तसे नसेलही !
...................
तसे नसेलही !
....................
तसे नसेलही; मला उगाच वाटले तसे !
असो ! कधीतरी चुकून व्हायचेच हे असे !
खऱोखरीच एकरूप जाहलो तुझ्यासवे...
तुझेच रूप दावती उगाच काय आरसे ?
लपाछपी मनात या अशी सदैव चालते......
कधी उदास वाटते; कधी प्रसन्न छानसे !
हवे तसे जगायचे असेल स्वप्नही जरी...
हवी तशी कधी कुणास भेटतात माणसे ?
असेच सांगतोस...वाघ पाहिलास तू जणू...
चुकून पाहिलेस दोन-चार तू म्हणे ठसे !
चुकून भेटलो; पुन्हा निघून दूर चाललो...
मला न खंत वाटली ! तुला न दुःख फारसे !
तुझ्यापरी निलाजरेपणा कुणी करायचा ?
कळे न, वागणे तुला; तुलाच हे जमे कसे !
नसेल तोच अर्थ वा नसेलही तशी छटा...
जरूर मान मात्र तू, कळेल जे तुला जसे !
नको तिथे उगाचच्या उगाच बोललास तू...
मना, असे न यापुढे करून घ्यायचे हसे !
- प्रदीप कुलकर्णी
प्रतिसाद
भूषण कटककर
मंगळ, 30/12/2008 - 10:16
Permalink
स्मूथली म्हणता येते.
जीभेला काहीही कष्ट न पडता संपूर्ण गझल अतिशय सुलभपणे म्हणता येते. अर्थात त्यामागे दीर्घकाळचा गझलेचा सहवास आहे, नो वंडर,!
मला व्यक्तिशः मतल्यातील 'वाट ले तसे' व 'व्हायचेच हे असे' यानंतर सर्वत्र 'ए' येत रहावा अशी अपेक्षा व्यक्त करावीशी वाटते. म्हणजे 'आरसे' मधील 'आ' येऊ नये अशी अपेक्षा! कदाचित चूक असेल ही अपेक्षा, पण म्हणताना मला तरी 'राग' बदलल्याची जाणीव होते तसे वाटले.
चुक भुल द्या घ्या!
प्रदीपसाहेब,
काही म्हणा, पण आपले काही आमच्यावर प्रेम दिसत नाही. नाहीतर पुर्वीसारख्या जोशदार गझला केल्या असतात. अर्थात ही गोष्टही खरी आहे की आपल्याकडुन नेहमीच वाढीव अपेक्षा असतात. पण अलीकडच्या आपल्या गझला जरा 'सावत्र' मुलावर केलेल्या प्रेमासारख्या वाटतात खरे. हे सगळे म्हणणेही आपल्याच गझलांबद्दल शक्य आहे, कारण आपणच आमच्या अपेक्षांना उंचीवर नेऊन ठेवले आहेत.
गंभीर समीक्षक
मंगळ, 30/12/2008 - 15:11
Permalink
उगाच वाटले तसे....
तसे नसेलही; मला उगाच वाटले तसे !
असो ! कधीतरी चुकून व्हायचेच हे असे !
वा! अतिशय सुंदर सुरुवात! तुझे विभ्रम, माझ्याकडे पाहणे, हसल्यासारखे करणे, अगदी माझ्याचसाठी असाव्यात अशा गोष्टी केल्यासारखे वाटणे...या सर्वांनी माझा गैरसमज झाला होता. असा गैरसमजही कधीतरी होणारच की? तो होण्याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे मी काही कुणी सन्यस्त वा संसाराला त्यागणारा माणूस नाही अन दुसरे म्हणजे तू मुळी आहेसच तशी..कुणीही मुद्दाम गैरसमज करून घ्यावा अशी. सुंदर सुरुवात!
खऱोखरीच एकरूप जाहलो तुझ्यासवे...
तुझेच रूप दावती उगाच काय आरसे ?
मी स्वतःला आरशात पाहायला जावे तर तिथेही मला माझ्याऐवजी तूच दिसावेस ना? बघ किती एकरूप झालो आहे मी तुझ्याशी? ( कदाचित गर्भितार्थ - तुला त्याचे काहीच नाही हे किती दुर्दैव!) जरासा मतल्यापेक्षा कमी उंची गाठणारा शेर! पण सुंदरच!
लपाछपी मनात या अशी सदैव चालते......
कधी उदास वाटते; कधी प्रसन्न छानसे !
साधे विधान!
हवे तसे जगायचे असेल स्वप्नही जरी...
