जाच

होतो जैसा, तसाच


आहे मी एकटाच!


 


काटा टोचे न आज


झाली ही कठिण टाच!


 


हसशी का मंद मंद


डोळे मिटुनी उगाच?


 


सोड जरा बाहुपाश


घेउन अधराची लाच!


 


येता मी सामोरा


होशी तू आरसाच!


 


का मी हे मान्य करू..


तीन अधिक दोन पाच?


 


मारी सूर्याशी पैज


आहे तो काजवाच!


 


पुसल्या मी सर्व खुणा


एक ठसा राहिलाच!


 


देवा संपेल कधी..


क्रौर्याचा नग्न नाच?


 


व्रण आता बुजला, पण


सल मागे राहिलाच!


 


मरणाने सुटणारा


जीवन हा एक जाच!

गझल: 

प्रतिसाद

माझ्यामते एक एक मुद्दा जबरदस्त आहे. सूर्याच्या शेरामधे 'आहे तो' च्या ऐवजी मी 'आहेस काजवाच' केले असते. पण ते ज्याचे त्याचे! अत्युत्तम विचार! अतिशय लहान वृत्तामुळे 'गझल' म्हणावे की नाही या संभ्रमात असतानाच मुद्दे जसजसे वाचत गेलो तसे पटले, सरस गझल!

माझ्या मते ही सरस गझल नाही.

सूर्याचा शेर आहे छान. पण मात्रांकडे लक्ष दिले नाही.
मारी सूर्याशी पैज             २+२+२+२+२+२+१ = १३
आहे तो काजवाच!            २+२+२+२+१+२+१ =  १२
असे नाही का जमणार?
रोज सूर्याशी पैज
मारतोय काजवाच
जीवन-मरण मात्र निश्चितच चांगले जमले आहे.
कलोअ चूभूद्याघ्या

भूषणजी आणि अजयजी,
आपल्या अभिप्रायांबद्दल धन्यवाद. मात्रांचा थोडा घोळ नक्कीच वाटू शकतो. परंतु 'सूर्याशी' हा शब्द 'सूर्याशि' असा वाचल्यास प्रश्न सुटतो. आणि संपूर्ण गझल वाचताना जी एक लय निर्माण होते, तीनुसार 'शी' हा आपोआप र्‍ह्स्वच उच्चारला जातो. केवळ लेखनात तो फारच अशुद्ध दिसतो म्हणून मी दीर्घ लिहिला आहे.
 
जाणकारांनी ह्याबाबत अधिक मतप्रदर्शन करावे!

पुसल्या मी सर्व खुणा


एक ठसा राहिलाच!
हा शेर  आवडला