शुन्य शुन्यातुन वजा
मारल्या गप्पा स्मशानी अन निघाली माणसे
शुन्य शुन्यातुन वजा झाले म्हणाली माणसे
एक पुटपुटला म्हणे गेलाय का नक्की बघा...
चांगली सुस्तावता अस्वस्थ झाली माणसे
'गझल, मदिरा, आसवे, अनुपस्थिती नशिबी तिची'
द्यायला खांदा मला ही चार आली माणसे
"या न पिंडाला शिवा", पिल्लांस बोले कावळा
"शिवत होती बाटग्याला काल साली माणसे"
जन्मभर आली करत जी कोतवाली माणसे
काळ येता सत्वरे शेपूट घाली माणसे
"हे कधी घडलेच नाही, काय हे?" तिरडी म्हणे
"ठेवले सजिवास वर, निर्जीव खाली माणसे"
काल हाडाच्या कवीला जाळले त्वेषामधे
आजे हाडे ढापण्याला परत आली माणसे
गझल:
प्रतिसाद
जमीर इब्राहिम
मंगळ, 25/11/2008 - 20:30
Permalink
शाश्वत सत्य...
भुषण दा .......
कसला जबर्दस्त टाक्ला आहे हो हा शेर तुम्ही....!
"हे कधी घडलेच नाही, काय हे?" तिरडी म्हणे
"ठेवले सजिवास वर, निर्जीव खाली माणसे"
मस्तच एकदम.... कारण तिरडी शिवाय पोचवायचा इतका दांडगा अनुभव कोणाला असणार ...!!!
काल हाडाच्या कवीला जाळले त्वेषामधे
आजे हाडे ढापण्याला परत आली माणसे....
अप्रतिम...
...पण काही लोक दुसर्या ओळीला ऑप्जेक्शन घेतील (ते कोण त्यांचे नाव येथे देत नाही पण सुज्ञास सांगणे नलगे...:-) ) की जाळ्ल्यावर दुसर्या दिवशी परत हाडे ढापायला कसे येतील लोक...? :-)
मला तर ती ओळ मस्तच वाटत आहे पण "रा़ख" शब्द घेउन कही करता आले तर बघा की ..?
राग मानु नका... लहान तोंडी मोट्ठा घास घेतो आहे....
काल हाडाच्या कवीला जाळले त्वेषामधे
आज त्याची राख झाडण्या आली माणसे....
व्रुत्त, व्याकरण वगेरे तुम्हीच बघा .. कारण तुमचा त्या बाबतीतला अनुभव माझ्यापेक्षा दांड्गा आहे....
.....
भूषण कटककर
बुध, 26/11/2008 - 10:33
Permalink
धन्यवाद!
जमीरसाहेब,
धन्यवाद!
मी अजून लिंबूटिंबूच आहे. माझा अभ्यास दांडगा वगैरे काहीही नाही. मात्र आधी माझा एक गैरसमज झाला आपला प्रतिसाद वाचून. आपण म्हंटले आहेत की 'तिरडीशिवाय पोहोचवायचा इतका अनुभव कुणाला असणार'. हे वाचून मला असे वाटले की आपण म्हणत आहात की मी लोकांना तिरडीशिवाय पोहोचवायला बघत असतो. हा हा हा हा! नंतर कळले की आपल्याला म्हणायचे असावे की तिरडीइतका अनुभव कुणाला असणार पोहोचवण्याचा!
हाडे - या शेरात मला असे म्हणायचे आहे की लोक आदल्यादिवशी प्रेत जाळतात व दुसर्या दिवशी अस्थि घ्यायला जातात. म्हणुन काल ज्या हाडाच्या कवीला जाळले त्याचे महत्व बहुधा आज समजले असावे किंवा ती हाडे वेचून त्याचे कवित्व मिळवता येईल असे वाटल्याने लोक ती हाडे ढापायला आज परत जमली. अर्थात हा सर्व गर्विष्ठपणाच आहे. मी जाणतो की मी इतका मोठा कवी नाही, एक आपला कल्पनाविलास!
आपण राखेबद्दल लिहिले आहेत : आपला शेर चांगला आहे. आपल्या या 'इर्शाद' मुळे 'राख' या विषयावर मी खालील शेर रचत आहे. आशा आहे की आपल्या पसंत पडेल.
आश्रया नाकारती जे मज हयातीभर इथे
भांडती राखेपुढे होण्यास 'वाली' माणसे
आणखीन एकः
खानदानी थाट मी होता दिलेला गझलला
राख होता, मारती शिट्टी मवाली माणसे
आपल्या प्रतिसादासाठी मनापासून धन्यवाद! कुणालातरी काहीतरी आवडते हेही नसे थोडके.
कौतुक शिरोडकर
बुध, 26/11/2008 - 14:47
Permalink
अस्वस्थ
एक पुटपुटला म्हणे गेलाय का नक्की बघा...
चांगली सुस्तावता अस्वस्थ झाली माणसे
हा जास्तच भावला.