आता
मळभ मंदीचे नभी दाटेल आता
मेघ आषाढातही आटेल आता
काळजाला ती घरे पाडून गेली
वर तिचा संसारही थाटेल आता
पेच माझी मी’पणाशी लागलेली
कोण कोणाला बघू काटेल आता!
साकडे त्याच्याकडे घालू कसे मी?
भय असे की दु:ख तो वाटेल आता
सुप्त ओलावा नद्यांचा लुप्त झाला
सागराला कोरडे वाटेल आता
जन्मत: मी फाटका होतो तसाही
शोक का मग जर कफ़न फाटेल आता?
मी असा ठिपक्यात आहे विखुरलेला
कोण रांगोळीस रेखाटेल आता?
तू कुठे होतोस त्यांना सहन मौना
गप्प करण्याचे तुला घाटेल आता
जिंदगी अस्पृश्य तर होतीच माझी
कावळा त्यांचा म्हणे बाटेल आता
गझल:
प्रतिसाद
अजय अनंत जोशी
मंगळ, 25/11/2008 - 12:12
Permalink
साकडे, गप्प
साकडे त्याच्याकडे घालू कसे मी?
भय असे की दु:ख तो वाटेल आता व्वा!
तू कुठे होतोस त्यांना सहन मौना
गप्प करण्याचे तुला घाटेल आता गप्प. वा.
मतलाही वेगळा आणि छान.
मी परिक्षक नाही. म्हणून १०० पैकी ५००
कलोअ चूभूद्याघ्या
गंभीर समीक्षक
मंगळ, 25/11/2008 - 13:04
Permalink
सुंदर गझल!
मळभ मंदीचे नभी दाटेल आता
मेघ आषाढातही आटेल आता
'मंदीचा' असा शब्द घ्यायचा असावा. सुंदर सुरुवात!
काळजाला ती घरे पाडून गेली
वर तिचा संसारही थाटेल आता
सुंदर शेर आहे. भग्नहृदयी माणसाची व्यथा मांडली आहे.
पेच माझी मी’पणाशी लागलेली
कोण कोणाला बघू काटेल आता!
'पैज' असा शब्द घ्यायचा होता की काय माहीत नाही. हा शेर फार अर्थपूर्ण आहे. माणूस स्वत:च्या भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा जगाने दिलेली दु:ख सहन करण्यासाठी बर्याचदा स्वत्व सोडून वेगळा वागतो. त्यात परत 'आपण जसे आहोत तसे जगण्याची इच्छा' होतच असते. एकाच माणसाच्या दोन व्यक्तिमत्वांची अस्तित्वासाठी चढाओढ सुरू होते. फार सुंदर शेर आहे.
साकडे त्याच्याकडे घालू कसे मी?
भय असे की दु:ख तो वाटेल आता
या शेरातील 'वाटेल' अन पुढच्या शेरातील 'वाटेल' वेगवेगळ्या अर्थाचे आहेत ही एक चांगली गोष्ट आहे. त्याने सशक्तपणा वाढतो. अर्थात 'वाटेल' हा शब्द त्याच्या दोन अर्थांनी दोन वेगवेगळ्या शेरांमधे ओवणे हे फारसे अवघड नसले, तरीही कवीने शेर रचताना 'काफियां'च्या विविध अर्थांवर विचार करून शेर रचले तर मजा येते. हा शेर ठीक आहे.
सुप्त ओलावा नद्यांचा लुप्त झाला
सागराला कोरडे वाटेल आता
आधीच तो ओलावा सुप्त होता. तोही लुप्त झाला. सुप्त अन लुप्त या शब्दांच्या उच्चारामुळे आपोआप एक सौंदर्य प्राप्त होतेच ओळीला. कवीने या शेराचा संदर्भ स्वतःच सांगावा!
जन्मत: मी फाटका होतो तसाही
शोक का मग जर कफ़न फाटेल आता?
'कफन फाटेल' ही शक्यता का निर्माण झाली असावी? त्याचे प्रयोजन विचार करायला लावते हे जरा खटकते. 'राहिला काटा तिचा तस्साच हृदयी, आटण्याआधी कफन फाटेल आता ' असे असते तर 'फाटेल'चे प्रयोजन लक्षात येऊ शकते.
मी असा ठिपक्यात आहे विखुरलेला
कोण रांगोळीस रेखाटेल आता?
हासिल-ए-गझल!
तू कुठे होतोस त्यांना सहन मौना
गप्प करण्याचे तुला घाटेल आता
सुंदर शेर!
जिंदगी अस्पृश्य तर होतीच माझी
कावळा त्यांचा म्हणे बाटेल आता
ठीक शेर!
ही गझल सर्व दृष्टीने एक 'गझल' आहे. 'सुंदर' या पातळीवर जाणारी. १०० पैकी ७०.