हवी तशी कधी कुणास भेटतात माणसे ?
'हवे तसे जगणे' किंवा 'जगू शकणे' ही गोष्ट सर्वसाधारणपणे भौतिक बाबींच्या संदर्भात प्रचलित आहे. म्हणजे ४५व्या वर्षी रिटायर्ड होऊन आम्ही कायमचे आमच्या फार्म हाऊसवर रहायला जाणार वगैरे अशा स्वरुपाच्या इच्छांना साधारणपणे 'हवे तसे जगणे' असा शब्दसमुह वापरला जातो. इथे मात्र त्याचा अर्थ वेगळा आहे. इथे 'हवे तसे जगणे' हे भेटणारी माणसे हवी तशी असण्यावर अवलंबून तरी आहे किंवा भेटणारी माणसे हवी तशी असणे म्हणजेच हवे तसे जगू शकणे आहे. काय अप्रतिम कल्पना आहे! फक्त भोवतालची चावरी, दुखावणारी, चिकटणारी, कृद्ध वा सतत अपेक्षा बाळगणारी माणसे बदलली अन मित्रासारखी झाली की मला हवे तसे जगता येईल, पण ही माणसे कसली बदलणार? वा वा!
असेच सांगतोस...वाघ पाहिलास तू जणू...
चुकून पाहिलेस दोन-चार तू म्हणे ठसे !
इथे कवीने एकदम भूमिका बदलली आहे. आत्तापर्यंत कवी थोडा अंतर्मुख असल्याप्रमाणे किंवा स्वगत असल्याप्रमाणे बोलत होता. इथे कवी एकदम आत्मविश्वासयुक्त वा धीटसा झालेला आहे. अरे माणसांनो, तुम्ही मला कसली फुशारकी सांगताय की मी कसे जगायला पाहिजे होते अन तुम्ही स्वतः कसे जगत आलात? माझ्या दैवात जे भोग आले ते जर तुम्हाला समजले तर तुमची पाचावर धारण बसेल. तुम्हाला त्याची नुसती थोडीशी चुणूक काय दिसली अन लगेच हवेतल्या बाता करता? किंवा, काय तुझे आविर्भाव, काय या फुशारक्या? जणू काही अटकेपार झेंडा लावून आलास! आत्ता आत्ता कुठे तुला लढाई काय आहे याची नुसती चुणुक दिसलीय बेट्या...! मात्र, ठसे हा काफिया वाघाऐवजी कुठल्यातरी नाजूक बाबीचे ठसे या अर्थाने वापरला असता तर जास्त भावला असता असे एक आपले वाटते. कवीला वरील आशयाचेच विधान करायचे असल्यास ठीकच आहे, पण तसा आग्रह नसल्यास आमच्यामते 'ठसे' हा काफिया खूप प्रभावी होईल.
चुकून भेटलो; पुन्हा निघून दूर चाललो...
मला न खंत वाटली ! तुला न दुःख फारसे !
या शेरामधे 'चुकून भेटलो' या शब्दांना अत्यंत महत्व आहे. जी भेट हेतुपुरस्पर होती ती संपली तर दु:ख होणारच. पण आपण तर चुकुनच भेटलेलो.
तुझ्यापरी निलाजरेपणा कुणी करायचा ?
कळे न, वागणे तुला; तुलाच हे जमे कसे !
प्रियकराला प्रेयसी सतत टाळत आहे. तो मात्र तिच्या प्रेमात बेभान होऊन तिच्या संपर्कात येण्याची एकही संधी सोडत नाहीये. त्यात त्याचा अपमान होतो, पाणउतारा होतो पण बेहत्तर! पण कधीतरी एकांतात स्वत:चीच मानसिक दुर्दशा पाहून कवी स्वत:लाच सांगतो, किती निर्लज्जासारखा तिच्या प्रेमात अपमानीत होत राहशील? तुला एवढे जमते कसे असे करणे? बरीचशी उर्दू शायरी या विषयावर आहे. या कवीचा हा शेर पाहून एकदम उर्दू जमाना आठवला. आम्ही अल्वर ( राजस्थान ) मधून खास कानपूरला जाऊन एक मुशायरा ऐकला होता पुर्वी. त्यातल्या सूत्रसंचालकाने ( तोही एक कवीच होता ) म्हंटले की ज्या ओळी ऐकून माणूस 'हरवतो' त्या ओळी म्हणजे कविता. व्वाह! काय सुंदर व्याख्या आहे पहा. या कवीच्या या शेरामुळे आम्हाला एकदम आम्ही पुर्वी केलेले उर्दू शायरीचे वाचन आठवले. ( अजिबात गैरसमज करू नये की आमच्या मनात 'अनुकरण' वगैरे सारख हलके व तुच्छ विचार आहेत. याच कवीचे अनुकरण करावे अशी या कवीची इतर शायरी आहे. तसेच पुण्यात या कवीला अत्यंत 'सोबर' वागणारा कवी असे मानतात. कवी असुन परत माणूस म्हणुनही उत्तम असणे ही दुर्मीळ गोष्ट आहे. असो. वैयक्तिक काही लिहायचेच नसते. )
नसेल तोच अर्थ वा नसेलही तशी छटा...
