लंब

भिजून  चिंब  चिंब  मी
तरी  नसे  तुडुंब  मी

झळाळशील  लाख  तू
तुझेच  शांत  बिंब  मी

विशाल  शून्य  तू  जरी
तयात  एक  टिंब  मी

कशास  टाळिशी  मला?
नव्हेच  आग  बंब  मी

विषुव  वृत्त  देखणे
तयावरील  लंब  मी

गझल: 

प्रतिसाद

सन्माननीय सुनेत्रा सुभाष,
आता कसे वाटते? गझल वाचल्यासारखे वाटते.
उत्तम आशय!
नव्हेच आग बंब मी मधील आग व बंब मधे एक स्वल्प्विराम द्यावात अशी विनंती!
सुंदर गझल!
शुभेच्छा!
 

विनंती   मान्य,
बाकी  आभार


भिजून  चिंब  चिंब  मी
तरी  नसे  तुडुंब  मी
प्रेम किंवा सुख मिळते आहे खरे पण तरीही कसलितरी एक इच्छा आहे जी कधीच पूर्ण होत नाही याचे कवीला दु:ख होत आहे.  तुडुंब हा शब्द नदी वाहणे किंवा घागर भरणे अशा अर्थाने वापरला जातो. इथे कवी असे म्हणतो की तो तुडुंब नाही आहे. याचा अर्थ असाही होतो की कितीही सुखे मिळाली तरी मन भरत नाही. अजून सुख नको असे वाटत नाही. चांगला मतला!
झळाळशील  लाख  तू
तुझेच  शांत  बिंब  मी
सूर्य झळाळतो. त्याचा चंद्रावर पडलेला प्रकाश पृथ्वीवरून शीतल भासतो. इथे कवी प्रियकराला वा पतीला म्हणत आहे की तू झळाळत रहा. मी तुझ्या प्रतिमेप्रमाणे शांत भासत राहीन. म्हणजे असे की काही काही वेळा झळाळणार्‍याला आपण झाकोळत चाललो आहोत हे समजत नाही. तो आपल्याच नशेत असतो. अशा वेळी त्याची मनस्थिती खालावू नये म्हणुन त्याचीच शांत प्रतिमा त्याला सहाय्य करत असते. दुसरा अर्थ असा की तू कितीही झळाळलास अन कधीही तुला माझी आठवण आली तरी मी तिथेच आहे, तुझ्या शांत प्रतिमेसारखी. तिसरा अर्थ म्हणजे सूर्य मावळला हे पृथ्वीवरील लोकांना वाटले तरी तो फक्त दुसर्‍या बाजूला जाऊन झळाळत आहे हे त्याची शांत प्रतिमा म्हणजे चंद्र सांगत रहातो. चवथा अर्थ म्हणजे मी अन तू काही वेगळे नसून तू झळाळतोस तर मी शांत रहाते अन तो शांतपणा मी तुझ्याच प्रकाशापासून घेते. व्वाह! 'सांग ओठास तुझी गोष्ट फुलांची बाई', 'दळण', अशा रचना करणारा कवी मधूनच एक अभूतपुर्व शेर रचून जातो हे पाहून आम्हाला फार आनंद झाला. असे शेर सारखे सारखे रचत रहावेत.
विशाल  शून्य  तू  जरी
तयात  एक  टिंब  मी
इथे कवी त्याच्या ( तिच्या ) प्रियकराला वा पतीला असे सांगत आहे की खरे तू माझ्याविना तसा काहीच नाहीस. माझ्यामुळे तुझ्या अस्तित्वाला अर्थ आहे. तू म्हणजे एक विशाल शुन्य आहेस अन मी त्यातले टिंब! म्हणजे या विश्वात सजीवसृष्टी फक्त पृथ्वीवर आहे असा अद्याप मानवाने धरलेले गृहीत आहे. अशा या विशाल शुन्य पोकळीप्रमाणे तू आहेस अन मी म्हणजे तुझ्यातले चैतन्य, सजीवता!  मनीषा साधूंच्या 'राहू दे' या गझलेनंतर महिलावर्गाकडुन प्रकाशित करण्यात आलेली उत्तम गझल हीच.
कशास  टाळिशी  मला?
नव्हेच  आग  बंब  मी
