आभास
जो मला भेटून गेला व्यास झाला
सत्य होते की तसा आभास झाला?
साधनेची प्रेरणा तो अश्रु होता
म्हणुन वाल्या पात्र वाल्मीकांस झाला
चार पैसे बांधण्या गाठीस कोणी
श्वापदांचा रोजचा मुखवास झाला
आळणी होते तरी केलीच वा! व्वा!!
लंपटांचा बेतही फर्मास झाला
श्वास त्याचे अंतरी रेंगाळले अन्
केवड्याला तेरड्याचा भास झाला
भेटलो अन् हासलो पाहून दोघे
पण तुझ्या त्या वागण्याचा त्रास झाला
शिशिर येता कल्पनेच्या भोव-याने -
हात हाती घेतला, .. मधुमास झाला
गंध कोणा मोग-याचा आवडे पण..
मत्स्यगंधेच्याच पोटी 'व्यास' झाला
गझल:
प्रतिसाद
भूषण कटककर
रवि, 04/01/2009 - 17:29
Permalink
आपका हासिले शायरी अबतक....
अजय,
आपल्याला कदाचित याची कल्पना नसेलही, पण आपला खालील शेर अत्यंत भिडणारा झालेला आहे.
भेटलो अन् हासलो पाहून दोघे
पण तुझ्या त्या वागण्याचा त्रास झाला
आपल्या आत्तापर्यंतच्या जेवढ्या गझलप्रवासाचा मी साक्षीदार आहे, त्यातील हा सर्वोत्कृष्ट शेर आहे.
एवढेच लक्षात ठेवा...
श्रीनिवास (not verified)
गुरु, 08/01/2009 - 17:28
Permalink
खूपच आवडले.
आपले विचार खूपच आवडले.
सुनेत्रा सुभाष
रवि, 11/01/2009 - 10:21
Permalink
प्रतिसाद
अजय,
मतला व पुढील शेर आवडला
जो मला भेटून गेला व्यास झाला
सत्य होते की तसा आभास झाला?
भेटलो अन् हासलो पाहून दोघे
पण तुझ्या त्या वागण्याचा त्रास झाला
गंभीर समीक्षक
मंगळ, 13/01/2009 - 12:32
Permalink
त्रास नी मधुमास बाकी खास झाला...
जो मला भेटून गेला व्यास झाला
सत्य होते की तसा आभास झाला?
जो मला भेटून गेला... व्यास झाला. सुंदर! माझ्यामधेच अशा गोष्टी आहेत की माझ्या संपर्कात येतात ते महान कवी होतात. परिसस्पर्श! दुसर्या ओळीत मात्र कलाटणी! हे खरे आहे की खोटे? मतला सहज म्हणता येत आहे. ही एक चागली बाब!
साधनेची प्रेरणा तो अश्रु होता
म्हणुन वाल्या पात्र वाल्मीकांस झाला
आजपर्यंत मी जे काही केले ते सगळे तुमच्यासाठीच रे! आता माझ्या पापांची मला शिक्षा देणार आहेत, ती पण थोडी वाटून घ्याल काय? या वाल्याकोळ्याच्या प्रश्नावर उत्तर आले की तुम्ही आमच्यासाठी जे केलेत ते तुमचे कर्तव्य होते. ते जसे केलेत ते तुमच्या वृत्तीचे निदर्शक होते, त्यामुळे ते पाप फक्त तुमचेच आहे! आजपर्यंत वाटसरुंना रडवणारा वाल्या स्वतः रडला. नारदांच्या संपर्कात आल्यावर जी साधना झाली त्याचे उगमस्थान आहे त्याला झालेली उपरती अन त्याचे आलेले अश्रू. या कवीचे आम्ही एक पाहिले आहे, कविता म्हणजे काय यावर त्याची स्वतःची अशी मते आहेत. तो जाणीवपुर्वक 'लिहायचे एक अन संदेश वेगळाच' या तत्वाचा पाठपुरावा करताना दिसतो. वास्तविक पाहता वाल्या कोळ्याच्या उदाहरणाचा गझलेशी संबंध नाही. पण इथे म्हणायचे असे आहे की आज जे तुच्छ वाटतात त्यांनाच प्रेरणा मिळाली की ते श्रेष्ठ ठरतात. हा विचार गझलेचा होउ शकतो, पण ज्या पद्धतीने तो मांडला आहे ती मांडणी मात्र गझलेला शोभत नाही. म्हणजे ऐतिहासिक किंवा पौराणिक उदाहरणे गझलेत नसतात असे नाही पण गझलेचा हेतू असतो व्यक्त होणे. यात कवी स्वतः व्यक्त झाला आहे असे कमी वाटुन कवी एक फिलॉसॉफिकल तत्व सांगत आहे असा भास जास्त होतो.
