विचाराधीन मन
तुंबले आहेत साठे खालच्या हृदयाकडे
आसवांनो व्हा पुढे व्हा अन वळा डोळ्याकडे
हात होतो मोकळा दीवान रचुनी सारखा
पाहते बुद्धी भयाने आपल्या हाताकडे
माहिती नाहीत पृथ्वीची गुरुत्वाकर्षणे
तीच येते सारखी चिकटायला माझ्याकडे
मी उभा की आडवा पाहून ते ठरवे दिशा
त्याहुनी काही न तरणोपाय अवकाशाकडे
काय ही आकाशगंगा फाटलेली, दे नवी
तो म्हणे की हीच आहे एवढी त्याच्याकडे
श्वास राही येत माझ्या गझलच्या आशेमुळे
देह माझा चालतो पाहून त्या श्वासाकडे
गझल:
प्रतिसाद
अजय अनंत जोशी
बुध, 28/01/2009 - 18:15
Permalink
मतला
मतला छान. पृथ्वीच्या शेरातील कल्पनाही छान.
तरणोपाय अवकाशाकडे - हे लक्षात येत नाही आहे.
मक्ताही सुरेख. मात्र ..
तुंबले आहेत साठे खालच्या हृदयाकडे
आसवांनो व्हा पुढे व्हा अन वळा डोळ्याकडे
हृदयाकडे, डोळ्याकडे - नंतर काफिया म्हणून 'आकडे' ऐवजी 'याकडे' ची अपेक्षा आहे. असो, एवढी सूट आपण सगळेच घेतो म्हणा.
दुसर्या ओळीत..
आसवांनो व्हा जरा वरती.. वळा डोळ्याकडे - असा बदल सुचवू इच्छितो. त्यामुळे, व्हा ची पुनरावृत्ती आणि 'अन' टळेल. अर्थात, 'व्हा पुढे व्हा' मधील आग्रहीपणा दाखवायचा असेल तर ठीकच आहे.
एकंदर मूड जमलाय इथे.
कलोअ चूभूद्याघ्या
गौतमी
गुरु, 29/01/2009 - 10:00
Permalink
आकाशगंगा
गमतीदार कल्पना वाटली, एवढी एकच आकाशगंगा....
भूषण कटककर
गुरु, 29/01/2009 - 12:22
Permalink
गृहीत
अजय,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
आपण जे गृहीत धरले आहेत ते चुकीचे आहे.
हृदयाकडे व डोळ्याकडे मधे 'या' कॉमन नाही.
एक अक्षर आहे 'या' अन दुसरे आहे 'ळ्या'! 'ळ्या' हे जोडाक्षर आहे. उच्चार जरी शेवटी 'या' होतो असे वाटले तरी त्यातील कॉमन उच्चार आहे 'आ'!
अवकाशाकडे - सूर्यावरून दिशा ठरतात. इथे मी गर्विष्ठपणे म्हणत आहे की माझ्यामुळे दिशा ठरतात.
व्हा, पुढे व्हा - पुनरावृत्ती मुद्दाम केली आहे. अगतिकता किंवा तीव्रता यावी म्हणुन.
सन्माननीय गौतमी - आपल्याला गंमत वाटली याबद्दल धन्यवाद!
अजय अनंत जोशी
गुरु, 29/01/2009 - 18:47
Permalink
मी असेच म्हणतो आहे..
'व्हा पुढे व्हा' मधील आग्रहीपणा दाखवायचा असेल तर ठीकच आहे.
असेच मी म्हटले आहे.
मी काहीही गृहीत धरलेले नाही. 'या' हे सामायिक अक्षर नाही हे मलाही माहीत आहे. मराठीत १ किंवा २ अशाच मात्रा असल्याने तसेच प्रत्येक अक्षर सुटे नसल्याने हे चालू शकते. परंतू तरीही त्यावर चर्चा व्हावी असा माझा भाव होता.
तरीही - सर्वच ठिकाणी 'या' आले असते तर आणखी मजा आली असती वाचायला. हे माझे मत आहे - आग्रह नाही.
कलोअ चूभूद्याघ्या
ज्ञानेश.
गुरु, 29/01/2009 - 20:20
Permalink
अर्थ
भूषणजी, पृथ्वी आणि अवकाश हे चांगले शेर आहेत.
हात होतो मोकळा दीवान रचुनी सारखा.. याचा अर्थ कळला नाही.