सवे या..

सवे या चांदण्यांच्या मी कशाला जागलो होतो ?
फुलांशी मी कुणासाठी, कशाला बोललो होतो ?

निरोपाच्या क्षणी होता तुझा मी हात धरलेला
तसा अगदीच नाही पण जरा ओलावलो होतो

असे प्रत्येक वेळेला मला वाटून गेले की,
जसे वागू नये कोणी, तसा मी वागलो होतो

पुढे वेगात जाणे हे मलाही शक्य होते पण..   
..तुझ्यासाठीच मागे मी जरासा थांबलो होतो

तुला माझ्याप्रमाणे हा सदोदित प्रश्न छळतो का ?
-'असे जर व्हायचे होते, कशाला भेटलो होतो?'

-केदार पाटणकर 


गझल: 

प्रतिसाद

केदार, छान गझल.
हा शेर आवडला-
असे प्रत्येक वेळेला मला वाटून गेले की,
जसे वागू नये कोणी, तसा मी वागलो होतो
काही  शेरांत  अजून  थोडी  अनपेक्षितता/ कलाटणी असायला हवी होती असे वाटले. चूभूद्याघ्या.

ज्ञानेश,
आभारी आहे.
या एकंदर गझलेत अनपेक्षितता सापडली तर औषधाला सापडेल. :)

असे प्रत्येक वेळेला मला वाटून गेले की,
जसे वागू नये कोणी, तसा मी वागलो होतो
इथे सापडली अनपेक्षितता :) सुंदर आलाय शेर.
 

माझ्यामते अनपेक्षितता, कलाटणी ह्या गोष्टी अत्यंत सापेक्ष आहेत. काहींना जे शेर अगदी अनपेक्षिततापूर्ण,  कलाटणीयुक्त वाटतात ते तसे काहींना वाटतीलच असे नाही. त्यामुळे अनपेक्षितता, कलाटणी ह्या गोष्टी शेर लिहिताना डोळ्यांपुढे ठेवून शेर लिहायला हवा असे मला वाटत नाही. तसेच नेहमीच्या कल्पनांना (बहुधा नाटकीय) कलाटणीची फोडणी दिली म्हणजे शेर चांगला होत नसतो. हे असले चटपटीत शेर दीर्घायुषी नसतात, असे मला वाटते.  शेरात वाचकाशी संवाद साधणारा सच्चेपणा, प्रामाणिकपणा असणेही महत्त्वाचे आहे. असो. अनेक गोष्टी आहेत.

निरोपाच्या क्षणी होता तुझा मी हात धरलेला
तसा अगदीच नाही पण जरा ओलावलो होतो

तुला माझ्याप्रमाणे हा सदोदित प्रश्न छळतो का ?
-'असे जर व्हायचे होते, कशाला भेटलो होतो?'

हे शेरही

असे प्रत्येक वेळेला मला वाटून गेले की,
जसे वागू नये कोणी, तसा मी वागलो होतो

ह्या शेराएवढेच चांगले आहेत. एकंदर छान झाली आहे गझल.

केदारगझल आवडली.
निरोपाच्या क्षणी होता तुझा मी हात धरलेला
तसा अगदीच नाही पण जरा ओलावलो होतो
असे प्रत्येक वेळेला मला वाटून गेले की,
जसे वागू नये कोणी, तसा मी वागलो होतो
हे शेर मुख्यतःशुभेच्छासोनाली

मलाही ओलावलो आणि वागलो हे दोन्ही शेर फार आवडले!

चित्तरंजन यांचा मुद्दा योग्य आहे. त्यामुळे अनपेक्षितता, कलाटणी ह्या गोष्टी शेर लिहिताना डोळ्यांपुढे ठेवून शेर लिहायला हवा असे मला वाटत नाही. तसेच नेहमीच्या कल्पनांना (बहुधा नाटकीय) कलाटणीची फोडणी दिली म्हणजे शेर चांगला होत नसतो...
मंजूर आहे. या गझलेतले शेर चांगले नाहीत, असे मला म्हणायचे नव्हते. गैरसमज नसावा.
धन्यवाद!

या गझलेतले शेर चांगले नाहीत, असे मला म्हणायचे नव्हते.
तुम्हाला असे म्हणायचे आहे असे सुचवायचे नव्हते. प्रतिसादात अनपेक्षिततेचा/कलाटणी चा उल्लेख झाला. त्यावर माझे मत मांडावेसे वाटले.  दुसरे काही  नाही. ह्या निमित्ताने चर्चा होते. अशा चर्चा व्हायला हव्यात.

गझल आवडली.
निरोपाच्या क्षणी होता तुझा मी हात धरलेला
तसा अगदीच नाही पण जरा ओलावलो होतो
असे प्रत्येक वेळेला मला वाटून गेले की,
जसे वागू नये कोणी, तसा मी वागलो होतो >> हे मस्त आले आहेत.

तुला माझ्याप्रमाणे हा सदोदित प्रश्न छळतो का ?
-'असे जर व्हायचे होते, कशाला भेटलो होतो?'

ह्या शेराने माझ्या,

काय वेगळे घडते जर भेटलोच नसतो?
ह्या प्रश्नाने सांग तुलाही छळले नाही?

ह्या शेराची आठवण झाली.

अभिनंदन व पु.ले.शु
~ नचिकेत

प्रतिसादांबद्दल आभारी आहे. 
चर्चेबद्दल आनंदी.  

निरोपाच्या क्षणी होता तुझा मी हात धरलेला
तसा अगदीच नाही पण जरा ओलावलो होतो
तुला माझ्याप्रमाणे हा सदोदित प्रश्न छळतो का ?
-'असे जर व्हायचे होते, कशाला भेटलो होतो?

गम्मतशीर प्रतिसाद आहेत. म्हणजे आशयाच्या कलाटणीऐवजी मतांनाच कलाटणी मिळतेय. हं... निवड्णुका आल्या वाटतं जवळ.
केदार,
ही गझल मला आवडली.
कलोअ चूभूद्याघ्या

गझल आवडली ,केदार!
मक्ता अप्रतिम.

जयन्ता५२

प्रतिसादांबद्दल सर्वांचा आभारी आहे.

केदार
आवडलो, वागलो हे शेर आवडले...
 
 

छळणे , भाळ्णे, वागणे  आल्याशिवाय पूर्ण होईल ती गझल कसली  : ) दहापैकी नऊ गझला ( आणि त्यातला दहापैकी  नऊ शेरांमध्ये ) बहुतेक वेळा हेच असतं !  त्यामुळे तुम्हाला बहुतेक गझला वाचताना तुमचे शेर आठवण्याची दाट शक्यता आहे !!!
 

.

बेसिकली फार सुंदर गझल आहे.

कलाटणी वगैरे बाजूला ठेवू! अशा हळुवार विषयांवर किंवा हळुवार उल्लेख असलेल्या गझला तरी कुठे आहेत?

ही एक सच्ची गझल वाटली! केदार, अभिनंदन!

तुमचा वेग फार कमी आहे हा एक प्रॉब्लेम आहे असे माझे मत!

(प्रकाशित करण्याचा!)

-'बेफिकीर'!