अलामत? सोड चिंता तू.....
तुझे चालेल आरामात 'भूषण' ,सोड चिंता तू
न चिंतांची तुला काहीच चणचण, सोड चिंता तू
तुला जे शक्य आहे तेवढे दे अन रिकामा हो
जमाना बैलही मागेल गाभण, सोड चिंता तू
'मगाचा जाब पुसणारा' नसे हा वेगळा आहे
पुन्हा चालेल आता तेच कारण, सोड चिंता तू
मला दररोज किस्मत टाळते, दररोज मी म्हणतो
"तिला आली असावी आज अडचण, सोड चिंता तू"
तुला भीती जयाची तो, पहा आला, पहा आला
पहा गेला, पहा गेलाच तो क्षण, सोड चिंता तू
भटक दुनिया, तुझ्या येतील चिंता मागुनी, त्यांची
जरा होईल यातायात, वणवण, सोड चिंता तू
तुझ्या गालावरी पाऊस, हृदयी पीक अश्रुंचे
तुझा दररोजचा झालाय श्रावण, सोड चिंता तू
कुणी बोचायला येवो, कुणी टोचायला येवो
तुझ्या गझलेतल्या शब्दात दाभण, सोड चिंता तू
जिथे बेडूकवस्ती, ओंडक्याचा होतसे राजा..
तिथे नसतात असले प्रश्न 'का?','पण!" सोड चिंता तू
जराश्या दावणी सोडून दे, चरुदेत त्यांनाही
मनाचे टाक तू काढून झाकण, सोड चिंता तू
प्रतिसाद
सुनेत्रा सुभाष
शुक्र, 02/01/2009 - 12:56
Permalink
प्रतिसाद
मतला खूप खूप छान. दाभण ,झाकण वाले शेर छान.
प्रसाद लिमये
शुक्र, 02/01/2009 - 14:36
Permalink
सगळीच गझल
सगळीच गझल सुरेख आहे
पण हे दोन आवडले
तुझे चालेल आरामात 'भूषण' ,सोड चिंता तू
न चिंतांची तुला काहीच चणचण, सोड चिंता तू
तुला जे शक्य आहे तेवढे दे अन रिकामा हो
जमाना बैलही मागेल गाभण, सोड चिंता तू
आणी हा खूप आवडला
मला दररोज किस्मत टाळते, दररोज मी म्हणतो
"तिला आली असावी आज अडचण, सोड चिंता तू"
अजय अनंत जोशी
शुक्र, 02/01/2009 - 22:17
Permalink
श्रावण, दाभण, झाकण
मस्त.
तुझा दररोजचा झालाय श्रावण - व्वा!
हे ही जमलंय का बघा.
तिचा प्रतिसादही मागू नको रे साद घालूनी...
करू दे भावनांची तीच राखण..., सोड चिंता तू
कलोअ चूभूद्याघ्या
गंभीर समीक्षक
शनि, 03/01/2009 - 11:58
Permalink
रदीफेची चिंता करावी!
तुझे चालेल आरामात 'भूषण' ,सोड चिंता तू
न चिंतांची तुला काहीच चणचण, सोड चिंता तू
मध्यंतरी एका कवीने असे विधान भर सभेत केले होते की अलामत म्हणजे काफियातील शेवटची दोन अक्षरे! हे मान्य केले तर या कवीला घाबरण्याचे कारण नाही. म्हणजे कटककर, पुरे कर अन शरम कर हे तीनही काफिये एकाच गझलेत घेता येतील. कारण त्यातील 'कर' समान आहे. एक आपले उदाहरण! अख्खी गझल स्वगत स्वरुपात करणे हे एक जरासे नावीन्य आहे. इथे कवी स्वतःलाच खात्री देत आहे की तुझे सगळे व्यवस्थित होणारच, कारण व्यवस्थित न होण्याची कितीतरी कारणे तुझ्याकडे आहेत. तेव्हा तू चिंता सोडुन दे. जरा विनोदी ढंगाने कारुण्य मांडले आहे. पहिल्या ओळीचा समारोप दुसर्या ओळीत ठीक केला आहे. पण मतला इतका काही उंचीवर गेला नाही याचे कारण 'चिंता' हा शब्द दुसर्या ओळीत पुन्हा वापरला आहे. त्याऐवजी 'शत्रुंची', 'दु:खांची' वगैरे असते तर जरा जास्त विरोधाभास प्रकट होऊ शकला असता.
