जगेन मी
काळजी तुला 'तुझ्याविना कसा जगेन मी?'
सोड काळजी, असा कसा, असा जगेन मी?
काय नाव जीवनास द्यायचे ठरेचना
सोडुया उद्यावरी, उद्या जसा जगेन मी
पैंजणे, रुमाल, ओढणी, वहाण, मेखला
वाटते तुला जसा 'तसा तसा' जगेन मी
'जो अधीक दु:ख बाळगे' मला सुखावतो
लावुनी समोर एक आरसा जगेन मी
त्या क्षणास दैवही नवीन मार्ग दाखवी
ज्या क्षणास वाटते 'न फारसा जगेन मी'
आजही उधार मद्य लाभले मला इथे
लोक वाट पाहती 'फसाफसा जगेन मी'
स्वप्न पाहिले 'जगास सांगतोय मी जणू'
'हासवेन मी अजूनही, हसा, जगेन मी'
गझल:
प्रतिसाद
अजय अनंत जोशी
गुरु, 04/12/2008 - 11:53
Permalink
आरसा
'जो अधीक दु:ख बाळगे' मला सुखावतो
लावुनी समोर एक आरसा जगेन मी
शेवटच्या द्विपदीत मात्रा आणि वृत्ताची गडबड आहे.
चामरी वृत्ताचे 'अँटी चामरी' झाले.
कलोअ चूभूद्याघ्या
भूषण कटककर
गुरु, 04/12/2008 - 12:02
Permalink
धन्यवाद!
अजय,
१. धन्यवाद, चूक मान्य, भावनेच्या भरात झाली होती हे खरे!
२. चूक दुरुस्त केली आहे, कशी वाटते सांगावेत.
३. बाकी शेर कसे वाटले?
पुन्हा धन्यवाद!
अजय अनंत जोशी
गुरु, 04/12/2008 - 12:28
Permalink
१ आणि ४
छान.
फसाफसा बदलता आले तर पहा. तसे जुळते आहे, पण...??
कलोअ चूभूद्याघ्या
ज्ञानेश.
गुरु, 04/12/2008 - 17:29
Permalink
हे शेर-
'जो अधीक दु:ख बाळगे' मला सुखावतो
लावुनी समोर एक आरसा जगेन मी
त्या क्षणास दैवही नवीन मार्ग दाखवी
ज्या क्षणास वाटते 'न फारसा जगेन मी'
अप्रतिम..!
केदार पाटणकर
शनि, 06/12/2008 - 16:51
Permalink
फसाफसा-संदिग्धता.बाकी चांगले.
आजही उधार मद्य लाभले मला इथे
लोक वाट पाहती 'फसाफसा जगेन मी'
भूषण,
हा शेर संदिग्ध आहे. काय म्हणायचे आहे..?
त्या क्षणास दैवही नवीन मार्ग दाखवी
ज्या क्षणास वाटते 'न फारसा जगेन मी'
छान.
कसे वाटते पहा-
त्या क्षणास खुद्द दैव मार्ग दाखवी नवा
ज्या क्षणास वाटते 'न फारसा जगेन मी '
काय नाव जीवनास द्यायचे ठरेचना
सोडुया उद्यावरी, उद्या जसा जगेन मी
वा..!
ज्ञानेश.
शनि, 06/12/2008 - 17:07
Permalink
अजून एक-
भूषणजी, आपलं एक उगाचच-
"कारणे मला मिळोत ना मिळोत फारशी,
लाभला जगायचाच वारसा, जगेन मी..."
धन्यवाद.
भूषण कटककर
रवि, 07/12/2008 - 08:50
Permalink
फसाफसा
आजही उधार मद्य लाभले मला इथे
लोक वाट पाहती 'फसाफसा जगेन मी'
स्पष्टीकरण - मला जगामधे माणूस म्हणुन वास्तवात काहीही किंमत नाही. परंतू मद्याच्या अंमलात असताना मी जसा वागतो त्याने जगाचे मनोरंजन होते. मला मात्र फक्त मद्य प्राशनाचीच इच्छा असते. ह्यामुळेच जग मला सारखे उधार मद्य देत राहते. 'फसाफसा' हा शब्द ओसंडुन वाहणे या क्रियेचा निदर्शक म्हणुन मी वापरला आहे. एरवी निष्क्रीय असणारा मी मद्य मिळताच ओसंडुन वाहतो म्हणजे अगदी बहारदार व्यक्तिमत्वाप्रमाणे वागतो. तसेच 'फसाफसा' हा शब्द मद्य घेणार्यांना लघेच लक्षात येईल की कशाशी संबंधित आहे! :-)याच शेराच्या आशयाशी थोडासा साधर्म्य साधणारा मक्ता पहा:
स्वप्न पाहतो 'जगास सांगतोय मी जणू'
'हासवेन मी अजूनही, हसा, जगेन मी'
अभिप्रेत अर्थ - खरे तर मी जगतोय की नाही अन जगलोच तर काय करतोय याच्याशी जगाला काहीही सोयर्सुतक नाही, जगाच्या दृष्टीने माझे अस्तित्व असणे व नसणे एकसारखेच आहे. पण मला असे स्वप्न पडतय की जणू सारे जग पुढे मी नसणार या कल्पनेमुळे दु:खी झालेले असून त्यांना मी आश्वासन देत आहे की रडू नका, हसा की मी तुम्हाला जगवण्यासाठी अजून जगणार आहे.
सर्वांचे प्रतिसादाबद्दल आभार! ज्ञानेशचा 'वारसा' शेर आवडला. केदारने सुचवलेला बदलही चांगला आहे. अजयने वृत्तात एक ठिकाणी गडबड झालेली पटकन निदर्शनास आणली होती त्याबद्दल अजयचेही आभार.
समीर चव्हाण (not verified)
बुध, 10/12/2008 - 14:53
Permalink
अगदी खरे
त्या क्षणास दैवही नवीन मार्ग दाखवी
ज्या क्षणास वाटते 'न फारसा जगेन मी'