'..तयार झालो!' एका अनामिक कवीची गझल.
दोस्तहो,
काही वर्षांपुर्वी एका मासिकात मी  ही  गझल वाचली होती. कवीने स्वतःचे नाव न लिहिता 'प्रवासी' या  टोपणनावाने ही  गझल  प्रकाशित केली  होती. हे  श्री. प्रवासी  कोण, हे कुणाला माहीत असेल तर जरूर कळवा.
गझल मात्र खूप सुरेख आहे.
तुम्हालाही  आवडेल  अशी  आशा  आहे.
"....तयार झालो."
-----------------------------
जसा  जसा  मी  जगावयाला  तयार झालो,
तसा  तसा  मी  लढावयाला  तयार  झालो..
सडा  असा  शिंपलास  तू  अंगणात  माझ्या,
पसा  पसा  मी  भरावयाला  तयार  झालो..
बघून  मागे  कशीबशी  हासलीस  जेव्हा,
कसाबसा  मी  हसावयाला  तयार  झालो..
न  खंत  आभाळ  फाटण्याची  मला  तशी  पण,
ससा  कसा  मी  बनावयाला  तयार  झालो?
विषा, तुला  ओळखून  होतो  तरी  कसा  रे,
नसा  नसा  मी  भरावयाला  तयार  झालो?
अखेर  तू  ही  मनातले  बोललीस  जेव्हा,
ढसा ढसा  मी  रडावयाला  तयार  झालो !
तुझी  न ही  पायधूळ  जेव्हा  मला  कळाले,
ठसा  ठसा  मी  पुसावयाला  तयार  झालो..
तिने  नव्याने  दिला  जरी  तो जुना  बहाणा,
असा  कसा  मी  फसावयाला  तयार  झालो?
-प्रवासी.
--------------------------------
 
      
प्रतिसाद
समीर चव्हाण (not verified)
मंगळ, 25/11/2008 - 22:18
Permalink
धन्यवाद ज्ञानेश
ंप्रवासीशी परिचय करून दिल्याबद्दल...
विसुनाना
गुरु, 27/11/2008 - 18:10
Permalink
प्रवासी :
प्रवासी यांच्या अनेक सुंदर कविता / गझला आंतरजालावर उपलब्ध आहेत.
त्यांचे पूर्ण नाव 'प्रणव सदाशिव काळे' असे असल्याचा माझा अंदाज आहे. जाणकारांकडून खात्रीची अपेक्षा. याच कवीची 'कुठे म्हणालो परी असावी' नावाची गझल अत्यंत गाजली होती.
चुभूद्याघ्या.
भूषण कटककर
बुध, 03/12/2008 - 15:02
Permalink
प्रवासी
ज्ञानेश,
ही गझल इथे दिल्याबद्दल धन्यवाद! विसुनानांना विनंती की त्यांनी ती गाजलेली गझल कृपया इथे द्यावी.
ज्ञानेश.
बुध, 03/12/2008 - 18:13
Permalink
धन्यवाद विसुनाना.
प्रणव सदाशिव काळे यांचे अभिनंदन.
नाना, "कुठे म्हणालो परी.." येऊ द्या.
विसुनाना
मंगळ, 09/12/2008 - 12:07
Permalink
इथेच आहे
अहो 'कुठे म्हणालो...' गझल याच संस्थळावर आहे.
माझ्या वरच्या प्रतिसादातल्या निळ्या अक्षरांवर टिचकी मारून पहा तरी! (अक्षरांवर क्लिक करा.)
सुनेत्रा सुभाष
रवि, 25/01/2009 - 14:39
Permalink
प्रतिसाद
खरोखरच खूप छान गझल वाचायला मिळाली.धन्यवाद ज्ञानेशजी.