किती दिवस मी रदीफ व्हावे

किती दिवस मी  रदीफ व्हावे बोल सख्या रे
मीच काफिया ओळख माझे मोल सख्या रे

 

कशी  अवेळी  अशी  टपकते कविता वेडी
सावर मजला जातो माझा तोल सख्या रे

 

ते   तेव्हांचे  गीत  गुलाबी  अता  कशाला?
जरी  हवेसे  बुडवी  मज  ते खोल सख्या रे

 

मम ह्रदयाची सतार सुंदर वाजत असता
का ऐकावा सदा तुझा मी ढोल सख्या रे?

 

दिवस कोरडे हे पण सरतिल मेघ वर्षतिल
स्मरण ठेव तू पृथ्वी आहे गोल सख्या रे

 

जागेपणी तव लाख बहाणे फुत्कारांचे
स्वप्नामध्ये गझलेवरती डोल सख्या रे

 

जाऊदे मज अता 'सुनेत्रा' भेट उद्या तू
तास संपला पहा वाजला टोल सख्या रे 

गझल: 

प्रतिसाद

वाह. दमदार गझल सादर केलीत. अभिनंदन.
हे तीन शेर आवडले-

कशी  अवेळी  अशी  टपकते कविता वेडी
सावर मजला जातो माझा तोल सख्या रे

ते   तेव्हांचे  गीत  गुलाबी  अता  कशाला?
जरी  हवेसे  बुडवी  मज  ते खोल सख्या रे

दिवस कोरडे हे पण सरतिल मेघ वर्षतिल
स्मरण ठेव तू पृथ्वी आहे गोल सख्या रे..

"पृथ्वी  गोल" चा  शेर अप्रतिम आहे. शेवटचाही खास.
 मतला मात्र नीट कळला नाही. (हा दोष आमच्याकडेच.)
आमचाही एक शेर-(जित्याची खोड..!)
"दोन  कोरडे  डोळे  घेऊन  भेटत  राहू,
जपून  ठेवू  ह्रदयामधली  ओल सख्या  रे.."

धन्यवाद आणि शुभेच्छा.


सन्माननीय सुनेत्रा सुभाष,

अभिनंदन! चांगली गझल ! आणखीन गझला येऊदेत. पृथ्वीचा शेर आवडला. ज्ञानेश्ने केलेला शेर पण आवडला.

मतल्याचा अर्थ - ( माझ्यामते...ज्ञानेशसाठी देत आहे ) - रदीफ ही उंटावरील स्वाराच्या मागे बसणारी स्त्री असते. ती कायम मागेच बसते. स्वाराबरोबर जात राहणे एवढेच ती करते, असे काहीतरी. त्या रदीफ वरून गझलेतील अंत्ययमकाला रदीफ हा शब्द आलेला असून गझलेतील रदीफ कायम काफियाच्या मागे बसून आपली जात राहते. ( अर्थात गझलेतील रदीफांना खूप महत्व असते..अरबस्तानातील वाळवंटातील रदीफांना नसले तरी..्हे मागे एक आजोबा म्हणुन होते त्यांनी  समीर चव्हाण यांच्या एका गझलेवर प्रतिसादामार्फत सिद्ध करण्याचा त्यांच्या शैलीमधे प्रचंड प्रयत्न केला होता. ) त्यावर एका समीक्षकांनी अनुमोदन देऊन 'नवल' कधी वाटू शकते याबाबत विस्तॄत चर्चा केली. तेव्हापासून मला माझ्या तथाकथित गझलांमधे 'रदीफ' घ्यायची भीती बसली. एकदा मी स्वतःच माझ्या एका गझलेमधे ' ही रदीफ मिरवायला घेतली आहे असे वाटते काय?' असा प्रश्नही विचारला. असो. हल्ली बिचार्‍या रदीफा मोकळेपणाने गझलेत येऊन बसतात. या शेरात कवयित्रीला असे म्हणायचे आहे की सारखी बिनमहत्वाची भूमिका मी काय म्हणुन घ्यायची किंवा खरे तर माझीच भूमिका महत्वाची आहे. पण समीर चव्हाण यांच्या त्या गझलेनंतर रदीफ किती महत्वाची असते ते एकदम 'अंगवळणीच' पडले लोकांच्या!  