जरूर मान मात्र तू, कळेल जे तुला जसे !
ही जर या कवीची स्वतःच्या गझलांबाबतची भूमिका असेल तर मात्र आमचा ठाम विरोध आहे तिला. काहीही झाले तरी आपल्याला काय म्हणायचे आहे ते स्पष्ट व्हायलाच हवे. त्यानंतर जर आणखीन काही अर्थ निघत असतील तर फारच उत्तम! एक शेर म्हणुन या ओळींकडे पाहताना हे प्रेयसीच्या वागण्यामुळे व्यथित झालेल्या स्वतःला सांगणे असू शकते असे वाटते. तसे असेल तर फारच सुंदर ओळी. कवीला अभिप्रेत अर्थ वेगळा असल्यास एक तर तो आमच्या आकलनशक्तीपलीकडचा तरी आहे किंवा हा शेर फसलेला तरी आहे.
नको तिथे उगाचच्या उगाच बोललास तू...
मना, असे न यापुढे करून घ्यायचे हसे !
हाही तसा एक साधाच शेर वाटतो. साधा या अर्थाने की शेरातील संदेश एखादा माणूस आपल्या मनाला कोणकोणच्या परिस्थितीत देऊ शकतो, कोण कोण असा संदेश आपल्या मनाला देऊ शकतो वगैरेंची व्याप्ती बरीच आहे.
कवीचा ( दर्जेदार कवीचा ) सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे रचनेच्या उंचीचे सातत्य टिकवून ठेवणे! प्रत्येक रचनेत, प्रत्येक द्विपदीमधे, प्रत्येक शब्दमांडणीमधे वगैरे. तसेच, ज्या मनस्थितीत सर्वश्रेष्ठ रचना निर्माण होतात ती मनस्थिती पुन्हा पुन्हा निर्माण करणे किंवा निर्माण होणे हे ही अवघड असते किंवा नियंत्रणातील नसते. त्यामुळे समोर आलेल्या रचनेचा आस्वाद घेणे ही काव्यक्षेत्रातली सर्वात आनंदाची बाब आहे. कधी अचानक कुठे काय हाती लागेल याची शाश्वतीच नाही. आणि हीच त्यातील 'अनसर्टंनटी' ( जी क्रिकेटमधे असते ) ती कवितेला दिलचस्प बनवते.
जयन्ता५२
मंगळ, 30/12/2008 - 17:00
Permalink
भूषणशी सहमत!
तसे नसेलही; मला उगाच वाटले तसे !
असो ! कधीतरी चुकून व्हायचेच हे असे !
खऱोखरीच एकरूप जाहलो तुझ्यासवे...
तुझेच रूप दावती उगाच काय आरसे ?
---- हे कसे?
हवे तसे जगायचे असेल स्वप्नही जरी...
हवी तशी कधी कुणास भेटतात माणसे ?
असेच सांगतोस...वाघ पाहिलास तू जणू...
चुकून पाहिलेस दोन-चार तू म्हणे ठसे !
चुकून भेटलो; पुन्हा निघून दूर चाललो...
मला न खंत वाटली ! तुला न दुःख फारसे ! ---- हे मात्र खास "प्रकु" ढंगाचे मस्त शेर !
जयन्ता५२
प्रदीप कुलकर्णी
मंगळ, 30/12/2008 - 22:52
Permalink
मनापासून आभार
प्रतिसादांबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बुध, 31/12/2008 - 18:37
Permalink
ओहो, क्या बात है !
गझल आवडली !
हवे तसे जगायचे असेल स्वप्नही जरी...
हवी तशी कधी कुणास भेटतात माणसे ?
व्वा ! हा शेर तर लैच आवडला !!!
पुलस्ति
बुध, 31/12/2008 - 21:26
Permalink
छान!
मतला, निलाजरेपणा आणि वाघ हे शेर फार आवडले!
ज्ञानेश.
