जीवन विनोद आहे

आलेय मूल्य माझ्या येथे नसायलाही
शोधायचो सबब मी तेव्हा असायलाही

सारे हुषार आता बेरोजगार झाले
माणूस पाहिजे ना कोणी फसायलाही

ढकला उद्यावरी जो संकल्प सोडला तो
'मदिरागृहात जाऊ नुसते बसायलाही'

माझी जरूर लागे "वा, वा" म्हणायलाही
मैफील संपली की फरश्या पुसायलाही

बिलगे हवा तशी ती, जगवे हवा तशी ती
आणी हवेप्रमाणे आहे दिसायलाही

रुसली बघून पुर्वी मनवायचो किती मी
मनवावयास लागे आता रुसायलाही

"जीवन विनोद आहे" मृत्यूस मी म्हणालो
"आले कधीच नव्हते इतके हसायलाही"

 

गझल: 

प्रतिसाद

माझी जरूर लागे "वा, वा" म्हणायलाही
मैफील संपली की फरश्या पुसायलाही

कलोअ
चूभूद्याघ्या

वेगळा रदिफ. 
अजय ला अनुमोदन. मतलाही आवडला.

मतला आवडला.
'सारे हुषार' हा शेर कळला नाही.
"जीवन विनोद आहे" मृत्यूस मी म्हणालो
"आले कधीच नव्हते इतके हसायलाही"..
क्या बात है... अप्रतिम!

"जीवन विनोद आहे" मृत्यूस मी म्हणालो
"आले कधीच नव्हते इतके हसायलाही"

ज्ञानेश,
माफ करा! माझ्या कमकुवत संभाषणशैलीमुळे आपल्याला 'सारे हुषार' हा शेर भिडला नाही याबद्दल!
माझा असे म्हणण्याचा प्रयत्न होता की जगामधे मीच नसल्यामुळे जे सगळे हुषार लोक होते त्यांना आता काहीच उद्योग राहिलेला नाही कारण फसणारा माणूसच नाही!
धन्यवाद!