हा प्रवास आधी मुळीच ठरला नव्हता


हा प्रवास आधी मुळीच ठरला नव्हता
मी स्वतःहुनी हा रस्ता धरला नव्हता

मी कधी तुझ्या निष्ठांची किंमत केली?
एवढा तुझा पण भाव घसरला नव्हता

एवढे कुठे मी खरे बोललो होतो?
एवढा तुझा चेहरा उतरला नव्हता

केवढी पसरली सभोवार व्याकुळता
एवढा कुणी शिशिरात विखुरला नव्हता

एवढा कधी मी उदास नव्हतो किंवा
एवढा कधी प्राजक्त डवरला नव्हता

एवढ्यात काही विशेष घडले नाही
एवढा सुखी पण काळ गुजरला नव्हता

एवढ्यात काही विशेष लिहिले नाही
एवढा सुखी पण काळ गुजरला नव्हता

गझल: 

प्रतिसाद

चित्तरंजन,

छान आहे. पण पूर्वीच्या आपल्या गझलांच्या तुलनेत जरा कमी आवडली.
हा शेर खूप आवडलाः
एवढ्यात काही विशेष घडले नाही
एवढा सुखी पण काळ गुजरला नव्हता

मला असा शेर सुचलाः

एवढे कुठे मी खरे बोललो होतो?
केवढा तुझा चेहरा उतरला होता


केदार, जाणूनबुजून 'नव्हता' हेच अन्त्ययमक  ठेवले आहे. नव्हत्याचे होते करणे काही कठीण नाही.

एवढे कुठे मी खरे बोललो होतो?
एवढा तुझा चेहरा उतरला नव्हता

ह्यात तुम्ही म्हणता त्याप्रमाणे केवढा तुझा चेहरा उतरला होता असे केल्यास चुचकारण्याची मजा निघून जाईल. "अरे नाराज होऊ नकोस. माझ्या बोलणे कशाला एवढे मनावर लावून घेतोस. चेहरा जरा जास्तच उतरल्यासारखा तू करतो आहेस.पण मी कुठे एवढे खरे बोललो होतो. मला खरे बोलायला लावू नकोस," असा अर्थ अभिप्रेत आहे.  होता इथे अधिक थेट होतो आहे. शेराचा बारीकपणा कमी होतो आहे.


मी कधी तुझ्या निष्ठांची किंमत केली?
एवढा तुझा पण भाव घसरला नव्हता
यात जे अर्थांचे पदर अभिप्रेत आहेत
१. मी कधी तुझ्या निष्ठांची किंमत केली नाही. पण तुझाही भाव किंमत करावी एवढा घसरला नव्हता.
२. कबूल मी कधी तुझ्या निष्ठांची कधीच किंमत/कदर केली नाही. पण तुझा भाव एवढा घसरेल असेही कधी वाटले नव्हते.
हे अर्थ 'होता' हे अन्त्ययमक घेतल्यास कदाचित येत नाहीत.



हा प्रवास आधी मुळीच ठरला नव्हता
मी स्वतःहुनी हा रस्ता धरला नव्हता

- छान. उत्तम.
मी कधी तुझ्या निष्ठांची किंमत केली?
एवढा तुझा पण भाव घसरला नव्हता

-क्या बात है! सूचकता हा काव्याचा मोठाच गुण होय. :)
एवढे कुठे मी खरे बोललो होतो?
एवढा तुझा चेहरा उतरला नव्हता

- सुंदर.
केवढी पसरली सभोवार व्याकुळता
एवढा कुणी शिशिरात विखुरला नव्हता

- ओहो. चित्रदर्शी शेर
एवढा कधी मी उदास नव्हतो किंवा
एवढा कधी प्राजक्त डवरला नव्हता

- सुरेख.
दोन टोकाच्या भावना एकत्र आणून साधलेला उत्तम परिणाम.
इथे तुमचाच एक शेर आठवला -
ज्या क्षणास आपुले ऋणानुबंध संपले
वाटले किती भकास वाटले बरे किती
एवढ्यात काही विशेष घडले नाही
एवढा सुखी पण काळ गुजरला नव्हता

- फारच छान.
एवढ्यात काही विशेष लिहिले नाही
एवढा सुखी पण काळ गुजरला नव्हता
- वा... वा... उत्तम. बहुप्रसवा कवींनी अगदी लक्षात ठेवावा असा शेर :)
शेवटच्या या दोन शेरांत एकेका शब्दानेही किती मोठी किमया केली आहे!
एकंदर उत्तम गझल. सगळेच शेर आवडले; तेही चढत्या क्रमाने. शुभेच्छा.