 

 

किती दिवस मी  रदीफ व्हावे बोल सख्या रे
मीच काफिया ओळख माझे मोल सख्या रे

कवयित्री या शब्दासाठी आम्ही कवी हाच शब्द वापरत आहोत. मुळात या रचनेमधे रदीफामधे येणारा 'रे' अनावश्यक आहे असे आमचे मत आहे. तो वृत्तासाठी असू शकेल. पण वृत्त म्हणजे दुसरे तिसरे काही नसून लघू व गुरू या अक्षरांची मांडणी वरील ओळीप्रमाणे खालील ओळीत असली की बास झाले. त्याला विविध नावांनी ओळखले पाहिजे या सर्व आवश्यकता ज्यांच्या असतात त्यांना त्या असूदेत. कवी मतल्यामधे जो मुद्दा मांडत आहे त्या मुद्द्याला स्वतःच 'रे' हे अक्षर घेऊन विरोध करत आहे. म्हणजे 'रे' घेतला आहे अन विचारले आहे की माझी खरी भूमिका  काफियाप्रमाणे नाही का? 'किती दिवस मी रदीफ व्हावे बोल सख्या....मीच काफिया ओळख माझे मोल सख्या' ही ओळ चुकतीय थोडीच? असो. आता 'सख्या' हा जो शब्द आहे त्याची आवश्यकता अशी की कवी हे सगळे तिच्या सख्याला सांगत आहे. पण ही जी आवश्यकता आहे ती फक्त मतल्यात व्यक्त झाली तरी रसिकांना हे कुणासाठी आहे हे समजू शकेल. म्हणजे असे: मीच सदा का सख्या असावे 'रदीफ' बोल्.....मीच खरा काफिया जरा हे ओळख मोल' या ओळी घेतल्यावर सख्या हा शब्द पुन्हा रचनेमधे नाही आला तरी चालू शकेल असा आमचा अंदाज आहे. 'मीच का सदा रदीफ बोल्..मीच काफिया ओळख मोल' हे पण चालावे. म्हणायचा मुद्दा असा की कवी भूषणने वर जी सत्यकथा कथन केली आहे त्यातील पितामहांनी फक्त 'रदीफाची फरफट' हा विषय हाताळला होता. म्हणजे एका कुठल्यातरी शेरात त्यांना रदीफाचे प्रयोजन पटले नाही म्हणुन त्यांनी तसे स्पष्ट म्हंटले होते. या गझलेमधे आमच्यामते अख्खी रदीफच ( गझलेतील रदीफ ) कँन्सल केली जाऊ शकेल. या आमच्या उक्तीला पितामह बहुधा स्वीकारतील असा आम्हाला विश्वास आहे. मात्र या शेरातून कवी स्त्रीची भूमिका वास्तवात किती महत्वाची असते अन त्या तुलनेत तिला किती कमी  महत्व दिले जाते यावर प्रकाश टाकतो. चांगला आशय, चांगली तुलना ( गझलेतील रदीफाशी ).  ( आम्ही ज्या ओळी रचून दाखवल्या आहेत त्याप्रमाणे प्रयत्न केल्यास पूर्ण गझल रीऑर्गनाईझ करता येईल. )

कशी  अवेळी  अशी  टपकते कविता वेडी
सावर मजला जातो माझा तोल सख्या रे

आता बघा. मतल्यामधे सख्याशी माझी भूमिका काय या विषयावर कवी बोलत होता. या शेरात मात्र त्या सख्याची भूमिका अशी होतीय की कवीकडे मधुनच कविता टपकली की त्याने कवीला सावरावे. असे जर असेल तर हा कवी सख्याला 'रदीफ' न वाटता 'काफिया' का बरे वाटावा? रदीफ नसेल तर गझल असू शकते, काफिया नसेल तर असू शकत नाही. मग जर कवीला 'काफिया ' होऊन संसाराच्या किंवा जीवनाच्या गझलेला चालवायचे असेल तर कवीला सावरण्याची वेळ सख्यावर येता कामा नये. पण हा एक स्वतंत्र शेर म्हणुन बघितल्यास ( जे आवश्यक आहेच ) या शेराचा अर्थ चांगला आहे. कवितेने किंवा गझलेने कवीला किती प्रचंड नशा होते त्याचे यात वर्णन आहे.

 

ते   तेव्हांचे  गीत  गुलाबी  अता  कशाला?
जरी  हवेसे  बुडवी  मज  ते खोल सख्या रे

'आता कशाला' मधून अशा अपेक्षा वाटतात की आता ते जुने प्रेम उरलेले नाही. आता तो तिला सोडुन गेला आहे. आता त्या गीताने अंगावर मोरपीस न फिरता त्याने त्रासच होतो. पुढच्या ओळीत कवी म्हणतो की ते अजूनही हवेसे आहे, फक्त ते आठवणींमधे खोल बुडवते. आमच्यामते या शेराला अजून उंचीवर न्यायला पाहिजे. म्हणजे असे की ते गीत ऐकल्यावर कवीला आता प्रचंड मनस्ताप होतो वगैरे असे काहीतरी. 

 

मम ह्रदयाची सतार सुंदर वाजत असता
का ऐकावा सदा तुझा मी ढोल सख्या रे?