तुला जे शक्य आहे तेवढे दे अन रिकामा हो
जमाना बैलही मागेल गाभण, सोड चिंता तू
भयंकरच वैतागलेला दिसतोय कवी! सारखे आपले कुणी ना कुणीतरी येऊन काही ना काही मागत असावे. मात्र हा शेर साधा आहे. म्हणजे असे, की आशय काही फार भिडणारा नाही. हा शेर सादर करताना ( म्हणजे बोलून सादर करताना - मुशायर्यामधे ) पहिली ओळ दोनदा किंवा तीनदा म्हणुन 'बैलही मागेल गाभण' च्या वेळेस ओरडावे लागेल व मुशायर्यात फक्त कवींनाच यायची परवानगी द्यावी लागेल, अन्यथा शेर समजणारच नाही. या शेरात कवी 'गझल'पासून जरा जास्तच दूर गेलेला दिसत आहे.
'मगाचा जाब पुसणारा' नसे हा वेगळा आहे
पुन्हा चालेल आता तेच कारण, सोड चिंता तू
चांगला शेर !
मला दररोज किस्मत टाळते, दररोज मी म्हणतो
"तिला आली असावी आज अडचण, सोड चिंता तू"
रदीफ लटकलीय आपली शेराला! जर किस्मतीला 'अडचण' आली असेल तर कवीने चिंता सोडायला पाहिजे की करायला पाहिजे?
तुला भीती जयाची तो, पहा आला, पहा आला
पहा गेला, पहा गेलाच तो क्षण, सोड चिंता तू
पहिल्यांदा असे वाटले की विजयाची भीती आहे की काय? पण नाही. 'जयाची' म्हणजे 'ज्याची' आहे. हा शेर वाचल्यावर मात्र आत्ता या क्षणी सुद्धा आपण एक एक क्षण मागे टाकत चाललो आहोत याची जाणीव झाली. या शेरात 'सोड चिंता तू' चांगले बसले आहे.
भटक दुनिया, तुझ्या येतील चिंता मागुनी, त्यांची
जरा होईल यातायात, वणवण, सोड चिंता तू
अनावश्यक शेर! हा कवी सुचतील ते काफिया घेऊन शेर रचतो असे आमचे पुर्वीपासूनचे म्हणणे आहे. काही बाबतीत स्पष्ट बोलणे आवश्यक ठरते.
तुझ्या गालावरी पाऊस, हृदयी पीक अश्रुंचे
तुझा दररोजचा झालाय श्रावण, सोड चिंता तू
चुकलेला शेर! पहिले म्हणजे 'हे तुमचे दररोजचेच झालेय' असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सर्वसाधारणपणे ते 'चिंतेचे' कारण असते. इथे श्रावण दररोजचा होणे ही खरी तर 'काव्यक्षेत्रात' चांगली मानली जाणारी बाब वेगळ्याच अर्थाने वापरली आहे. डोळ्यातील अश्रू गालावर येतात हा झाला गालावरचा पाऊस! अन ते अश्रू का येतात तर हृदयात अश्रुंचे पीक असते म्हणुन! वास्तविकपणे सुरुवात चांगली करून शेवट मात्र चुकला आहे. 'असा श्रावण' असताना चिंता सोडायची कशी? चिंता वाटायला पाहिजे.
कुणी बोचायला येवो, कुणी टोचायला येवो
तुझ्या गझलेतल्या शब्दात दाभण, सोड चिंता तू
अनावश्यक शेर!
जिथे बेडूकवस्ती, ओंडक्याचा होतसे राजा..
तिथे नसतात असले प्रश्न 'का?','पण!" सोड चिंता तू
अनावश्यक शेर!
जराश्या दावणी सोडून दे, चरुदेत त्यांनाही
मनाचे टाक तू काढून झाकण, सोड चिंता तू
अनावश्यक शेर! चिंतांना चरायला पाठवणे ही खरी तर अतिशय सुंदर कल्पना आहे. पण त्यात फक्त 'दावणी' सोडून दे अन त्यांना चरायला पाठव असे म्हणणे हा त्या कल्पनेवर केलेला अन्याय आहे.
'मगाचा जाब पुसणारा नसे' हा एकच शेर भिडला.