समीर चव्हाण (not verified)
मंगळ, 25/11/2008 - 16:39
Permalink
सुंदर
मी असा ठिपक्यात आहे विखुरलेला
कोण रांगोळीस रेखाटेल आता
अगदी हलवणारा शेर...
जमीर इब्राहिम
बुध, 26/11/2008 - 01:04
Permalink
कसला भारी....
मिल्या... (जी, राव, साहेब काहीच जुळत नाहिये...)
मळभ मंदीचे नभी दाटेल आता
मेघ आषाढातही आटेल आता.....
आजकलच्या परिस्थितीवर चप्खल बसणारा शेर...
मी असा ठिपक्यात आहे विखुरलेला
कोण रांगोळीस रेखाटेल आता......
एक नम्बर शेर आहे भाऊ...!!!!!
तू कुठे होतोस त्यांना सहन मौना
गप्प करण्याचे तुला घाटेल आता....
जबरी.....अल्टिमेट......
.... जमीर
भूषण कटककर
बुध, 26/11/2008 - 12:03
Permalink
भन्नाट गझल!
मिल्या,
भन्नाट गझल आहे. फारच मजा आली.
कौतुक शिरोडकर
बुध, 26/11/2008 - 14:51
Permalink
रांगोळी
मी असा ठिपक्यात आहे विखुरलेला
कोण रांगोळीस रेखाटेल आता......
क्लास.
प्रदीप कुलकर्णी
गुरु, 27/11/2008 - 02:06
Permalink
वा... वा...!
काळजाला ती घरे पाडून गेली
वर तिचा संसारही थाटेल आता
छान कल्पना...
पेच माझी 'मी’ पणाशी लागलेली
कोण कोणाला बघू काटेल आता!
वा...!
सुप्त ओलावा नद्यांचा लुप्त झाला
सागराला कोरडे वाटेल आता
वा... वा...!
मी असा ठिपक्यात आहे विखुरलेला
कोण रांगोळीस रेखाटेल आता?
सु रे ख!
ज्ञानेश.
गुरु, 27/11/2008 - 09:51
Permalink
सुरेख.
सर्वच शेर आवडले.
त्यातही हे तीन लाजवाब-
सुप्त ओलावा नद्यांचा लुप्त झाला
सागराला कोरडे वाटेल आता
मी असा ठिपक्यात आहे विखुरलेला
कोण रांगोळीस रेखाटेल आता?
तू कुठे होतोस त्यांना सहन मौना
गप्प करण्याचे तुला घाटेल आता
धन्यवाद.
चित्तरंजन भट
शुक्र, 28/11/2008 - 16:14
Permalink
रांगोळी फारच छान
रांगोळी फारच छान. पेचाचा शेर फार आवडला. कावळाही. एकंदर गझल छान झाली आहे. सलग तीनचार लघू कुठेकुठे कानाला खटकतात. मंदी आणल्याने शेर कंटेपररी झाला आहे खरा. मळभाच्या शेरात अधिक सूचकता हवी होती असे वाटले.
मिल्या
शुक्र, 05/12/2008 - 13:20
Permalink
धन्यवाद
प्रतिसादाबद्दल सर्वांना खूप धन्यवाद
समिक्षक : तुम्ही अगदी प्रत्येक शेराची सविस्तर समिक्षा करता ते खरेच कौतुकास्पद आहे.. तुमच्या सुचना चांगल्या आहेत नक्की त्यादृष्टीकोनातून विचार करेन
चित्त : तुम्ही केलेल्या सुचनाही आवडल्या.. विशेषतः कफन ह्या शेरामध्ये फार अडखळायला होते आहे.. चांगले काही सुचतेय का विचार करतो...
गंभीर समीक्षक
शुक्र, 05/12/2008 - 14:45
Permalink
चालत असेल तर.......
कवी मिल्या,
धन्यवाद! आपल्याला आवडत असेल तर मी आपल्या सर्व गझलांवर निष्पक्ष प्रतिसाद देत जाईन.
तसेच ज्यांना कुणाला आवडत असेल त्यांच्या गझलेवर निष्पक्ष प्रतिसाद द्यायला मला आवडेल.
निष्पक्ष म्हणजे कवीला काय वाटते हे न बघता फक्त समोर आलेल्या गझलेवर प्रतिसाद देणे!
अनंत ढवळे
शनि, 06/12/2008 - 08:53
Permalink
मी असा ठिपक्यात आहे विखुरलेला
पेच माझी मी’पणाशी लागलेली
कोण कोणाला बघू काटेल आता!
मी असा ठिपक्यात आहे विखुरलेला
कोण रांगोळीस रेखाटेल आता......
व्वा !