केवढी पसरली सभोवार व्याकुळता
एवढा कुणी शिशिरात विखुरला नव्हता... खूप दर्दभरा शेर!
मक्ता सुद्धा अतिशय आशयपूर्ण!
-मानस६


होता... नव्हता ह्या बाबतीत श्री.चित्तरंजन ह्यांनी व्यक्त केलेल्या मताशी सहमत...
मी एवढेसे खरे बोलल्यावर तुझा चेहरा कधी नव्हे इतका उतरला होता.. तर मग पूर्ण खरे बोलल्यावर कायच होईल.. हा जो आशय आहे तो 'नव्हता' ह्या रदीफने जास्त अधोरेखित होतोय, असे वाटते.
-मानस६

शेवट्चे ४ शेर आवडले!
विशेष लिहिणे आणि शिशिर शेर तर फारच भिडले...

एवढा कधी मी उदास नव्हतो किंवा
एवढा कधी प्राजक्त डवरला नव्हता
हा शेर अप्रतीम !
मक्ता सुद्धा सुरेख.

प्रवास, भाव, चेहरा, व्याकुळता, प्राजक्त सर्वच शेर छान आहेत. शेवटचे दोन जुळे-शेरही छान.
फक्त माझ्या दृष्टीने 'एवढा' या शब्दाची एवढी पुनरावृती करू नये असे वाटते. शेवटी निर्णय गझलकाराचाच.
कलोअ चूभूद्याघ्या

एवढा कधी मी उदास नव्हतो किंवा
एवढा कधी प्राजक्त डवरला नव्हता

एवढ्यात काही विशेष घडले नाही
एवढा सुखी पण काळ गुजरला नव्हता ...
 
सुंदरच !

मी कधी तुझ्या निष्ठांची किंमत केली?
एवढा तुझा पण भाव घसरला नव्हता

एवढे कुठे मी खरे बोललो होतो?
एवढा तुझा चेहरा उतरला नव्हता

एवढ्यात काही विशेष घडले नाही
एवढा सुखी पण काळ गुजरला नव्हता

एवढ्यात काही विशेष लिहिले नाही
एवढा सुखी पण काळ गुजरला नव्हता

हे शेर आवडले!

प्रदीप कुलकर्णी यांच्या प्रतिसादानंतर अजून काय बोलणार.
अख्खी गझल आवडली. शेवटचा शेर अफ़लातून.
 

...असे म्हणवत नाही.
 पण मग अशी सुंदर गझल खूप दिवसात वाचायला मिळत नाही. :(

धन्यवाद, अजय. पण सुदैवाने एखाद्या शब्दाची पुनरावृत्ती करू नये असा कुठलाही नियम नाही. अहमद फ़राज़ ह्यांची ही अप्रतिम गझल वाचा:


सुना है लोग उसे आँख भर के देखते हैं
सो उसके शहर में कुछ दिन ठहर के देखते हैं

सुना है रब्त है उसको ख़राब हालों से
सो अपने आप को बरबाद करके देखते हैं

सुना है दर्द की गाहक है चश्म-ए-नाज़ुक उसकी
सो हम भी उसकी गली से गुज़र कर देखते हैं

