प्रेम बर्फासारखे...

पावसाने चिकटली माती किती !
घट्ट असुनी निथळली नाती किती !!

प्रेम बर्फासारखे असते, पहा ..
वितळले अन् राहिले हाती किती !

मिळविताना दीप वंशाला तुझ्या ..
तूच बघ रे विझविल्या वाती किती !

पेरता समतास्वरूपी बीज हे ..
उगवल्या खो-यांतुनी जाती किती !

रात्रभर असते मुक्याने साथ जी ..
सोडताना चांदण्या गाती किती !

आज नाही आसमंती चंद्र पण ..
बिगर चंद्राच्या अशा राती किती !

भूतलावरचा भिकारी मागतो-
चित्रगुप्ताच्या वहीं खाती किती !

घाव अजुनी कालचे ओले तरी ..
तळपती नजरेतुनी पाती किती !

अजय अनंत जोशी
९९२३८२०८४२ (पुणे)

गझल: 

प्रतिसाद

मिळविताना दीप वंशाला तुझ्या ..
तूच बघ रे विझविल्या वाती किती !

...छान.

मतला स्पष्ट नाही.

पावसाने चिकटली माती किती !
घट्ट असुनी निथळली नाती किती !!
मातीची ढेकळे होऊन ती एकमेकांपासून सुट्टी सुट्टी होतात. जर पावसाची कृपा झाली नाही तर असे होते. पाऊस पडला की लगेच तीच ढेकळे परत एकमेकांना चिकटतात. सुख किंवा धन नसले तर नाती टिकवून ठेवण्याच्या उर्मीवर प्रश्नचिन्ह उमटते. लोक एकमेकांना टाळायला लागतात. धन असेल तेव्हा नात्याची माती चिकटून असते, धन गेले की नात्यांचीपण ढेकळे होतात. मग तेव्हा नाती कितीही घट्ट असोत. सख्खा भाऊ, बहीण, मुलगा, सून कुणीही असे वागू शकते. या शेराने सुरुवात करणे ही निश्चीत जमेची बाजू आहे.
प्रेम बर्फासारखे असते, पहा ..
वितळले अन् राहिले हाती किती !
या गझलेत कवीने प्रतिमांचा वापर करणे ठरवून लिहिल्यासारखे वाटावे असा हा शेर झाला आहे. आता इथे प्रेम बर्फासारखे असते, ते टिकत नाही, बर्फ वितळतो तसे तेही नष्ट होते किंवा कमी कमी होत जाते ही एक अनुभुती मांदली आहे. पण गझलेमधे हेच विचार थोडेसे जास्त संदर्भासहीत यावेत असे आमचे मत आहे. म्हणजे कवी हे प्रियेचा किंवा मित्राचा अनुभव घेऊन म्हणत आहे वगैरे असे काहीतरी. म्हणजे असे की 'प्रेम हे शेवटपर्यंत राहत नाही' हा विचार एक तात्वज्ञानिक विचार वाटतो तर 'तिचे प्रेम बर्फासारखे निघाले' हा विचार गझलेचा वाटतो. असा गैरसमज होऊ नये की 'गझल' म्हणजे फक्त 'प्रेम' असे आम्ही म्हणत आहोत. मुद्दा असा की गझलेमधे अनुभुती आहे हे स्पष्ट होणे जास्त चांगले. साहिर होशियारपुरीचा हा शेर पहा:
हम जिन्हे दिलसे प्यार करते है
वही दिलको फिगार करते है ( फिगार म्हणजे घायाळ, जख्मी )
याच्यात, प्रेम करणारा दु:खी होतो किंवा होऊ शकतो असा सर्वसाधारण मुद्दा न मांडता 'माझे असे झाले किंवा होत गेले' असे म्हणण्यात आले आहे.    
मिळविताना दीप वंशाला तुझ्या ..
तूच बघ रे विझविल्या वाती किती !
'मिळव' व 'विझव' च्या ऐवजी 'मिळवि' व 'विझवि' असे घेण्याचे काही खास कारण असल्यास माहीत नाही.  एक चांगला शेर! सामाजिक शेर!
पेरता समतास्वरूपी बीज हे ..
उगवल्या खो-यांतुनी जाती किती !
खोरे या शब्दाचे प्रयोजन कवीने स्पष्ट करावे. तसेच 'हे' या शब्दाचे प्रयोजन कवीने स्पष्ट करावे. ( किंवा 'हे' चा संदर्भ स्पष्ट करावा. ) हाही एक सामाजिक शेर आहे.
