स्वप्नं मोहरणार...
स्वप्नं मोहरणार.. बघ आता पुन्हा
ही फुले फुलणार बघ आता पुन्हा
मज वसंताने दिला आवाज हा..
पालवी फुटणार बघ आता पुन्हा
काय होते त्या क्षणांचे मागणे ?
प्रश्न हा पडणार बघ आता पुन्हा
दशदिशांना गुंजती ताना तुझ्या
चंद्र गुणगुणणार बघ आता पुन्हा
मिसळुनी जाईल... अपुले गीत हे
स्वर असे जुळणार बघ आता पुन्हा
थांबलेली वाट... चालू लागली
पावले वळणार बघ आता पुन्हा
बोलणे... डोळ्यात साचू लागले
शब्द हे भिजणार बघ आता पुन्हा
- जनार्दन केशव म्हात्रे
२/ खलिफा निवास, गांधी नगर, जुना बेलापूर रोड,
कळवा-ठाणे ४००६०५. भ्रमणध्वनी: ९३२३५५५६८८
गझल:
प्रतिसाद
भूषण कटककर
शनि, 29/11/2008 - 15:49
Permalink
शब्द हे भिजणार...
म्हात्रे साहेब,
शब्द हे भिजणार हा शेर फार म्हणजे फारच आवडला. सॉलीड शेर आहे.
आपल्या दुसर्या शेरातील ही ओळ म्हणताना जरा वेगळेच वाटले.
वाटते वसंताची मला चाहूल ही?
म्हणुन मग आपले मनात आले ते बदल लिहीले. राग मानू नये.
ही वसंताचीच चाहुल वाटते
वाटते चाहुल वसंताचीच ही
शब्द हे भिजणार बघ आता पुन्हा ---वा वा!
समीर चव्हाण (not verified)
रवि, 30/11/2008 - 17:11
Permalink
व्वा
बोलणे... डोळ्यात साचू लागले
अजय अनंत जोशी
सोम, 01/12/2008 - 21:40
Permalink
वाट
थांबलेली वाट... चालू लागली
पावले वळणार बघ आता पुन्हा वा!
कलोअ
चूभूद्याघ्या
कौतुक शिरोडकर
मंगळ, 02/12/2008 - 13:08
Permalink
पुन्हा
मस्त वाटली. पुन्हा असा आनंद मिळो.
जनार्दन केशव म्...
शनि, 20/12/2008 - 20:02
Permalink
माझ्याच दुसर्या गझलची ओळ...
राग कसा असतो... आणि का येतो..
असो, चुकून माझ्याच दुसर्या गझलची ओळ मी इथे टाईप केली.
आता हा वसंताचाच मोहर.. कुठेही फुलतो..
पण आता मूळ ओळ लिहून बदल केला आहे...
मज वसंताने दिला आवाज हा..
पालवी फुटणार बघ आता पुन्हा
स्नेह आणि शोधकता अशीच असू दे...
भूषण कटककर
सोम, 22/12/2008 - 19:23
Permalink
इर्शाद!
'णार' घेऊन खरेच आणखीन अनेक शेर रचता येतील. रचा म्हात्रेसाहेब रचा! इर्शाद!
गंभीर समीक्षक
मंगळ, 23/12/2008 - 20:13
Permalink
चर्चा!
स्वप्नं मोहरणार.. बघ आता पुन्हा
ही फुले फुलणार बघ आता पुन्हा
आश्वासनयुक्त विधान! गझल व भावगीत यांच्या सीमारेषेवर थरथरणारा मतला! 'आता'ऐवजी 'नाही' या शब्दाने तो मतला पूर्णपणे 'गझल'मधे गेला असता. अर्थातच कवीला मुळात 'नाही' असे म्हणायचेच नाही व 'नाही' असा शब्द घातल्यास इतरही शब्दांमधे काही किरकोळ बदल करावे लागतील. मुद्दा एवढाच की पॉझिटिव्ह भावना व निगेटिव्ह भावना यापैकी गझल हा काव्यप्रकार 'निगेटीव्ह' भावनांना जरा जास्तच जवळ घेऊन कुरवाळतो.
मज वसंताने दिला आवाज हा..
पालवी फुटणार बघ आता पुन्हा
सुंदर शेर!
काय होते त्या क्षणांचे मागणे ?
प्रश्न हा पडणार बघ आता पुन्हा
प्रश्न हा पडणार बघ 'आता पुन्हा' मधील 'आता पुन्हा'चा अर्थ असा होऊ शकतो की हा प्रश्न तेव्हाही पडलेला होता. येथे 'आता पुन्हा'चे प्रयोजन जरा सशक्त केल्यास बरे वाटावे.
दशदिशांना गुंजती ताना तुझ्या
चंद्र गुणगुणणार बघ आता पुन्हा
एकंदर रचनाच छान सकारात्मक आहे. त्यामुळे गझलेला काय आवडते वगैरे चर्चा फारशी उचित होईल असे वाटत नाही. या शेरामधे एक कवीकल्पना जरूर आहे, पण पहिल्या ओळीचा दुसर्या ओळीत 'प्रभावी समारोप' होणे हा निकष पाळला गेलेला आहे असे जाणवत नाही.
मिसळुनी जाईल... अपुले गीत हे
स्वर असे जुळणार बघ आता पुन्हा
तेच!
थांबलेली वाट... चालू लागली
पावले वळणार बघ आता पुन्हा
निदान आम्हाला तरी हा शेर समजला नाही.
बोलणे... डोळ्यात साचू लागले
शब्द हे भिजणार बघ आता पुन्हा
एकच शेर गझलेला इतकी उंची देतो की मनातुन सहजच व्वा व्वा निघते. इतर कवींनी, रसिकांनी या शेराची स्तुती केलीच आहे. पुनरावृत्ती नको. पण एक खरे, हा शेर वाचकाची मनस्थिती एकदम बदलतो हे खरे आहे. हासिले-गझल!
ज्ञानेश.
मंगळ, 23/12/2008 - 21:20
Permalink
आता पुन्हा...
सुंदर गझल आहे म्हात्रे साहेब.
हे शेर आवडले-
काय होते त्या क्षणांचे मागणे ?
प्रश्न हा पडणार बघ आता पुन्हा
थांबलेली वाट... चालू लागली
पावले वळणार बघ आता पुन्हा
बोलणे... डोळ्यात साचू लागले
शब्द हे भिजणार बघ आता पुन्हा...
जनार्दन केशव म्...
रवि, 01/03/2009 - 16:45
Permalink
गंभीर दखल..
आपण सुचविलेला 'नाही' हा शब्द संयुक्तिक वाट्त नाही..
इतर सुचनांचा विचार होणे स्वगतार्ह आहे..
मिल्या
सोम, 02/03/2009 - 10:28
Permalink
शब्द हे भिजणार
फार आवडला हा शेर