सुना है उसको भी है शेर-ओ-शायरी से शगफ़
सो हम भी मोजज़े अपने हुनर के देखते हैं

सुना है बोले तो बातों से फूल झड़ते हैं
ये बात है तो चलो बात कर के देखते हैं

सुना है रात उसे चाँद तकता रहता है
सितारे बाम-ए-फ़लक से उतर कर देखते हैं

सुना है हश्र हैं उसकी ग़ज़ाल सी आँखें
सुना है उस को हिरन दश्त भर के देखते हैं

सुना है दिन को उसे तितलियाँ सताती हैं
सुना है रात को जुग्नू ठहर के देखते हैं

सुना है रात से बढ़ कर हैं काकुलें उसकी
सुना है शाम को साये गुज़र के देखते हैं

सुना है उसकी सियाह चश्मगी क़यामत है
सो उसको सुरमाफ़रोश आँख भर के देखते हैं

सुना है उसके लबों से गुलाब जलते हैं
सो हम बहार पर इल्ज़ाम धर के देखते हैं

सुना है आईना तमसाल है जबीं उसका
जो सादा दिल हैं बन सँवर के देखते हैं

सुना है जब से हमाइल हैं उसकी गर्दन में
मिज़ाज और ही लाल-ओ-गौहर के देखते हैं

सुना है चश्म-ए-तसव्वुर से दश्त-ए-इम्कान में
पलंग ज़ावे उसकी कमर को देखते हैं

सुना है उसके बदन के तराश ऐसे हैं
के फूल अपनी क़बायेँ कतर के देखते हैं

वो सर्व-क़द है मगर बे-गुल-ए-मुराद नहीं
के उस शजर पे शगूफ़े समर के देखते हैं

बस एक निगाह से लुटता है क़ाफ़िला दिल का
सो रहरवाँ-ए-तमन्ना भी डर के देखते हैं

सुना है उसके शबिस्तान से मुत्तसिल है बहिश्त
मकीं उधर के भी जलवे इधर के देखते हैं

रुके तो गर्दिशें उसका तवाफ़ करती हैं
चले तो उसको ज़माने ठहर के देखते हैं

किसे नसीब के बे-पैरहन उसे देखे
कभी-कभी दर-ओ-दीवार घर के देखते हैं

कहानियाँ हीं सही सब मुबालग़े ही सही
अगर वो ख़्वाब है ताबीर कर के देखते हैं

अब उसके शहर में ठहरें कि कूच कर जायेँ
"फ़राज़" आओ सितारे सफ़र के देखते हैं

मी कधी तुझ्या निष्ठांची किंमत केली?
एवढा तुझा पण भाव घसरला नव्हता

एवढे कुठे मी खरे बोललो होतो?
एवढा तुझा चेहरा उतरला नव्हता
 
सगळी गज़लच सुंदर पण हे दोन शेर फार्फार आवडले.

आपल्या 'एवढा' या शब्दासाठी मी दिलेल्या 'एवढ्याशा' प्रतिसादावरून तुम्ही 'एवढा' प्रतिसाद लिहिल्याबद्दल धन्यवाद.
मी पुनरावृत्ती करूच नये असे म्हटलेले नाही. पण या ठिकाणी 'एवढा' या शब्दाची पुनरावृत्ती आहे. एवढा हा शब्द तोच भाव ठेऊन बदलता येऊ शकेल असे मला वाटले.
उदा.
एवढे कुठे मी खरे बोललो होतो?
एवढा तुझा चेहरा उतरला नव्हता

या ठिकाणी
एवढे कुठे मी खरे बोललो होतो?
चेहरा तुझाही तसा उतरला नव्हता

या ठिकाणी 'तसा' चे प्रयोजन बसू शकते. कारण पहिल्याच ओळीत 'एवढा' हा शब्द घेतल्याने 'तसा' या शब्दाचा संबंध 'एवढा' या शब्दाशी लावता येतो.
असेच असावे असे माझे म्हणणे नाही. मी सहज सुचले ते लिहिले.
केवढी पसरली सभोवार व्याकुळता
एवढा कुणी शिशिरात विखुरला नव्हता
इथे 'उ' हा अलामत भंग सोडल्यास बाकी सर्व चपखल वाटते. तरीसुद्धा पहिल्या ओळीतील 'केवढी' हा शब्द बदलून तशाच अर्थाचा दुसरा शब्द आला असता तर अधिक सौंदर्यवान झाले असते असे मला वाटते. (अलामतीची सूट मला माहीत आहे.)
एवढा कधी मी उदास नव्हतो किंवा
एवढा कधी प्राजक्त डवरला नव्हता
या ठिकाणी 'किंवा' च्या प्रयोजनामुळे दोन 'एवढा' खपून जातात.
टीप : आपण प्रयोग म्हणून काही केले असेल तर मला ते पूर्णपणे मान्य आहे. आपण दिलेली श्री. अहमद फराज यांची गझल या विषयी मी बोलू इच्छित नाही.
चर्चा वाचणारे त्यातूनही शिकत असतात म्हणून चर्चेचे प्रयोजन.
मी नाव न लक्षात घेता प्रतिसाद देतो. अताशा मी तशीच सवय मला लावून घेतली आहे. तरी आपणांस राग आला असल्यास क्षमस्व.
कलोअ चूभूद्याघ्या

विखरला हा शब्द घेता येईल. बाकी तुमच्या मतांचा मी आदर करतो. राग येण्याचा प्रश्नच नाही. तूर्तास वेळेअभावी एवढेच.

