.....बरे दिसत नाही...!

...................................
.....बरे दिसत नाही...!
...................................


आनंद एकदा तरी उधळ दुःखा !
अश्रूंत हासणे जरा मिसळ दुःखा !


अंधार दाटतो कधी सुखांचाही...
येऊन तू पुढे दिवा उजळ दुःखा !


यादीत का तुझ्या कुणी स्वतः यावे ?
प्रत्येकजण म्हणे, ` मला वगळ दुःखा ! `


सदरा न `तो` तुझ्या मुळीच मापाचा...
होईल घट्ट वा अती ढगळ दुःखा !


दडतोस तू असा किती, सुखामागे ?
येऊन भेट की मला सरळ दुःखा !


आटोप...एवढा न वेळ मजपाशी...
आहेस तू किती अघळपघळ दुःखा !


आहेस डोंगरापरी उभा का रे ?
कर वाट मोकळी..वितळ, वितळ दुःखा !


झालेच शेवटी...तुझे हसू झाले...
रडलास तू म्हणे सुखाजवळ दुःखा !


दररोज भेटणे बरे दिसत नाही...!
दररोज भेटणे जरी अटळ दुःखा !!


- प्रदीप कुलकर्णी

गझल: 

प्रतिसाद

हा नो-बॉल आहे.
कलोअ चूभूद्याघ्या