्यामुळे हा प्रतिसाद पुन्हा फॉर्म्याट केलेला आहे. विश्वस्त]

कविवर्य सुरेश भट आणि मराठी गझल ह्यांना समर्पित हे संकेतस्थळ आहे.  हा लेख आमंत्रण / आवाहन स्वरूपाचा आहे आणि अवांतर व अस्थानी वाटणारे प्रतिसाद काढून टाकण्यात आले आहेत. सदस्यांनी सहकार्य करावे.

विश्वस्त महोदय,
कौशलजींच्या प्रकल्पातील अनेक गोष्टी मी समजून घेतल्या आहेत. त्याप्रमाणे पॉझिटीव्हली कामही सुरू आहे. तरीही मला काही वाटते ते मी लिहिले आहे.

खरेतर या गोष्टीला बरेच दिवस झाले आहेत. तरी सांगावेसे वाटते म्हणून सांगतो आहे. आपण अवांतर आणि अस्थानी वाटणारे प्रतिसाद काढलेत ते ठीक. पण ते खरोखरच अवांतर होते का? आर्थिक आवाहन केल्यावर काही विचारूच नये का?
श्री कौशल इनामदार यांनी केलेल्या आर्थिक आवाहनासाठी विचारलेले प्रश्न किंवा सांगितलेली मते होती. जसे-
मुंबईत महाराष्ट्र आहे किंवा नाही - हा मुंबईवासियांसाठीचा त्यांनीच निर्माण केलेला प्रश्न आहे.
मराठी भाषेला अभिमानगीताची गरज आहे - हे विधान सापेक्ष आहे.
अशाप्रकारचे जे मुद्दे वरील आवाहन करताना मांडले गेले त्यावर या संकेतस्थळावरील काही गझलकारांनी आपापली मते दिली. त्यावर कौशलजींचे उत्तरही आपण प्रकाशित केले होते.
प्रतिसाद काही प्रमाणात संपादित करता येण्यासारखे होते असे मला वाटते. पण ज्या गझलकारांचे प्रतिसाद काढले आहेत ते आता या संकेतस्थळावर दिसत नाहीत ही खेदाची बाब आहे.
उभरत्या गझलकारांनी अशा गोष्टींसाठी इतके टोकाला जाऊ नये असे वाटते. तसेच विश्वस्तांनीदेखिल किमान एकदातरी निरोपातून त्यांना सावध करावे. अपेक्षित बदल न झाल्यास योग्य तो निर्णय घ्यावा असे वाटते. अर्थात विश्वस्तांचा उपलब्ध वेळ आणि या सर्व गोष्टी जुळूनही यायला हव्यात.
मला निश्चित असे वाटते की या गझलकारांनी परत यावे. विश्वस्तांनीही पुन्हा एकदा विचार करावा अशी माझी विनंती आहे.
कलोअ चूभूद्याघ्या

कौशल सर,
कधी कधी असं होत कि एखादी गोष्ट करावी असे नेहमी वाटत असते, पण ती नेहमी इछाच राहुन जाते. आपल्या प्रिय मराठी भाषेसाठी काही तरी केले पाहिजे.. पण यासाठीचा ध्यास कमी पडल्यामुळे ती इछा तशीच अध्रुरी राहून जाते. त्या इछेची पुर्तता करण्यासाठी आपल्या ह्या उपक्रमास मी फक्त आर्थिकच नव्हे तर इतर कुठल्याही प्रकारचा सहभाग घेण्यासाठी मी इछुक आहे.
३०० गायक आणि १०० वादक ही कल्पना माझ्यासाठी खुप मोठी आहे, तरी आपली संमती आणि माझी पात्रता योग्य असल्यास मला ह्या ३०० गायक समुहातील एक होण्यास मी इछुक आहे.
मला ही संधी मिळो वा ना मिळो पण माझ्याकडुन सर्वाना हार्दिक शुभेछा...
ह्या उपक्रमाबद्दल म्हणावे तितके इतराना माहित आहे असे दिसत नाही. आम्ही गुढीपाडव्याच्या निमित्ताने ह्या संकल्पनेची जास्तीत जास्त प्रसिद्धी आणि सहभागाचे आवाहन करण्याच प्रयत्न्न करेन.

आपल्या प्रतिसादाची आतुरतेने वाट पाहतोय..
 
हर्षद शाम सुरणकर
पुणे-मुंबई
९८२३२३६३०३
 
उप्क्रम स्तुत्य आहे. 

या चळ्वळीत माझा सम्पुर्ण सहभाग आहे.

साहेब,
आपुला विचार ख्ररेच उत्तम आहे! माझ्या मनात आणि स्वप्नात असलेल ध्येयच पुर्णत्वास आल्यसारखे वाटत आहे. अजुनही माय मर्‍हाटिची लेकुरे जिवन्त आहेत तर!!!
येथे येवुन एकटेपणाची भावना नाहिशी झाली.
असो, या गिताकरिता मलाही योगदान द्यायला आवडेल. पण सध्यातरी मला  धनादेश काडणे शक्य नाही. तरी  क्रुपया दुसरा मार्ग सुचवा (जसे की तुमच्या खात्यामधे जमा करणे).
आपल्या उत्तराच्या प्रति़क्शेत,
स्वप्निल,
जय माय मराठी !!!

