आता पुरे टवाळी - सुनेत्रा सुभाष

आता पुरे टवाळी इतुकी न स्वस्त बाई
जोडेल शुद्ध नाती लावेल शिस्त बाई

 

अबला कशास म्हणता? आहे बला खरी ही
लपले बिळात त्यांना करणार ध्वस्त बाई

 

उमला मुक्या कळ्यांनो उधळीत गंध अपुला
जपण्यास आत्म निष्ठा घालेल गस्त बाई

 

गर्भातल्या कळीला जर मारशील माते
जननी जरी जगाची होशील फस्त बाई

 

आषाढ वादळी वा वैशाख भाजणारा
धुंदीत श्रावणाच्या जगणार मस्त बाई

 

ठिणगी उरात ज्यांच्या जपणार तेच बाणा
त्यांच्या वरी 'सुनेत्रा' ठेवेल भिस्त बाई


गझल: 

प्रतिसाद

ठिणगी उरात ज्यांच्या जपणार तेच बाणा

कलोअ
चूभूद्याघ्या

आषाढ वादळी वा वैशाख भाजणारा
धुंदीत श्रावणाच्या जगणार मस्त बाई

हे जगणे आवडले.

धुंदीत श्रावणाच्या जगणार मस्त बाई...

जपण्यास आत्म निष्ठा घालेल गस्त बाई...

वाह क्या बात है!!
हरएक शेर दमदार.....

आता पुरे टवाळी इतुकी न स्वस्त बाई
जोडेल शुद्ध नाती लावेल शिस्त बाई

सुरुवातीलाच एक उघड धमकी दिल्यामुळे समीक्षक गांगरले आहेत. गेल्या आठवड्याभरात महिला वर्गाकडून बर्‍याच गझला आल्यामुळे 'टवाळी करू नये' असा सल्ला महिला पुरुषांना देत आहेत की महिलांनाच देत आहेत यावर एक समिती नेमण्याची वेळ आली आहे. पण 'रदीफ'च बाई असल्यामुळे टवाळी पुरूष करत असावेत असा एक अंदाज मांडायला प्रयास पडू नयेत.
मतल्यात एक गृहित धरण्यात आले आहे. ते म्हणजे 'लावेल शिस्त बाई'. असे गृहित धरायला आमची काहीच हरकत असू शकत नाही.  पण गझलेची शिस्त न पाळणार्‍या रचना करणारे कवी बाकीची शिस्त लावायला निघणार, हे आम्हाला तात्विकदृष्ट्या मान्य नाही. गझल या काव्यप्रकारात अत्यंत नाजूक, तरल भावनांना स्थान मिळायला हवे अन त्यांची मांडणी अत्यंत साध्या, दैनंदिन वापरातल्या अशा शब्दांमधे तरीही अत्यंत आकर्षक अशी असायला हवी हा मूळ नियमच इथे धुडकावून लावण्यात आला आहे. युगानयुगे चालत आलेल्या स्त्री-पुरुष भेदामुळे शोषित असलेल्या महिलावर्गाची कैफियत मांडणे हे काम गझलेचे नसते. ( जसे 'मुंबईवर अतिरेक्यांचा हल्ला, किंवा जत्रेत माणसे गुदमरून मेली वगैरे विषय गझलेचे नसतात तसे ). गझलच्या तंत्रामध्ये परफेक्ट बसणारी प्रत्येक रचना 'गझल' नसते. 'मला खूप आत्मविश्वास होता, बरेच काही करून दाखवण्याचा, मात्र ज्याच्यावर प्रेम केले त्यानेच मी एक स्त्री असल्यामुळे माझ्या क्षमतांवर विश्वास दाखवला नाही त्यामुळे मला काहीच करता आले नाही' ही व्यथा फार तर गझलेचा विषय होऊ शकेल.

 

अबला कशास म्हणता? आहे बला खरी ही
लपले बिळात त्यांना करणार ध्वस्त बाई

हे मात्र खरे असावे असे आम्हालाही वाटायला लागले आहे.
'आहे बला खरी ही'.  
शेर इतका प्रचंड वीररसयुक्त आहे की समीक्षा करायलाही 'भ्या'च वाटायला लागलंय. करा करा, करा ध्वस्त!

 

उमला मुक्या कळ्यांनो उधळीत गंध अपुला
जपण्यास आत्म निष्ठा घालेल गस्त बाई

पहिली ओळ चांगली आहे, पण तरीही तीही गझलेची नाहीच. 'आत्म' म्हणजे स्वतःची, 'निष्ठा' म्हणजे लॉयल्टी किंवा 'प्रामाणिक असलेली श्रद्धा'! स्वतःची लॉयल्टी जपण्यास 'बाई' गस्त घालेल या वाक्याचा मुक्या कळ्यांनी आपला गंध उधळीत उमलण्याशी जो संबंध आहे तो काय, असे विचारले तर लोक म्हणतात की ते काम कवी तिलकधारी यांचे आहे. मला असा एक 'व्यक्तिगत निरोप'ही आला होता.  

 

गर्भातल्या कळीला जर मारशील माते
जननी जरी जगाची होशील फस्त बाई

अत्यंत सामाजिक शेर! गझल या काव्यप्रकाराच्या प्रयोजनाचेच फायदे घेतले गेलेले नाहीत. त्यात परत 'यमकात बसतो म्हणुन' 'फस्त' हा शब्द घेतला गेल्यासारखे वाटते. आपला गर्भ स्त्रीलिंगी आहे म्हणुन क्रूरपणे तिला जन्म घेऊ न देणार्‍या स्त्रिया असतात हे दुर्दैव आम्हाला मान्य आहे. पण खरे तर त्या उजळ माथ्याने जगतही असतात. त्यांना 'फस्त' कोण करणार अन कसे हे काही या शेरातून समजत नाही.

 

आषाढ वादळी वा वैशाख भाजणारा
धुंदीत श्रावणाच्या जगणार मस्त बाई

हा शेर चांगला असूनही, इथे रदीफ बाई घेतल्यामुळे परत सामाजिक शेर होत आहे. मी धुंदीत जगणार असे असते तर ती गझल होऊ शकली असती. पण कुठलीही एक बाई धुंदीत जगते म्हंटले की बिघडले.

 

ठिणगी उरात ज्यांच्या जपणार तेच बाणा
त्यांच्या वरी 'सुनेत्रा' ठेवेल भिस्त बाई

आम्हाला समीक्षा करताना दुर्दैवाने स्त्री-पुरूष असा कवींमधे भेद करणे जमत नाही व कवयित्री आहे म्हणुन उगाचच नाटकी सौम्य भाषेत गुळमुळीत समीक्षा करता येत नाही. याचे कारण म्हणजे आमचे 'गझल' या काव्यप्रकारावर निरतिशय प्रेम असून त्याची अशी अवस्था होणे आम्हाला मान्य नाही. जे शेर, ज्या गझला चांगल्या असतात त्यांची आम्ही तोंड फाटेस्तोवर स्तुती करतो व ज्या नसतात त्यांची खिल्ली उडवतो. याच कवयित्रीच्या डोल सख्यारे वर आम्ही भरभरून दाद दिलेली आहे. हे सर्व सांगायचे प्रयोजन म्हणजे आमच्याकडून कुणीही कधीही पक्षपाती समीक्षेची किंवा खोट्या समीक्षेची किंवा गोड अथवा सौम्य समीक्षेची अपेक्षा करू नये.  

                                                                                            गंभीर समीक्षक-