आस जागी..

भंगली स्वप्ने तरी का आस जागी?
शांत झाली  भूक, का ही प्यास जागी?


कोण झाला वेदनेचा प्रेमरोगी?
आसवांची अंतरी  आरास जागी..

भोग का भोगून झाले भोगवाद्या-
जाहली का विठ्ठलाची आस जागी?


टाळला संसार अन् संन्यस्त झाला..
कृष्णलीलेची तरीही रास जागी..


आजही काळीज माझे जाळतो रे..
तू दिलेला घाव होता 'खास' जागी..!


"सुर्य तो  फेडेल माझे पांग सारे,"
ही 'निशा' ठेवून हा विश्वास, जागी...

गझल: 

प्रतिसाद

सन्माननीय चांदणी,
आपल्याला गझल जमलीच! उत्तम शेर रचलेत. खालील तीन शेर फार सुंदर.
कोण झाला वेदनेचा प्रेमरोगी?
आसवांची अंतरी  आरास जागी..
आजही काळीज माझे जाळतो रे..
तू दिलेला घाव होता 'खास' जागी..!
"सुर्य तो  फेडेल माझे पांग सारे,"
ही 'निशा' ठेवून हा विश्वास, जागी...
व्वाह!


 

सर्वच  शेर  जमून आलेले आहेत, त्यातही-
"आजही काळीज माझे जाळतो रे..
तू दिलेला घाव होता 'खास' जागी..!"   हा  कातिल शेर आहे.
शुभेच्छा.

चांदणीताई,
गझल चांगली आहे. मतल्यातील दोन ओळींचा एकमेकांशी संबंध काय ते सांगाल काय? खास शेर ठीक आहे. गझलियत वाढायला हवी. सूर्य पांग फेडणार या शेरात गझलियत आहे.
[प्रतिसाद संपादित]

"सुर्य तो  फेडेल माझे पांग सारे,"
ही 'निशा' ठेवून हा विश्वास, जागी...

भंगली स्वप्ने तरी का आस जागी?
शांत झाली  भूक, का ही प्यास जागी?
कवी ( कवयित्री शब्द सारखा सारखा लिहिणे अवघड असल्यामुळे यापुढे कवी लिहीत आहे ) येथे एका दुखी मनस्थितीत आहे. आता इथे भूक शांत झाल्यावर तहान का आहे असा एक प्रश्न विचारला गेला आहे. ही भूक बहुधा स्वप्न भंगण्याची असावी. म्हणजे स्वप्न पाहणे जणु गुन्हा आहे अशा पद्धतीने जगाने ती स्वप्न मोडली. आता स्वप्न बघण्याची भूक शमली. पण स्वप्न पूर्ण होण्याची तहान मात्र अजुनही तशीच आहे. ही एक मनाची अवस्था असून तिचा संदर्भ लावणे अगदीच अशक्य नाही. म्हणजे जे पाहिजे ते लाभले नाही याच्यात प्रेम, समाधान, विश्वास, मित्रांची खरी मैत्री वगैरे अनेक गोष्टी येऊ शकतात.


कोण झाला वेदनेचा प्रेमरोगी?
आसवांची अंतरी  आरास जागी..
हा शेर कवीने स्वतःच समजावून सांगावा.

भोग का भोगून झाले भोगवाद्या-
जाहली का विठ्ठलाची आस जागी?
हा एक जहरी शेर आहे. समाजातील बरबटलेल्या वृत्तीच्या लोकांवर केलेली टीका. सौ चुहे खाके सारखे वागणार्‍या लोकांचे पितळ उघडे पाडले आहे.

टाळला संसार अन् संन्यस्त झाला..
कृष्णलीलेची तरीही रास जागी..
विट्ठल व रास यातील एकच शेर असता तरी चालले असते. पण यावर समीक्षकांचे नियंत्रण असू शकत नाही.

आजही काळीज माझे जाळतो रे..
तू दिलेला घाव होता 'खास' जागी..!
आजही काळीज जाळतो हे वाक्य वरवर योग्य वाटले तरी ते अतिशय साधे विधान आहे. खास जागी दिलेला घाव हा माणसाला अतिशय दु:खी करणार हे निश्चीत! असा माणूस नुसते काळीज जळतंय म्हणुन गप्प बसणार नाही. तो काहीतरी रंजित लिहील. खूप विरोधाभास आणेल. किंवा धक्कातंत्र किंवा उपमा वापरेल. हा शेर एक सरळ विधान आहे.

"सुर्य तो  फेडेल माझे पांग सारे,"
ही 'निशा' ठेवून हा विश्वास, जागी...
हा शेर जरी उत्तम असला तरी त्यात 'ही' हा शब्द कसा टाळता येईल ते बघितले पाहिजे. तसेच 'तो' सूर्य म्हणणे कसे टाळता येईल ते पाहिले पाहिजे.विश्वास या शब्दाला मात्र 'हा' जरुरीचा आहे. शेराचा आशय चांगला आहे.
एकंदर गझल चांगली.
१०० पैकी ४२

कशी वाचायची राहिली कोण जाणे?
सर्वच शेर आवडले. कोणता असा खास सांगता येणार नाही. तरीही ...
आजही काळीज माझे जाळतो रे..
तू दिलेला घाव होता 'खास' जागी..!
वाव्वा!
कलोअ चूभूद्याघ्या

चांदणी ,
शेवटचा सूर्य वाला  शेर  छान  जमला  आहे.गंभीर  समीक्षक  म्हणतात  तसे  त्यातला  'ही ' टाळता आला  तर  पहा.

