गझलचे दुसरे अंग

माझ्या मते गझल ही दोन अंगांनी घडते

- १. तांत्रिक बाजू जसे की वृत्तबद्ध रचना, दोन दोन ओळींच्या स्वतंत्र कविता , रदीफ आणि काफिया सांभाळणे  इत्यादी
२. दुसरी बाजू आहे - गझलेचा बाज, नजाकत,  वजन आणि जमीन.

बाज म्हणजे तडफ
चपखल  शब्दांची नेमकी आणि अर्थपूर्ण मांडणी.
उदा :
साध्याच माणसांचा एल्गार येत आहे
हा थोर गांडुळांचा भोंदू जमाव नाही

एल्गार, थोर, गांडूळ, आणि भोंदू ह्या शब्दांमधला बाज पहा. ह्या ओळींमध्ये कवीला काय सांगायचंय ते अतिशय परिणामकारकरीत्या सांगितलंय.

दुसरी गोष्ट म्हणजे - नजाकत
गझल काळजाला थेट भिडली पाहिजे!
गझल म्हणजे एक प्रकारचा संवाद असतो : मनातल्या कैफियती मांडण्याचे ते एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे. हा संवाद ह्या हृदयीचा , त्या हृदयी अलगद पोहोचला पाहिजे.
जगलो असाच कसातरी ओठातल्या ओठात मी
आता कुठे बोलायला केली खरी सुरुवात मी

इथे "आता" ह्या शब्दाची नजाकत बघा. काळजात थिरकतो हा शब्द !
नजाकतीचे एक सुंदर उदाहरण बघा :

उनसे छीकेसे कोई चीज़ उतरवायी है
काम का काम है, अंगड़ाई की अंगड़ाई है.

तिसरी गोष्ट - वजन.
उमराव जान ने आपल्या गझलांची वही आपल्या उस्ताद ला दाखवली , त्यावाचून उस्ताद म्हणाले " ये तो सब नज़्म है, ग़ज़ल नही| इसमें आप वज़न पैदा करो| दर्द आपके दिलसे अल्फाज़ में उतरने चाहिये|"

हे वजनच गझलचा खरा आत्मा आहे. भट म्हणत " खूप लोक गझल लिहीत आहेत, पण वजन येत नाही हे मला दु:ख आहे"

त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी
पैशात भावनेचा व्यवहार पाहिला मी

इथे आहे वजन.शब्दात तसं सांगणंच कठीण आहे " वजन " म्हणजे काय ?
वह तो मेहेसूस करनेकी चीज़ है जनाब!

 साधे उदाहरण घेऊ :
सतत नाव घ्यावेसे वाटते तुझे
नाव गुणगुणावेसे वाटते तुझे

इथे दुसऱ्या ओळीत पहिल्याच ओळीची "री" ओढली आहे. इथे गझलचा
" म़झा" येत नाही.

आता हाच अर्थ असलेल्या ओळी :
पुन्हा वाटते की तुला गुणगुणावे
तुला गुणगुणाया तुझे ओठ व्हावे

आलं की नाही वजन ?

जमीन  ( चौथी गोष्ट )
जमीन म्हणजे रदीफ आणि काफिया ह्यांची अशी काही चपखल सांगड की ज्याने  गझलचा एक विशिष्ट मूड तयार होतो. तो मूड गझलभर पसरतो. आणि गझल वाचकांच्या , रसिकांच्या मनात घर करते. ही जमीन योग्य निवडणे व शेवटपर्यंत सांभाळणे ही मोठी कठीण गोष्ट आहे.

पहिल्याच ओळीत अस्सल गझल हृदयाचा ठावच घेते.
जसे की - अब छलकते हुए सागर नहीं देखे जाते
             तौबा के बाद ये मंज़र नहीं देखे जाते|

"किसी चीज़ को नहीं देखा जाना " हा मूड , ही जमीन इथे तयार झाली आहे. आणि ती शेवटपर्यंत अप्रतिम सांभाळली आहे.
   
              मस्त करके हमें , औरों को पिला ऐ साकी
              ये करम होश मे रहकर  नही  देखे जाते |

ज्याप्रमाणे शास्त्रीय संगीत गाताना गवई  वेगवेगळे भाव आणि सूर घेऊन  समेवर येतो आणि प्रत्येक वेळी रसिकांची दाद घेऊन जातो, त्याचप्रमाणे गझलसुद्धा वेगवेगळे भाव घेऊन "जमीन" वर येते आणि दाद घेऊन जाते.

शेवटी एवढे सगळे सांगूनही गझल उरतेच.आणि जी उरते तीच गझल !
नाही का ?
....... प्रसन्न शेंबेकर


प्रतिसाद

'वजन' ज्या उदाहरणासहीत स्पष्ट केलं आहे ते उदाहरण अगदी चपखल आहे.
सुंदर लेख.
अभिजित
 

This comment has been moved here.

लेख छान आहे. आवडला.