रात्रभर असते मुक्याने साथ जी ..
सोडताना चांदण्या गाती किती !
आज नाही आसमंती चंद्र पण ..
बिगर चंद्राच्या अशा राती किती !
संदिग्धता!
भूतलावरचा भिकारी मागतो-
चित्रगुप्ताच्या वहीं खाती किती !
'वहीं' या शब्दात काहीतरी चुकत आहे असे वाटते. असो. भूतलावरील प्रत्येक जीव हा सतत काहीतरी मागत असतो. सतत मोहाने लपेटलेला असतो. पापाने बरबटलेला असतो. त्याचे रेकॉर्ड चित्रगुप्त ठेवतो. पण आम्हाला काही या शेरातील मेसेज समजला नाही. 
घाव अजुनी कालचे ओले तरी ..
तळपती नजरेतुनी पाती किती !
व्वाह! सुंदर शेर! घाव घालणारी व्यक्ती प्रेयसी, मित्र, दुनिया, नशीब काहीही! हा खरा गझलेला शोभेलसा शेर! नासिर काजमीचा शेर आठवला. ( गुलाम अलींनी ही गझल गायली आहे.)
कुछ तो नाजुकमिजाझ है हम भी
और ये चोटभी नयी है अभी
मागे एक असे वाचले होते की पुर्वीच्या काळातील लोक म्हणायचे की 'गझल कहीं जाती है". म्हणजे तो एक संवाद झाला. मग तो स्वतःशी असो वा दुसर्‍याशी. गझल कहीं जाती है म्हणजे रचलेली गझल ऐकवली जाते असे नसून गझलची निर्मीतीच संवादरुपी पद्यात्मक विधानातून व्हावी असे त्यांचे म्हणणे होते.  खालील काही उर्दू शेर पहा:
मोमीन - मै भी कुछ खुश नही वफा करके..तुमने अच्छा किया निबाह न की
( मी तुझ्यावर निष्ठेने प्रेम करून शेवटी मला तुझी प्राप्ती तर झालीच नाही उलट तू माझी होऊ न शकल्यामुळे मी दु:खीच झालो, बरे झाले की तू निष्ठेने ते प्रेम जपले नाहीस, उगाच माझ्यासारखे काहीतरी व्हायचे - हा संवाद आहे )
शमीम जयपुरी - जमीपे रहके दिमाग आसमाँसे मिलता है...कभी ये सर जो तेरे आस्ताँसे मिलता है
(आता पहा: पहिल्या ओळीमधे संवाद आहे असे वाटतच नाही. मी जमिनीवर असलो तरी माझा उत्साह, माझी बुद्धी पार हवेत असते. हे फक्त वर्णन आहे. आणि दुसरी ओळ? जेव्हा केव्हा मला तुझ्या दारावरील उंबरठ्यावर डोके टेकायची संधी मिळते तेव्हा! 'तेव्हा माझे असे होते'. आता इथे 'तू' म्हणजे 'देव' व 'प्रेयसी' यातील कोणीही. )
आता इथे मोमीन किंवा शमीम यांनी काय रसिकांना समोर ठेवून हे शेर रचले काय? तर नाही. त्यांनी ध्यानाच्या स्थितीत होते तशी मनाची अवस्था करून आपला भूतकाळ आठवला अन त्याला कारुण्ययुक्त विनोदाची झालर दिली अन मग शेर निर्माण झाला. ( हे पहायला आम्ही तिथे होतो काय असे कृपया विचारू नये. जेवढे आम्हाला जाणवले तेवढे लिहीले. ) म्हणजेच असे की शेर निर्माण होतानाच 'वर्णनात्मक' न होता 'संवादात्मक' झाला.
अशा संवादात्मक गझला या साईटवर किती आहेत हा एक रंजक अभ्यास ठरावा.
शेवटी जाता जाता एक खलिश बडौदवींचा शेर सांगतो:
दर्ज करलो हमे जहनोमे बयाजोंकी तरह
काम आयेंगे जमानोंमे मिसालोंकी तरह
( आपल्या खयालांमधे, विचारांमधे, बुद्धीमधे एखाद्या लेखनवहीवर नोंद करतात तसे आमचे नाव नोंदवून ठेवा, पुढे युगायुगांमधे उदाहरण द्यायला आम्ही कामी येऊ.) - यातील गर्विष्ठपणाकडे दुर्लक्ष करावेत ( आमच्या - खलिशचा गर्विष्ठपणा असूच शकत नाही ) अशी विनंती व खेळकरपणे घ्यावेत. 
 
 

श्री अजय,
पहिले तीनही शेर अतिशय आवडले.
 

