...जन्म चकव्यासारखा !

.......................................
...जन्म चकव्यासारखा !
.......................................


भेटशी का सांग फसव्यासारखा ?
टाळशी का कर्जबुडव्यासारखा ?


या मनाचा कोणता आजार हा ?
वाटतो आराम थकव्यासारखा !


सोस तू आयुष्य मर्दासारखे...
सारखा रडतोस, हळव्या, सारखा !


अवनती ही आज उजव्याची किती...
भासतो डावाच, उजव्यासारखा !


पाळला जावा, असे आहे कुठे ?
शब्द हा माझा न फतव्यासारखा !


केस रात्री मोकळे झाले तुझे...
गंध आला धुंद, मरव्यासारखा !


गोष्ट माझी मी सुरू केली पुढे....
गाव हा बसला उकिडव्यासारखा !


हा हवा होता गुलाबी ना जरा ?
रंग मेंदीचा न तळव्यासारखा !

दाबली माझ्यातली ठिणगी कुणी ?
मी अता पसरेन वणव्यासारखा !!


चेहरा डोळ्यांपुढे येतो तुझा...
जे न सुचले, त्याच कडव्यासारखा !!


वाट मृत्यूच्या दिशेने चालता...
लागला हा जन्म चकव्यासारखा !


- प्रदीप कुलकर्णी

गझल: 

प्रतिसाद

सुबकता हा आपला गुणधर्म आहेच. आणखी काय बोलणार?
सोस तू आयुष्य मर्दासारखे...
सारखो रडतोस, हळव्या, सारखा !

हेच प्रश्नार्थक केले तर ...
सोस तू आयुष्य मर्दासारखे...
का असा रडतोस.. हळव्यासारखा ?
कसे वाटेल?

चूभूद्याघ्या.

या मनाचा कोणता आजार हा ?
वाटतो आराम थकव्यासारखा !
 दाबली माझ्यातली ठिणगी कुणी ?
मी अता पसरेन वणव्यासारखा !!
वाट मृत्यूच्या दिशेने चालता...
लागला हा जन्म चकव्यासारखा !
सर्वच शेर आवडले.तरीही वरील विशेष.

-

दाबली माझ्यातली ठिणगी कुणी ?
मी अता पसरेन वणव्यासारखा !!


चेहरा डोळ्यांपुढे येतो तुझा...
जे न सुचले, त्याच कडव्यासारखा ...
हे दोन शेर विशेष आवडले.

प्रदीप, गझल आवडली.
न सुचलेले कडवे विशेष..

मि. प्रदीप,
छान गझल. मला दोन शेर सुचले. आपल्या गझलेवर शेर रचण्याची व बरोबरी दाखवण्याची इच्छा आहे असे कृपया समजू नये. काफिया आवडले म्हणून हे शेर रचले.
मागतो नेता मते, तेव्हा मला
भासतो बाजारबसव्यासारखा
हालचाली संपती नी खुंटती
प्रेम आहे रोग लकव्यासारखा
 
 
 
 

प्रतिसाद देणाऱ्या सगळ्यांचे मनापासून आभार...लोभ आहेच; असाच राहू द्यावा.

भेटशी का सांग फसव्यासारखा ?
टाळशी का कर्जबुडव्यासारखा ? <?xml:namespace prefix = o ns = "urn:schemas-microsoft-com:office:office" /?>


गझलेच्या दिग्गजांनी केलेल्या विविध व्याख्या:


१. गझल म्हणजे स्त्रीशी केलेला संवाद.


२. गझल म्हणजे शिकार्‍याला पाहून जिवाच्या आकांताने धावणार्‍या हरणाची शिंगे झाडात अडकून त्याला स्वतःची सुटका करता न आल्याने व अशातच शिकारी बराच जवळ आल्याचे पाहून अत्यंत असहाय्य अवस्थेत त्याने केलेल्या करूण रूदनाचे नाद.


३. गझल म्हणजे स्वतःशी केलेला संवाद


४. गझल म्हणजे 'नशा' येणार्‍या शेरांची मालिका.


५. गझल म्हणजे मन उलगडणे.


हे विविध दृष्टीकोन आहेत.


आता मतल्याबद्दल! तू फसव्यासारखा का भेटतोस म्हणजे स्वच्छ विचारांनी भेट असे म्हणायचे आहे की भेटणार नाही असे सांगून का भेटतोस म्हणायचे आहे की फसव्यासारखा भेटशील का असे विचारायचे आहे अशा शंका येऊ शकतात. मात्र हा जीवनाशी केलेला संवाद आहे. तेव्हा "कायम एखाद्या फसव्यासारखा का भेटतोस?" असा तो प्रश्न आहे. टाळशी का कर्जबुडव्यासारखा मधे कर्जबुडवे कोण आहे ते लक्षात यायला अडचण होतीय. विचारणारा की टाळणारा. अर्थात सगळे म्हणतील की कर्जबुडवा नेहमी स्वतःच देणेकर्‍यांना टाळतो. पण काहीकाही वेळा अनुभव असल्यामुळे देणेकरीपण कर्जबुडव्याला टाळू शकतात. पण इथे त्याचा अर्थ आहे की " हे जीवना, तू माझे कर्ज फेडणे टाळायचे असल्यासारखा का बरे मला टाळतोस?".  श्रेष्ठ शेर!  गझलेची ५ वी व्याख्या लागू पडते.


