कारण कधीच नव्हते

टाळ्या हजार पडुनी कशास पाणावलेत डोळे ?
नाहीस तूच हे आठवून ओठांत अश्रु फुटले


चंद्रास चांदणी का असेच बोलून काल गेली...?
'सारेच तेज होते तुझेच सूर्यास जे मिळाले'


माझ्या-तुझ्या यशाचेच गोडवे गात बोलताना...
तूही असे म्हणावे कि, 'आज तूही तुझे बघावे' ?


हकनाक लाविले तू मला सुखाचे व्यसन कराया...
कळताच दु:ख आधीच त्या सुखाला धरून बसले


मी शिल्पकार नाही कि कोणता चित्रकार नाही...
जमण्यास वेदना अंतरात कारण कधीच नव्हते


 


टीप : रदीफ नसलेली आणि फक्त स्वराचा काफिया असलेली रचना सुचली तशी दिली.

गझल: 

प्रतिसाद

गा गा ल गा   ल   गा गा ल गा  ल गा गा ल गा   ल गा गा
छान वृत्त! डेक्कन क्वीनची आठवण झाली.
मक्ता सुंदर आहे. आपण जी टीप दिली आहेत त्यातले शेवटचे तीन शब्द अतिशय आवडले. कदाचित माननीय प्रसाद लिमयांनाही आवडावेत. 'सुचली तशी दिली'. छान! माझ्यामते उत्स्फुर्तता असणे हा मोठा प्लस पॉईंट आहे.
चंद्रास चांदणी का असेच बोलून काल गेली...?
'सारेच तेज होते तुझेच सूर्यास जे मिळाले' ( 'च' चे रिपिटेशन भासले )

माझ्या-तुझ्या यशाचेच गोडवे गात बोलताना...
तूही असे म्हणावे कि, 'आज तूही तुझे बघावे' ? ( म्हणावेस, बघावेस हे वृत्तामुळे घेता येत नसल्यास कंसात दिल्यास कुणी बोट दाखवू नये असे वाटले. )

हकनाक लाविले तू मला सुखाचे व्यसन कराया...
कळताच दु:ख आधीच त्या सुखाला धरून बसले ( लाविले'स'..)

मी शिल्पकार नाही कि कोणता चित्रकार नाही...
जमण्यास वेदना अंतरात कारण कधीच नव्हते ( मला अतिशय आवडलेला शेर! जमण्यास वेदना अंतरात ..व्वा व्वा! )
मला माझ्या 'थोडे हसून थोडे रुसून' या 'अप्राप्य कविता' मधील ओळी आठवल्या.
वृत्त फार आवडले. ढँकटँकटॅडॅक ढँकटँकटॅडॅक ढँकटँकटॅडॅक ढँकटँक      ढा...