प्रथम आपणास  आणि आपल्या स्नकल्पनेस मानाचा मजरा!!!!
येथे येवुन सन्स्क्रुतिक एकटेपणाची भावना नाहीशी झाली. बर्‍याच काळा पासुन मनात पिन्गा घालत असलेल स्वप्न पुर्ण होइल असे वाटते.
माझेही या चळवळीत योगदान असावे असे वाटते. पण धनादेश काड्णे शक्य होणार नाही. क्रुपया एखादा परर‍याय सुचवा.(जसे कि तुमच्या खात्यात जमा करणे).
मला ही सन्धि गमावयाची नाहीय!
आपल्या प्रतिसादाच्या प्रति़क्शेत
स्वप्निल
जय माय मराठी
 
तुमची जेवढी स्तुती करावी तेवढी कमी आहे.
माझा प्रश्ना फक़त एवदाच की तुम्हाला २००० लोकाणी पैसे दीलेच असतील,कारण तुमचा उपक्रमा खर्च खूप चांगला आहे.मला वाटत मी ४००० च्या रांगेत येणार,तर मला तुम्ही सांगितल्या प्रमाणे सीडी आणि ती माहिती पुस्तिका मिळणार का?
आणि तुम्हाला ऑनलाइन पैसे देता येणार का?जर ही सुविधा असेल तर फार बर होईल.

अजुन एकदा तुमचे हार्दिक अभिनंदन या उपक्रमासाठी.

गाणे झाले. सर्वांनी ऐकले. स्टेजवर पाहिले. टाळ्या वाजवल्या. पुढे काय?
"हे मराठी अभिमानगीत आहे. हे कॉलरट्यून म्हणून सेट करा." मला असा रोज एस.एम.एस.येत आहे. हे अभिमान गीत आहे हे लोकांना वाटले पाहिजे ना? जबरदस्ती कशाला...?
टीप : या गाण्यात नाविन्यपूर्ण काय आहे हा संशोधनाचा विषय आहे...:)

प्रिय अजयजी,

आपण म्हणता गाणे झाले. सर्वांनी ऐकले. स्टेजवर पाहिले. टाळ्या वाजवल्या. पुढे काय?

याचं आधी आपल्याला उत्तर देतो. आपण जे दोन-दोन शब्द वापरले आहेत, त्या प्रत्येक दोन शब्दांमागे माझे आणि माझ्या सहकार्‍यांचे अपार कष्ट आहेत. तुम्ही म्हणता ‘गाणे झाले’. आमच्यासाठी अजयसाहेब हे दोन शब्द म्हणजे दीड वर्षांचा कालावधी होता. अपार कष्ट, मेहनत आणि जबस्दस्त इच्छाशक्तीच्या बळावर झालेलं हे कदाचित जगातलं सर्वात भव्य गीत आहे. या आधी जगात असा दाखला नाही की ११२ प्रस्थापित कलाकार एकत्र आले आंणि त्यांनी एका गीतात आपला सहभाग नोंदवला. ३५६ लोकांचं समूहगान हे अख्ख्या भारतामध्ये याआधी कधीही ध्वनिमुद्रित केलं नव्हतं. आज एव्ही मॅक्स या मासिकाने एक "जागतिक दर्जाचं ध्वनिमुद्रण" म्हणून या गीताला मान्यता दिली आहे. या गाण्यामुळे प्रथमच ५००हून अधिक कलाकार एकत्र आले आहेत आणि हे मराठीत होतंय. ही तुमच्यासाठी "नाविन्यपूर्ण" गोष्ट नसेल कदाचित... माझ्यासाठी आहे!

टाळ्या वाजवल्या. या दोन शब्दांचं मोल कदाचित तुम्हाला कळणार नाही अजयजी! या गाण्याच्या प्रकाशन समारंभाला तब्बल ८००० लोक उपस्थित होते. यापूर्वी कुठल्याही ध्वनिमुद्रिकेच्या प्रकाशनासाठी इतका मोठा जनसमुदाय महाराष्ट्रात एकत्र आल्याचं निदान मला तरी आठवत नाही. कार्यक्रमाच्या शेवटी जेव्हा शंभरहून अधिक कलाकारांनी हे गीत गायलं तेव्हां १६००० ओले डोळे आपल्यावर रोखले असणं म्हणजे काय, हा अनुभव या शंभर कलाकारांसाठी काय होता हे तुम्ही त्यांनाच विचारा. हे गाणं संपल्यावर १० सेकंद नीरव शांतता पसरली आणि ८००० लोकांचा जनसमुदाय उत्स्फूर्तपणे उठून उभा राहिला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. ह्या टाळ्या फुकट आल्या नाहीत जोशीसाहेब! यासाठी अश्रु, घाम, आणि आयुष्यातलं दीड वर्ष केवळ आणि केवळ आपल्या मातृभाषेसाठी देणारे अनेक माझे सहकारी होते.

