केवढी आग लागली होती

   


  तू जिथे आस सोडली होती
   वाट तेथेच संपली होती

मौन होती हवा अशी काही
पावरी दूर वाजली होती

घेऊनी दूर-दूर डोळ्याना
लाट एकेक चालली होती

ओठ हलले तुझे जरा होते
हाक अर्ध्यात लोपली होती

श्वास मी फुंकला जराशाने
केवढी आग लागली होती....

अनंत ढवळे ( ...पानगळीतून )

गझल: 

प्रतिसाद

व्वा! घेउनी दूर दूर डोळ्यांना...लाट एकेक चालली होती.
सुंदरच शेर!

लाट आणि आग हे शेर फार आवडले!

प्रिय मित्र अनंत,
पावरी म्हणाजे काय रे?
हाक अर्ध्यात लोपली होती फार सुंदर शेर आहे.
आग लागली होती मधे 'जराशाने' या शब्दाचा संबंध काय रे?
असे करू नये. जे स्वतःलाच समजत नाही ते उगाच लिहू नये.
 

घेऊनी दूर-दूर डोळ्याना
लाट एकेक चालली होती

ओठ हलले तुझे जरा होते
हाक अर्ध्यात लोपली होती

..... मस्तच

  तू जिथे आस सोडली होती
   वाट तेथेच संपली होती
एक भिन्न स्वरुपाचे वृत्त! अभिनंदन!  माणूस जिथ आशा सोडतो, नेमका तिथेच त्याचा पुढे जाण्याचा मार्ग खुंटतो. हा मुद्दा खूप नावीन्यपुर्ण आहे. अभिनंदन! अतिशय म्हणजे अतिशयच 'गझल'विचार!

मौन होती हवा अशी काही
पावरी दूर वाजली होती
गडबड! 'अशी काही' हे दोन शब्द एकंदर शेराच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध जाणारे आहेत.

घेऊनी दूर-दूर डोळ्याना
लाट एकेक चालली होती
कवी आपले मन अन आपली दु:खे घेउन अंतर्मुख अवस्थेत सागराच्या किनारी बसला आहे. अशा अवस्थेत फक्त म्हणजे फक्त एकच इंद्रिय काम करते. ते म्हणजे सहावे इंद्रिय, मन! मनात विचारांची प्रचंड घालमेल असते. बाकीचे अवयव, बाकीची इंद्रिये, सगळी शांत किंवा अचेतन अवस्थेत असतात. कान सागराची गर्जना ऐकत असतात, पण मेंदूपर्यंत पोहोचवत नाहीत. स्पर्श असतो वाळूचा, पण जाणवत नाही. वास असतो खार्‍या पाण्याचा, पण भिनत नाही. चव असते फक्त अनुभवांची, ती वळून मनाकडे जाते. डोळे पहात असतात लाटा, अन प्रत्येक लाटेबरोबर ती लाट जिथे संपते तिथे पोचतात. व्वा! खरच अप्रतिम शेर!

ओठ हलले तुझे जरा होते
हाक अर्ध्यात लोपली होती
व्वा! श्रेष्ठ कवी कसा असतो ते सिद्ध करणारा शेर! काही बोलायलाच नको.

श्वास मी फुंकला जराशाने
केवढी आग लागली होती....
अप्रतिम गझल! हा कवी गझलेत किती मुरला आहे ते या शेरावरून समजेल. खरा कवी. कविता म्हणजे: सांगायचे एक अन म्हणायचे काहीतरी दुसरेच! अशी गझल फार दुर्मीळ असते. श्वास मी फुंकला जराशाने...व्वा!
वाचकांनी अशा विचारांचे अनुकरण करायला खरच काहीही हरकत नाही. अशाने 'गझल' श्रेष्ठ व्हायला मदत मिळेल!

 
ंशेर आवड्ले
घेऊनी दूर-दूर डोळ्याना
लाट एकेक चालली होती

 
ंशेर आवड्ले
घेऊनी दूर-दूर डोळ्याना
लाट एकेक चालली होती

प्रतिक्रियांबद्दल आभार.




  तू जिथे आस सोडली होती
   वाट तेथेच संपली होती

घेऊनी दूर-दूर डोळ्याना
लाट एकेक चालली होती

श्वास मी फुंकला जराशाने
केवढी आग लागली होती....

अतिशय तरल !