हा शेर काही समजला नाही. सख्या ढोल वाजवतो म्हणजे नेमके काय करतो ते कलले नाही.

 

दिवस कोरडे हे पण सरतिल मेघ वर्षतिल
स्मरण ठेव तू पृथ्वी आहे गोल सख्या रे

चांगला शेर! दिवस बदलतात हे सांगण्यासाठी पृथ्वीच्या आवर्तनांना वापरलेले आहे ते चांगल्या पद्धतीने!

 

जागेपणी तव लाख बहाणे फुत्कारांचे
स्वप्नामध्ये गझलेवरती डोल सख्या रे

व्वाह! आमच्यामते हाही शेर स्त्रीच्या परंपरागत व्यथांना वाट फोडतो. म्हणजे तिची काही स्वप्ने असतात. तिचा सखा किंवा पती जो कोण असेल तो पुर्वीइतकी साथ देत नाही. ती बिचारी त्याच अपेक्षा ठेवून वागत असते. दिवसा तो तिच्याशी वाटेल तसा वागतो. ती ते सर्व सोडुन देते. रात्री स्वप्नात बिचारी एक गझल सादर करते अन मग त्यावर तिचा तो सखा डोलतो. ती खुष होते. व्वाह! एकदम गझलेचा शेर! स्त्रीचे मन एका स्त्रीशिवाय कोण जाणणार?कवीने बरोब्बर जाणले आहे.  कवीने हा शेर खरोखरच अप्रतिम रचला आहे. समीक्षकांच्या डोळ्यात पाणी आले.

 

जाऊदे मज अता 'सुनेत्रा' भेट उद्या तू
तास संपला पहा वाजला टोल सख्या रे 

या शेरात काहीतरी चुकल्यासारखे वाटते. पहिली ओळ कुनाला उद्देशून आहे अन दुसरी कुणाला ते कलत नाही. मुमताज राशिद यांच्या एका गझलेतील शेवटच्या शेरात त्यांचे नाव कसे गुंफले आहे पहा:

राशिद तुम आगये हो ना आखिर फरेब मे
कहते ना थे जनाब जमाना खराब है

हे स्वगत झाले.

मै वही हू मोमीनेमुब्तिला तुम्हे याद हो के न याद हो

हे दुसर्‍याला सांगणे झाले.

कवीच्या या शेरात कोण कुणाला काय सांगत आहे ते स्पष्ट होताना दिसत नाही. कवीने खुलासा करावा.

आशयाच्या दृष्टीने साधी, स्त्रीची गझल असणे हे एक थोडेसे नावीन्य, वृत्त हाताळणी व 'डोल सख्या रे' या अप्रतिम शेरामुळे गझल चांगली झाली आहे.

१०० पैकी ६०. ( यातील ३० गुण एकट्या 'डोल सख्या रे' या शेराला आहेत.)

खुलासा-
 
टोल- शाळेतील तास संपल्यानंतर वाजणारा टोल
सख्या रे - रसिक वाचका, समीक्षका!
'जीव' म्हणजेच देहामधील चैतन्य स्वरूप आत्मा म्हणत आहे की, "सुनेत्रा (देहरूपी चैतन्याचे या जन्मातील नाव), आता मला जाऊ दे, कारण आता या जन्मातील जगण्याचा तास संपला आहे. टोल वाजला आहे. म्हणून आपण उद्या म्हणजेच पुढच्या जन्मी भेटू."
ज्ञानेश, भूषण कटककर आणि गंभीर समीक्षक यांचे मनापासून आभार

मा. सुनेत्रा,

"दोन  कोरडे  डोळे  घेऊन  भेटत  राहू,
जपून  ठेवू  ह्रदयामधली  ओल सख्या  रे.."

छान.

Nice ghazal, Sunetraji!
The Matla is well explained by Sh. Bhushan. That must be the real meaning of it.
Additionally, one may draw another meaning from the Matla...Radeef is constant throughout the ghazal whereas there is a new Kafiya in every sher. Thus, Radeef may be looked upon as a symbol of monotony whereas Kafiya offers change and greater freedom. When a woman is not emancipated and is very much bound, she is forced to live a routine and restricted life (Radeef).
Regards,
Dhananjay
PS. Engrajee baddal kshmaswa. Mala ajun devnagrimadhe lihine yet nahi...mhanje ya websitewar!

या गझलेने व चर्चेने ज्ञानात बरीच भर घातली. धन्यवाद !!

कशी  अवेळी  अशी  टपकते कविता वेडी
सावर मजला जातो माझा तोल सख्या रे (अगदी ़खरे)

मम ह्रदयाची सतार सुंदर वाजत असता
का ऐकावा सदा तुझा मी ढोल सख्या रे? (मस्तच)

हे शेर फार आवडले....