पावसाने चिकटली माती किती !
घट्ट असुनी निथळली नाती किती !!
सरळ साधे विधान आहे. पावसामुळे माती चिकटली आणि घट्ट असलेली नाती मात्र निथळली. कोणी म्हणेल की पावसाचे प्रयोजन काय? पाऊस, माती हे प्रतिकात्मक आणि प्रसंगात्मक अशा दोनही बाजूंनी वापरता येतील.
२६ जुलैच्या पावसात अनेक वाहून गेले. त्यांना वाचवायला गेलेल्यांना काय मिळाले? शरीराला माती चिकटली आणि नातलग मात्र वाहून गेले. हा प्रसंग.
अनेकवेळा भावनांचा पाऊस पडतो. त्यातून नाही-नाही ते प्रश्न उभे राहतात. हे प्रश्न म्हणजेच माती. या मातीच्या अधीन होवून आपण नातीही तोडून टाकू शकतो. हे प्रतीक
पेरता समतास्वरूपी बीज हे ..
उगवल्या खो-यांतुनी जाती किती !
'हे' चे प्रयोजन : समतास्वरूपी बीजाला उपहास प्राप्त होण्यासाठी. हे-मुळे जोर येतो.
खोरे - कुदळ्,फावडे यातील हे खोरे नाही. डोंगरांच्या कुशीतील प्रदेश किंवा सहसा लक्षात न येणारा प्रदेश.
रात्रभर असते मुक्याने साथ जी ..
सोडताना चांदण्या गाती किती !
रात्रभर चांदण्या दिसतात. मात्र नीरव शांतता असते. पण पहाट होताच पक्ष्यांची किलबिल सुरू होते. असे वाटते की विरहासाठी चांदण्याच गाताहेत की काय?
आज नाही आसमंती चंद्र पण ..
बिगर चंद्राच्या अशा राती किती !
विरहाचे महत्व समजाविणारा शेर : २९ दिवस चंद्र रात्री आकाशात दिसतो. मात्र अमावास्येच्या दिवशी तो आकाशात नसतो. आज रात्री चंद्र नसला तरी उद्यापासून पुन्हा तो दिसणार आहे. कारण चंद्र नसण्याची ही फक्त एकच रात्र आहे. "रोज सहज प्राप्त होणा-या गोष्टीचे महत्व १ दिवसाच्या विरहातून मिळते.
भूतलावरचा भिकारी मागतो-
चित्रगुप्ताच्या वहीं खाती किती !
'वहीं' - वहीमध्ये. वहीं या शब्दांत अनुस्वार आहे. जसे -
रूप पाहतां लोचनीं = लोचनाने नव्हे तर लोचनामध्ये. तसेच वहीं = वहीमध्ये
(भूतलावर तर आम्ही सारखेच मागत असतो.) पण हा भिकारी (भिकारी याचा असा अर्थ की भूतलावर याचे एकही खाते नाही तरीही...) चित्रगुप्ताच्या वहीमध्ये मात्र खाती वाढवून मागतो आहे.
असो. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
कलोअ चूभूद्याघ्या

प्रिय समीक्षक,

या संकेतस्थळावरील गझलांमध्ये आपणास संवादित्व दिसू नये याचे आश्चर्य वाटते : )
आपण दिलेली उर्दूतली उदाहरणे अगदीच साधारण आहेत. नवीन मंडळींची दिशाभूल होण्यापलीकडे अशा उदाहरणांनी फार काही साधेलसे वाटत नाही.

कवी अनंत,
या साईटवर निश्चीतच संवादित्व असणार्‍या गझला आहेत, फक्त किती आहेत किती नाहीत याचा अभ्यास रंजक ठरावा असे आमचे म्हणणे आहे.
आम्ही दिलेली उदाहरणे ही कवी अजयच्या शेरांच्या अर्थाशी थोडेफार साधर्म्य साधणारी आहेत. ती सामान्य आहेत अथवा नाहीत हे ठरवून आम्ही ती इथे दिलेली नव्हती.
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
नवोदीतांची दिशाभूल होऊ नये ही आपली इच्छा चांगली आहे. आम्ही या साईटवर करत असलेल्या लिखाणामधेही एक प्रामाणिक इच्छा हीच आहे की 'गझल' या काव्यप्रकाराची आम्हाला जाणवलेली काही ठळक अंगे सादर व्हावीत. आमचा पहिल्यापासून एकच मुद्दा आहे की गझल या काव्यप्रकाराला जसे तंत्रांचे बंधन असते तसे थोडेसे आशयाच्या व शब्दरचनेच्या बाजूनेही काही निकष असावेत. 'मुंबई' ही गझल आपल्याला सपाट वर्णन वाटली तर आमच्या दृष्टीने ती गझलच नव्हती, कारण तो विषय गझलेचा असावा यालाच आमचा विरोध आहे. गझल ही फार व्यक्तिगत स्वरुपाचे विचार मांडणारी रचना असावी असे आमचे मत आहे.
आपल्या गझल कारकीर्दीला अर्थातच आमचा प्रणाम आहे. आम्ही आपला आदर करतो.
आणखीन दोन गोष्टी - कोण कुठल्या नावाने इथे उपस्थित होतो याची आपल्याला काळजी करण्याचे कारण नाही. तो काय म्हणतो हे बघितले जावे व ते म्हणणे तो कसे मांडतो ( म्हणजे समाजमान्य पद्धतीने मांडतो की नाही ) हे बघितले जावे. दुसरे - शक्यतो प्रतिसाद गझलेवर असलेले चांगले. आपल्या प्रतिसादात कवी अजयच्या गझलेवर आपण काहीच म्हंटलेले दिसत नाही. काही म्हणायलाच पाहिजे असा आग्रह नाही, पण प्रतिसाद द्यायचा असल्यास तो प्रतिसादावर न देता 'गझलेवर' द्यावा अशी एक किमान अपेक्षा व्यक्त करून आम्ही आपली रजा घेतो.
आभार!