केवढी पसरली सभोवार व्याकुळता
एवढा कुणी शिशिरात विखुरला नव्हता
सुरेख

एवढ्यात काही विशेष घडले नाही
एवढा सुखी पण काळ गुजरला नव्हता
सुरेख. एकुणच गझल वाचकाला रखरखीत प्लेनवरुन चालवणारी. आवडली

चित्त पूर्ण गझल आवडली..
हळूहळू मनात घुसत जाणारी गझल
एवढे कुठे मी खरे बोललो होतो?
एवढा तुझा चेहरा उतरला नव्हता

एवढा कधी मी उदास नव्हतो किंवा
एवढा कधी प्राजक्त डवरला नव्हता

एवढ्यात काही विशेष घडले नाही
एवढा सुखी पण काळ गुजरला नव्हता हे खूपच आवडले
 

गझल  छान आहेच, पण  'एवढा' ची  पुनरावृत्ती  मलाही  जरा  वेगळीच  वाटली. म्हणजे  त्यात  काही  चुकीचे  आहे, असे मला म्हणायचे  नाही. पण... चित्तदांच्या  आधीच्या  गझलेइतकी  'अपील' झाली  नाही. अर्थात, हा  माझ्या  गझलविषयक  आकलनक्षमतेचा  दोष  असू शकतो.
एक 'अवांतर'  निरीक्षण- चित्तरंजन यांनी  अहमद फराज यांची  जी  गझल  दिलेली  आहे, त्यात जवळपास  प्रत्येक शेरात एकच विषय मांडलेला  दिसतो. 'सुना है' या स्वरूपात  प्रेयसीच्या गुणांचे वर्णन आहे.
अशाच  स्वरूपाची  गझल  काही  दिवसांपूर्वी  नीरज  कुलकर्णी  याने  प्रकाशित केली होती- "अशी  गोड तू." त्यातही  सगळेच  शेर एकाच  विषयावरील  होते. सगळेच शेर  चांगले  होते. पण  केवळ  या  एका  कारणामुळे  ती  गझल, 'गझल' असल्याचे  नाकारण्यात  आले  होते!
असो. (सहज  आठवले  म्हणून  लिहीले.)

ज्ञानेश. ह्यांनी वर नमूद केलेली 'अशी गोड तू..' ही गझल संकेतस्थळाकडून तरी नाकारण्यात किंवा विचाराधीन करण्यात आलेली नव्हती. http://www.sureshbhat.in/node/951 ह्या दुव्यावर जाऊन ती वाचता येईल. कुणाचाही गैरसमज होऊ नये म्हणून हा खुलासा. गझल विचाराधीन करताना अथवा नाकारताना गझलेच्या दर्जाचा (किंवा शेर गझलेचा वाटतो आहे किंवा नाही ह्या बाबीचा) विचार केला जात नाही. केवळ गझलेच्या तांत्रिक बाजू सांभाळल्या गेल्या आहेत किंवा नाही, एवढेच बघितले जाते.

सगळेच शेर आवड्ले पन हे विशेश.....
 
मी कधी तुझ्या निष्ठांची किंमत केली?
एवढा तुझा पण भाव घसरला नव्हता
 
केवढी पसरली सभोवार व्याकुळता
एवढा कुणी शिशिरात विखुरला नव्हता

एवढा कधी मी उदास नव्हतो किंवा
एवढा कधी प्राजक्त डवरला नव्हता

एवढ्यात काही विशेष घडले नाही
एवढा सुखी पण काळ गुजरला नव्हता

एवढ्यात काही विशेष लिहिले नाही
एवढा सुखी पण काळ गुजरला नव्हता