पहा गेलाच तो क्षण - हा एक शेर वाचणार्याला एकदम जमिनीवर आणतो खरे, पण त्यातील 'जयाची' या शब्दाऐवजी काहीतरी पर्याय वापरायला हवा!
चांगल्या रदीफेला वाया घालवू नये असे आमचे स्पष्ट म्हणणे आहे.
ज्ञानेश.
शनि, 03/01/2009 - 20:15
Permalink
तुझा दररोजचा झालाय श्रावण...
भूषणजी... मनापासून अभिनंदन.
मी वाचलेल्या तुमच्या सगळ्या गझलांत ही सर्वश्रेष्ठ गझल आहे. स्वतःला उद्देशून लिहिलेली संपूर्ण संवादात्मक गझल यापुर्वी तरी मी वाचलेली नाही. (एखादा शेर वाचलाय.)
नावीन्य आहे, वृत्त आहेच, मनोव्यापार आहेत, गझलियत आहे...
"जराही ठेवले नाहीस कारण... सोड चिंता तू !!":)
असो.
हे शेर जास्त आवडले-
तुला जे शक्य आहे तेवढे दे अन रिकामा हो
जमाना बैलही मागेल गाभण, सोड चिंता तू
'मगाचा जाब पुसणारा' नसे हा वेगळा आहे
पुन्हा चालेल आता तेच कारण, सोड चिंता तू
मला दररोज किस्मत टाळते, दररोज मी म्हणतो
"तिला आली असावी आज अडचण, सोड चिंता तू"
तुझ्या गालावरी पाऊस, हृदयी पीक अश्रुंचे
तुझा दररोजचा झालाय श्रावण, सोड चिंता तू.. अप्रतिम.
"तुला भीती जयाची तो" ऐवजी "तुला ज्याची भिती वाटे.." चालेल का? (माफ करा, पहिल्यांदाच असे बदल कुणाला सुचवतोय.)
परत एकदा अभिनंदन.
भूषण कटककर
शनि, 03/01/2009 - 23:21
Permalink
अवश्य चालेल
ज्ञानेश,
अवश्य चालेल. भीती चे भिती करायची इच्छा होत नव्हती म्हणुन जयाची केले.
दिलखुलास प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद!
याच गझलेवर नेहमीप्रमाणे खास आपल्या थाटाचा एक शेर रचा अशी माझी फर्माईश!
भूषण कटककर
सोम, 12/01/2009 - 10:33
Permalink
धन्यवाद!
श्री समीक्षक,
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! इतरांचेही धन्यवाद!
श्री गंभीर समीक्षक
आपण प्रत्येकाच्या गझलेला देत असलेला प्रचंड वेळ पाहून सद्गदित व्हायला होते. आपल्या रसिकतेवर एक गझल करायचे मनात होते. पण तेवढा वेळ नसल्याने वरच्याच अनावश्यक गझलेत काही शेर ऍड करत आहे.
( अर्थातच, वरच्या गझेलेप्रमाणेच हे शेरही स्वगतच आहेत. )
अनावश्यक जिथे तू खुद्द तेथे काय गझलेचे?
समीक्षेची तिला होईल लागण, सोड चिंता तू
विनोदी वाटते गंभीर सारे जग तुला आता
कसाही वाग, बुद्धी ठेव तारण सोड चिंता तू
मुखवटे धारुनी जमतात जगणे साजरे करण्या
मने काळी, वरी अंगास साबण, सोड चिंता तू
गंभीर समीक्षक
सोम, 12/01/2009 - 22:45
Permalink
राग
कवी भूषण,
तुला आमचा राग येणे साहजिक आहे. आम्ही पहिल्यापासून हेच सांगत आलो आहोत की खूप विचार करून शेर रचावेत. इंपल्सिव्ह रचना करण्यात एक धोका असतो. तत्क्षणी असलेली मनस्थिती ते सुचवते, नंतर ती मनस्थिती ओळखुच येत नाही. रागवू नको. चांगल्या गझला कर!
मुखवटे धारुनी...
या तुझ्या शेरावर आम्हाला एकच सांगायचे आहे...
आप्पा उर्फ मुकुंद गोडबोले
सध्या वास्तव्य - चेन्नई
मूळ शहर - अल्वर !
धन्यवाद!
गंभीर समीक्षक