हा शेर जरा खटकतो. इथे कवीला तिचा प्रियकर टाळत आहे असे गृहीत धरले तर असे म्हणावे लागेल की कवीचे सौंदर्य किंवा वागणे आगीसारखे आहे त्यामुळे टाळतो. त्यात जर सौंदर्य असे अभिप्रेत असेल तर शेर थोडा सवंगतेकडे वळतो. ( माफ करा, ही फक्त या रचनेवरील चर्चा आहे व यात कोणचेही व्यक्तिगत विधान आहे असा गैरसमज करून घेऊ नये. ) म्हणजे असे की एरवी आगीसारखे भासणारे रूप त्याच्या सान्निध्यात गेल्यावर वास्तवात फार शीतल असते असे काही तरी. असा अर्थ असल्यास तो गझलेला फारसा शोभणारा नाही. गझलेमधे अत्यंत तरल वा नाजूक विधाने असावीत अन जर सरळ सरळ तसेच काही म्हणायचे असेल तर थोडे सांकेतिक पद्धतीने म्हणावे. जसे: हा शेर पहा:
तेरा चेहरा कितना सुहाना लगता है
तेरे आगे चाँद पुराना लगता है ( हे साधारण वर्णन, आता सांकेतिक पहा )
आग का क्या है पल दो पलमे लगती है
बुझते बुझते एक जमाना लगता है ( आता ही प्रेमामुळे होत असलेली मनाची आग आहे की मीलनाची हे ठरवणे रसिकाचे काम उरते, कवीला जे म्हणायचे आहे ते कवी म्हणुन गेला. )
जर 'वागणे' आगीसारखे असेल तर 'मी खरे तर बंब' आहे म्हणजे मी खरे तर आगी विझवते या विधानामधे काहीही विशेष अर्थ नाही. हा एक कौटुंबिक संवाद होऊ शकतो. म्हणजे ' तुम्हीच वाद घालता, मी वाद मिटवायला बघत असते' वगैरे अशासाखे.  अर्थात, इथे तिला टाळणारी व्यक्ति जर 'प्रियकर किंवा पती' नसेलच अन दुसराच कुणी असेल तर तो किंवा ती कोण आहे हे स्पष्ट होत नाही. इतके मात्र नक्की की हा शेर आयुष्याला, मृत्यूला वगैरे उद्देशून असल्यासारखा वाटत नाही. बर्‍यापैकी फसलेला शेर!
विषुव  वृत्त  देखणे
तयावरील  लंब  मी
'षू' दीर्घ करणे आवश्यक आहे. आमची आकलनशक्ती बहुधा अपुरी असावी कारण हा शेर आम्हाला समजला नाही. वरवर पाहता '  'विषुववृत्त देखणे' असण्याचे कारण हे की त्यावरचा लंब मी आहे' हे लक्षात येऊ शकते. पण मुळात विषुववृत्त अस्तित्वातच ( म्हणजे ती मानवनिर्मीत कल्पना असल्यामुळे ) ते देखणे असते हे विधान नावीन्यपूर्ण होते. त्यात त्याच्यावरचा लंब ( म्हणजे अक्षांश/रेखांश ज्या मानवनिर्मीत कल्पना आहेत ) असे म्हणायचे असल्यास माहीत नाही. तसे असले तरी विषुववृत्त त्यांच्यामुळे देखणे होते हे काही लक्षात येऊ शकत नाही. पुन्हा, लंब हा 'वाय' ऍक्सिसवरचा असला तर 'अक्षांश' ही कल्पना पटेल पण 'झेड' ऍक्सिसवरचा असला तर लंब म्हणजे सुर्याची किंवा चंद्राची किरणे होतील.  आमच्यामते 'बंब' व 'लंब' या शेरांचा अर्थ एक तर कवीने प्रकाशित तरी करावा किंवा त्यांच्यात मुलभूत फरक करून ते शेर पुनःप्रकाशित तरी करावेत.  
या गझलेचा हासिल्-ए-गझल शेर आहे 'शांत बिंब'!
 

आदरणीय  गंभीर  समीक्षक,
आपल्या अभ्यासपूर्ण समीक्षेबद्दल मनापासून आभार.
बंब व लंब या शेरांवर मी पुन्हा जरूर विचार करेन.

झळाळशील ला झळाळलास करावे. मजा येईल.