चार पैसे बांधण्या गाठीस कोणी
श्वापदांचा रोजचा मुखवास झाला
इथे पहा, मुद्दा असा आहे की माणसाला उदरनिर्वाहासाठी काय करावे लागेल हे सांगता येत नाही. 'सर्कस' हे एक चांगले उदाहरण. एखादी युवती येते अन सरळ सिंहाच्या तोंडात आपली मान देते. ते सिंह जरासे माणसाळले असतात म्हणुन ठीक आहे. नाहीतर शाळेतल्या 'सोनाली' धड्यासारखे व्हायचे. परत हा विचार संत-विचार वाटतो.
आळणी होते तरी केलीच वा! व्वा!!
लंपटांचा बेतही फर्मास झाला
सुरेश भटांच्या धर्तीचा शेर! चांगला शेर!
श्वास त्याचे अंतरी रेंगाळले अन्
केवड्याला तेरड्याचा भास झाला
लिहायचे एक अन सांगायचे दुसरेच! परत तशा स्वरुपाचा जोरदार अन आक्रमक विचार! हाही आमच्यामते सुरेश भटांच्या धर्तीचा शेर आहे.
भेटलो अन् हासलो पाहून दोघे
पण तुझ्या त्या वागण्याचा त्रास झाला
पण तुझ्या त्या वागण्याचा त्रास झाला.....व्वा! कितीतरी परिस्थितींना लागू पडणारा शेर! प्रियकर असे प्रेयसीला म्हणु शकतो. ती त्याला म्हणुन शकते. जुना मित्र मित्राला म्हणु शकतो. माणुस जीवनाला म्हणु शकतो. मृत्यूला म्हणु शकतो. गझलेला म्हणु शकतो.स्वत:ला म्हणु शकतो. वावा! हा शेर मात्र लंपटांच्या फर्मास बेतासारखा नाही. खराखुरा गझलेचा शेर! कवी भूषणने वर म्हंटले आहेच, हासिले गझल!
शिशिर येता कल्पनेच्या भोव-याने -
हात हाती घेतला, .. मधुमास झाला
व्वा! सुंदर! हात हाती घेतला, मधुमास झाला! अतिशय सुंदर ओळी!
गंध कोणा मोग-याचा आवडे पण..
मत्स्यगंधेच्याच पोटी 'व्यास' झाला
या कवीच्या मनात 'व्यास' या शब्दाबद्दल काहीतरी अढी असावी बहुधा! बरे झाले, 'व्यास' ही रदीफ घेतली नाही ते! नाहीतर प्रत्येक शेराच्या शेवटी व्यास शब्द यायचा! हा शेरही आम्हाला गझलेचा शेर वाटत नाही. मधुमास अन त्रास हे शेर सुंदर झाले. बाकी ठीक!
अजय अनंत जोशी
मंगळ, 13/01/2009 - 18:24
Permalink
समीक्षकां... का?
उगाच चुकीची समीक्षा करता. मी जे सांगतो ते प्रथम पहा.
चार पैसे बांधण्या गाठीस कोणी
श्वापदांचा रोजचा मुखवास झाला
ही सर्कसची कथा नाही. तसे जीवन म्हणजे एक सर्कसच आहे म्हणा. नोकरीसाठी किंवा आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी चार लोकांच्यासमोर लाळघोटेपणा नाईलाजाने करावा लागतो असा अर्थ घ्या.
'प्लेटो' एकदा म्हणाला होता, 'मी कोणाला वापरणार नाही, आणि मला कोणाला वापरू देणार नाही.'
पण, जगात असे घडतेच असे नाही. माहित असूनसुद्धा नाईलाजाने काहीवेळा चरितार्थासाठी चुकीचे करावे लागते.
परत हा विचार संत-विचार वाटतो. ::: हे विधान हास्यास्पद.
गंध कोणा मोग-याचा आवडे पण..
मत्स्यगंधेच्याच पोटी 'व्यास' झाला
माणसाला सतत चांगलेच मिळावे अशी अपेक्षा असते. पण कमळ जसे दलदलीतून उगवते तशाच इतर गोष्टीही घडतात.
पराशर ऋषी आणि सत्यवती (जिला मत्स्यगंधा म्हणायचे, कारण तिच्या अंगाला मासळीचा वास येत असे. ती कोळी वंशातली होती.) यांचा मुलगा 'वेदव्यास'. संपूर्ण विश्वाला साहित्य सुगंध देणा-या व्यासांचा जन्म मत्स्यगंधेच्या पोटी झाला होता.
कोणीही हीन नाही हा संदेश. - तुमच्या मते लाडीगोडी लावणारे लिखाण श्रेष्ठ असेल तर त्याला मी काही करू शकत नाही.
कलोअ चूभूद्याघ्या