गुरु, 01/01/2009 - 00:18
Permalink
हे शेर-
हवे तसे जगायचे असेल स्वप्नही जरी...
हवी तशी कधी कुणास भेटतात माणसे ?
चुकून भेटलो; पुन्हा निघून दूर चाललो...
मला न खंत वाटली ! तुला न दुःख फारसे !
आवडले.
आभार!
प्रदीप कुलकर्णी
गुरु, 01/01/2009 - 15:12
Permalink
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार !
या संकेतस्थळावर नियमितपणे व अधूनमधून येणाऱ्या सर्व वाचकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
बोलू का
शुक्र, 02/01/2009 - 10:35
Permalink
विचार चांगला ... पण...
पूर्ण झाला असे नाही वाटले.
आरसे, माणसे, लपाछपी हे चांगले जमविले आहे.
पण तरीही शंका मनात येतच आहे की असे विचार वाचताना (ते लयबद्ध आहेत याबद्दल शंकाच नाही..) का कुणास ठाऊक? पण.. 'मनाचे श्लोक' वाचल्यासारखे वाटत होते. कदाचित ती तुमची लिहिण्याची खासियतही असेल. मी मान्य करतो.
तुमची सहजता मात्र वाखाणण्यासारखी आहे. असो.
नववर्षाच्या शुभेच्छा!
(तसा मी फारसा बोलत नाही.)
चित्तरंजन भट
शुक्र, 02/01/2009 - 11:54
Permalink
हवी तशी कधी कुणास भेटतात माणसे ?
हवे तसे जगायचे असेल स्वप्नही जरी...हवी तशी कधी कुणास भेटतात माणसे ?
वाव्वा! मतला, खंत द्विपदी विशेष आवडल्या. वाघाचीदेखील. म्हटले तर गमतीदार आहे...प्रदीपराव, छानच गझल आहे.
अजय अनंत जोशी
शुक्र, 02/01/2009 - 21:53
Permalink
छान.
नसेल तोच अर्थ वा नसेलही तशी छटा...
जरूर मान मात्र तू, कळेल जे तुला जसे !
व्वा!
बाकीही आवडले.
कलोअ चूभूद्याघ्या
सोनाली जोशी
गुरु, 15/01/2009 - 21:49
Permalink
माणसे
हवे तसे जगायचे असेल स्वप्नही जरी...
हवी तशी कधी कुणास भेटतात माणसे ?
वाह!
हा शेर एकदम मनाला भिडला. सर्व गझलच दर्जेदार आहे , नेहमीप्रमाणे.
सोनाली
सुनेत्रा सुभाष
शुक्र, 16/01/2009 - 10:26
Permalink
प्रतिसाद
मतला व पाचवा शेर आवडले
अच्युत
शुक्र, 16/01/2009 - 16:35
Permalink
तसे
तसे नसेलही; मला उगाच वाटले तसे !
असो ! कधीतरी चुकून व्हायचेच हे असे !
हा "असो" शब्द सगळ्या शेराचा अर्थ सांगून गेलाय,
तिलकधारी
शनि, 17/01/2009 - 10:34
Permalink
गझलियत
भेटतात माणसे अन तुला न दु:ख फारसे हे दोनच शेर गझलेचे आहेत.
समीर चव्हाण (not verified)
बुध, 28/01/2009 - 11:45
Permalink
छान
लपाछपी मनात या अशी सदैव चालते......
कधी उदास वाटते; कधी प्रसन्न छानसे !चुकून भेटलो; पुन्हा निघून दूर चाललो...
मला न खंत वाटली ! तुला न दुःख फारसे !
वरील शेर वाचताना मला माझ्या एका उर्दू शेराची आठवण झाली:
हम मिले दिलका मिलना मुश्किल था,
हमको अफसोस है, गिला भी है|धन्यवाद.
चांदणी लाड.
गुरु, 29/01/2009 - 00:28
Permalink
हवी तशी कधी कुणास भेटतात माणसे ?
तसे नसेलही; मला उगाच वाटले तसे !
असो ! कधीतरी चुकून व्हायचेच हे असे !
हवे तसे जगायचे असेल स्वप्नही जरी...
हवी तशी कधी कुणास भेटतात माणसे ?
चुकून भेटलो; पुन्हा निघून दूर चाललो...
मला न खंत वाटली ! तुला न दुःख फारसे !
गझल आवडली...हे शेर मनाला भिडणारे..
गौतमी
गुरु, 29/01/2009 - 10:16
Permalink
कधी प्रसन्न छानसे
अशी गझल वाचली की खरच प्रसन्न वाटते.