चांदणी ,
शेवटचा सूर्य वाला  शेर  छान  जमला  आहे.गंभीर  समीक्षक  म्हणतात  तसे  त्यातला  'ही ' टाळता आला  तर  पहा.

शेवटचा 'सूर्य' चा शेर छान जमला आहे. जमत असेल तर त्यातील 'ही' काढून टाकण्याचा प्रयत्न करा.

टोपण नाव शेवटच्या शेरात चांगले बसेल की? 
'चांदणी' ठेवून हा विश्वास जागी!
त्यात परत चांदण्या रात्रभर जाग्या असतात असाही एक अर्थ निघू शकेल.
 

मित्र ज्ञानेश, तुझेही व्यक्तिश: आभार!!
भूषणकाका, तिलकधारीकाका, समीरजी, गंभीर समीक्षकजी, अजयजी, सुनेत्राजी...प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासुन आभार!!
 
$मतला: तारुण्याच्या उंबरठ्यावर विद्यार्थिदशेत नव्या संधीची, ध्येयाची, आकांक्षेची क्षितीजे खुणावत असतात, काही ध्येय अपूर्ण रहातात पण तरिही ती ध्येय पूर्ण करण्याची आस, ओढ जिंवत(जागी) आहे. जी काही स्वप्ने पूर्ण झाली म्हणजेच त्यांची भूक शांत झाली असली तरी नव्या स्वप्नांची तहान आहे.
 
$गंभीर समीक्षकांनी सांगितलेले स्पष्टिकरणही मतल्याला लागू होऊ शकते. पण नम्रपणे सांगते की मला तो अर्थ अभिप्रेत नाही. कारण आपली स्वप्ने जग मोडू शकते यावर माझा विश्वास नाही कारण मुळातच ही स्वप्ने वैयक्तिक आहेत. प्रेम,समाधान, विश्वास, मित्रांची खरी मैत्री या गोष्टीत भंग (याबाबतीत मी अभंग आहे :) झालेल्या व्यक्तीची तहान एका ठराविक काळानंतर अपेक्षाभंग होउन थांबु शकते...जगाचा वीट येऊ शकतो..त्यामुळे परत आस किंवा तहान लागेल की नाही...साशंक..म्हणुन हा अर्थ जरा मला रुचला नाही.
 
$हा शेर मी स्व:तालाच उद्देशुन बोलत आहे, माझ्या वेदनेत अजुन मी पुरती बुडालेली नाही, कारण आसवांची आरास जागी आहे.. (आसवे अजुन ढळलेली नाहीत ती ढळण्याच्या प्रतिक्षेत आहे.)
 
$ ३ व ४ था शेर मी परस्पर विरोधी विचारसरणी असलेल्या लोकांवर रचले आहेत. त्यामुळे दोन्ही शेरांचा उल्लेख करणे मला आवश्यक वाटले.
 
$भूषणकाका, तुम्ही सुचवलेला बदल आवडला..त्यामुळे त्या शेरातील "ही" शब्द टाळता येतो. (चांदणी हे माझे टोपण नाव नाही ...पाळण्यातले नाव आहे. टोपण नाव शेरात ठेवण्यासारखे नाही :)
तुमची तक्रार मान्य (फुलांनी काय हो केले? या गझलेतील प्रतिसादामधील) परंतु ही तर माझी सुरवात आहे,
गझला लवकर सुचत नाहीत. (हा माझा दोष असेल.)
अजुन तितकास अभ्यास नाही. थोडा ?? वेळ जावा लागतो...
 
विनंती: प्रतिसाद देताना नावानेच उल्लेख करावा. आदरणीय, माननीय ही विशेषणे पचायला जरा जड जातात. तुम्हां सर्वं मोठ्यांकडुन आदराची नव्हे तर सहकार्यांची, मार्गदर्शनाची अपेक्षा आहे.

लोभ असावा..

टाळला संसार अन् संन्यस्त झाला..
कृष्णलीलेची तरीही रास जागी..


आजही काळीज माझे जाळतो रे..
तू दिलेला घाव होता 'खास' जागी..!
...मस्त...............

खुप छान आहे

कोण झाला वेदनेचा प्रेमरोगी?
आसवांची अंतरी  आरास जागी..

खुप आवडले

चांगली आहे.

खूप आवडली.

आजही काळीज माझे जाळतो रे..
तू दिलेला घाव होता 'खास' जागी..!
वाव्वा.. एकंदर गझल छान झाली आहे.

वा..सुन्दर..
हा शेर आवड्ला

आजही काळीज माझे जाळतो रे..
तू दिलेला घाव होता 'खास' जागी..!