गरजत आहे, बरसत नाही
===============
गरजत आहे, बरसत नाही
गरजत आहे! हरकत नाही !!
मुबलक चटके बसले आता
अनवट वाटा तुडवत नाही
डचमळती डोळ्यातून सगळ्या..
आठवणी मी हलवत नाही
शुकशुक झाली ही सवयीची,
मी आताशा दचकत नाही
चघळत बसतो मेंदू माझा
पटकन सगळे विसरत नाही
अवघड जागी दुखणे झाले..
सोसत नाही; संपत नाही
रोज नव्याने वार तुझा अन्
या ह्रदयावर चिलखत नाही
नक्की कसला हा कंटाळा?
रोजच आता करमत नाही !
फरफट आहे, फरफट नुसती
जगणे याला म्हणवत नाही
या गझलेमधल्या मुद्द्यांशी
शायर स्वत: सहमत नाही...
-ज्ञानेश.
================
गझल:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
मंगळ, 17/03/2009 - 23:52
Permalink
नक्की कसला हा कंटाळा?
वा, ज्ञानेश एकंदरच गझल अगदी छान झाली आहे. एकंदर फार आवडली.
नक्की कसला हा कंटाळा?
रोजच आता करमत नाही !
वाव्वावा..सध्या हा शेर गुणगुणतो आहे.
प्रदीप कुलकर्णी
बुध, 18/03/2009 - 16:12
Permalink
सुरेख...
गरजत आहे, बरसत नाही
गरजत आहे! हरकत नाही !!
- वा. छान. सूक्ष्म अर्थच्छटेचा शेर. किमान गरजत तरी आहे, हेही नसे थोडके !
मुबलक चटके बसले आता
अनवट वाटा तुडवत नाही
- छान
१) या शेरात मी हा शब्द कुठेतरी आला असता तर शेर परिपूर्ण झाला असता.
२) मुबलक शब्द (मला) खटकला.
डचमळती डोळ्यातून सगळ्या..
आठवणी मी हलवत नाही
- सुंदर. डोळ्यांतुन हवे होते.
शुकशुक झाली ही सवयीची,
मी आताशा दचकत नाही
- सुरेख.
चघळत बसतो मेंदू माझा
पटकन सगळे विसरत नाही
- सुरेख कल्पना. मेंदू चघळतो...वा...वा...
करीत बसतो रवंथ मेंदू, असे काहीसे आले असते तर शेर अधिक उठावदार झाला असता..पण तरीही छानच.
अवघड जागी दुखणे झाले..
सोसत नाही; संपत नाही
- १) सोसवत हवे होते.
- २) - संपत हे यमक अयोग्यही नाही आणि तांत्रिकदृष्ट्या चुकीचेही नाही...पण यमकसमूहातून वेगळे पडणारे आहे. इतर सगळी यमके चार अक्षरी आणि हेच तेवढे तीन अक्षरी ! अगदीच कीस काढायचा (किंवा पाडायचा) तर हे यमक चार अक्षरी आहे, असेही म्हणता येईल...पण मग `समपत` नाही, असे वाचावे लागेल ! :)
नक्की कसला हा कंटाळा?
रोजच आता करमत नाही !
- अप्रतिम...
फरफट आहे, फरफट नुसती
जगणे याला म्हणवत नाही
- वा..वा....सुंदर, सहज, शैलीदार शेर.
या गझलेमधल्या मुद्द्यांशी
शायर स्वत: सहमत नाही...
- मिष्किल शेर आहे; पण गझलेतील गांभीर्य़ कमी करणारा शेर. नसता तरीही काहीच बिघडले नसते. उलट एक गंभीर गझल वाचल्याचा निखळ आनंद मिळाला असता. अस्थानी मिष्किलपणा शेराचे सौंदर्य उणावतो. शिवाय, मराठी गझलेत शायर वगैरे शब्द वापरावेत की नाही, हा ज्याच्या-त्याच्या आवडी-निवडीचा प्रश्न. हे स्वातंत्र्य आपण अबाधित ठेवू या.
एकंदर छान गझल. मस्त लिहिता. लिहीत राहा. शुभेच्छा.
पुलस्ति
बुध, 18/03/2009 - 18:38
Permalink
मस्त!!
शुकशुक, मेंदू, आठवणी आणि कंटाळा हे शेर मला फार आवडले!!
अजय अनंत जोशी
बुध, 18/03/2009 - 22:15
Permalink
सुरेख
छान... झकास.... वा!
वरील सुचनांकडे निश्चित लक्ष द्या.
शायर स्वतः(च) सहमत नाही = च राहिला आहे काय?
कलोअ चूभूद्याघ्या
वैभव जोशी
गुरु, 19/03/2009 - 11:10
Permalink
शुकशुक
शुकशुक झाली ही सवयीची,
मी आताशा दचकत नाही
मस्त !
नक्की कसला हा कंटाळा?
रोजच आता करमत नाही !
वा वा .. सुंदर शेर
गझल आवडली ज्ञानेश
ज्ञानेश.
गुरु, 19/03/2009 - 21:15
Permalink
क्या बात है..
सगळ्या दिग्गज लोकांचे प्रतिसाद पाहून अंगावर तूर्तास मूठभर मांस चढले आहे.
सगळ्यांचे खूप खूप आभार.
@प्रदीपजी, तुमच्या सुचना नेहमीच मोलाच्या असतात. धन्यवाद! नक्की सुधारणा करेन.
Dhananjay Borde
शनि, 21/03/2009 - 22:59
Permalink
नक्की
नक्की कसला हा कंटाळा?
रोजच आता करमत नाही !
जालीम शेर आहे! मस्त!
रोज नव्याने वार तुझा अन्
या ह्रदयावर चिलखत नाही
हा ही शेर आवडला.
तुम्ही छान लिहिता. गेयता असते.
Dhananjay Borde