पुढे काय? जोशीसाहेब, तुम्ही रेडियो ऐकता का? पुण्याच्या रेडियो मिर्चीचं धोरण होतं की नवीन मराठी गाणी आपल्या वाहिनीवर लावायची नाहीत. या गाण्यापासून त्यांनी हे आपलं धोरण बदललं. मुंबईमध्ये तर अजिबात मराठी गाणी लागत नसत. या गीतापासून बिग एफ.एम. या वाहिनीने मराठी गाणी नियमितपणे लावायला सुरुवात केली. ह्या गाण्यामुळेच व्होडाफोन कंपनी ज्यांचं मराठीत बोलाणार नाही असं धोरण होतं, त्यांना ते बदलावं लागलं. अशा अनेक गोष्टी सांगता येतील. अमेरिकेतून मला अनेक फोन आणि ई-मेल आले की अमेरिकेत जन्माला आलेली मराठी कुळातली मुलं आनंदाने हे गाणं ऐकताहेत, गाताहेत. महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या एका तमिळ मुलीने या गीताबद्दल आपल्या ब्लॉगवर लिहितांना म्हटलंय की हे गीत ऐकल्यावर मला मी महाराष्ट्रीय असल्याचा अभिमान तर वाढलाच, पण कौशल आणि त्याच्या सहकार्‍यांची आपल्या मातृभाषेबद्दल असलेली तळमळ पाहून माझ्या मातृभाषेशी पुन्हा एकदा नाळ जुळली.
नाविन्यपूर्ण काय? संगीत म्हणून हे दर्जेदार आणि उत्तम आहे असं पं. सुरेश तळवलकर, अश्विनी भिडे-देशपांडे, आरती अंकलीकर-टिकेकर, हरिहरन, शंकर महादेवन, पद्मभूषण श्रीनिवास खळे (ज्यांनी गाणं ऐकून माझ्या खिशात पाचशे रुपयाची नोट जबरदस्ती कोंबली) आणि इतर अनेक लोक म्हणालेत. अमिताभ बच्चन यांनाही या गाण्याची मोहिनी पडलीच ना! मला एकदा खुद्द पु.ल.देशपांडे म्हणाले होते, "कौशल, तू चांगलं करत रहा, नवीन आपोआप घडेल!" मी त्यांच्या सल्ल्याप्रमाणे जातोय, जोशीसाहेब!
जबरस्ती कशाला? जोशीसाहेब आपण लोकशाहीत राहतो. तुमची मोबाईल सेवा त्यांच्या पद्धतीने या गाण्याचा प्रसार करतेय! कोणाचीही जबरदस्ती नाही की तुम्ही हे गीत कॉलरट्यून म्हणून लावावं! अनेक अशा जाहिराती तुम्ही पचवताच की एरवी. आणि तुमच्या माहितीसाठी मोबाईल कंपन्यांना आदेश दिला की असे जाहिरात करणारे एस.एम.एस. बंद करा तर ते ऐकतात की तुमचं! जबरदस्तीचा प्रयत्न येतोच कुठे!!

शेवटी जोशीसाहेब, तुमच्याच शैलीत मी तुम्हाला देखिल विचारू शकतो - "टीका केलीत, टिंगलही केलीत. पुढे काय?" पण मी तसं करणार नाही. तुम्ही या गाण्याचा हिस्सा आहात आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. मी आधीही म्हटलं होतं (तुम्ही सहभाग नोंदवायच्याही आधी) की या गाण्यामुळे काय फरक पडेल मला नाही सांगता येणार, पण हे एक पहिलं पाऊल आहे जे मी उचलू शकतो. ते मी उचललं. या गाण्यात काय नाविन्यपूर्ण आहे, काय नाही याचं संशोधन आपण करावं. आपण याच्यापेक्षा निश्चितच जास्त काहीतरी केलं असेल म्हणून इतक्या अधिकाराने (आणि माफ करा, पण थोड्या हिणकस पद्धतीनेही) आपण या गाण्याच्या मूल्याबद्दल लिहिलं आहे. मला तूर्तास इतकंच ठाऊक आहे की माझ्या कुवतीप्रमाणे, अतिशय प्रामाणिक असं पाऊल मी उचललेलं आहे. आणि ते मी शेवटपर्यंत निभावणार आहे. ते तुमच्या पसंतीस उतरलं नसेलही पण हे गाणं ज्यांना आवडलं आहे आणि ज्यांच्यामध्ये मराठीचा अभिमान या गाण्याने पुन्हा चेतवला आहे, त्या लोकांची कास धरून मला हा प्रवास पुढे असाच चालू ठेवायचा आहे. आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.

कौशल

कौशल श्रीकृष्ण इनामदार महोदय,

या स्तुत्य उपक्रमासाठी तुमचे हार्दिक अभिनंदन.

आपल्या प्रतिसादाची वाट पाहतोय.

आपला,
शेखर कमलकर केसाले
जय मराठी !!!