 


 


या मनाचा कोणता आजार हा ?
वाटतो आराम थकव्यासारखा !


मनाला वर्षानुवर्षे सतत कष्टांची ( मानसिक कष्ट ) , उपेक्षेची वा यातनांची सवय असल्यामुळे मधेच नशिबात थोडा आराम मिळाला तर विचित्र वाटते. मात्र हा शेर मतल्याच्या उंचीवर गेलेला नाही.  येथेही गझलेची ५ वीच व्याख्या लागू पडते.


 


सोस तू आयुष्य मर्दासारखे...
सारखा रडतोस, हळव्या, सारखा !


गझलेची ३ री व्याख्या लागू पडते. हा शेरही विधानात्मक पातळीवर आणुन सोडला आहे. "आयुष्य जरा मर्दासारखे सोस की?, सारखा रडतोस काय हळव्यासारखा? " अन "सोस तू आयुष्य मर्दासारखे, सारखा रडतोस हळव्यासारखा" या दोन शब्दरचनांमधे खूप फरक वाटत नाही.


 


अवनती ही आज उजव्याची किती...
भासतो डावाच, उजव्यासारखा !


व्वाह! सुंदर! यातील 'आज' या शब्दाचे प्रयोजन असे आहे की आधी इतकी अवनती झालेली नव्हती, आता झाली.

 


पाळला जावा, असे आहे कुठे ?
शब्द हा माझा न फतव्यासारखा !

ऍक्चुअली ही एक व्यथा मांडलेली आहे कवीने. कुठल्याही माणसाला सुखी म्हणण्याच्या प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे त्याचे म्हणणे समाज किंवा संपर्कात येणार्‍या व्यक्ती मान्य करतात. मानसाचे शब्द म्हणजेच 'तो माणूस'! कारण आपण आपल्याला जे हवे तेच बोलण्याचा चिरंतन प्रयत्नात असतो. तसेच आपण दुसर्‍याने आपले म्हणणे मान्य करावे याही प्रयत्नात सतत असतो. हा शेर प्रॅक्टिकली एकांतामधे सुचू शकतो. या शेराची निर्मीती होण्यासाठी जनसंपर्क नसणे अत्यावश्यक आहे. हेही तसे स्वगतच आहे. गझलेची ३री व्याख्या इथेही लागू पडते.


 


केस रात्री मोकळे झाले तुझे...
गंध आला धुंद, मरव्यासारखा !

'तू तर कधीच माझ्या सहवासात नसतेस आणि नव्हतीस, तरीही मला कल्पनेमधे तुझे केस मोकळे झाले असून त्याचा सुगंध माझ्यापर्यंत पोहोचतो आहे असे वाटले' असे विधान जास्त काव्यमय ठरू  शकेल. शेरामधे असे विधान केले आहे की 'तुझे केस मोकळे झाले अन मला त्यांचा सुगंध जाणवला'. हे विधान 'विधानात्मक' होत आहे. अर्थात कवी ज्या मनस्थितीत असतो ते इतरांना जाणवणे अथवा इतरांनी त्यावर भाष्य करणे हे जरा क्लिष्ट आहे. आधीच्या शेरांमधून ज्या व्यथा प्रकट होत आहेत त्याच्या अनुषंगाने जाणारा हा शेर नसून प्रेयसीचा सहवास कवीला 'मिळतो' आहे अशा स्वरुपाचा शेर आहे. म्हणजे 'पॉझिटिव्ह' स्वरुपाचा शेर आहे. येथे गझलेची पहिली व्याख्या लागू पडते.


 


गोष्ट माझी मी सुरू केली पुढे....
गाव हा बसला उकिडव्यासारखा !
व्वाह! 'उकिडवे' बसणे यात एक मोठा अर्थ आहे. माणूस उकिडवा तेव्हा बसतो जेव्हा तो रिलॅक्स्ड अवस्थेत असतो किंवा रिकामा असतो ( कामामधे नसतो ). अर्थात मजूर किंवा माळी वगैरे लोक उकिडवे बसून काम करतात ते सोडा. कवीची कहाणी काहीतरी अशी आहे की पूर्ण गाव ती ऐकायला सगळे सोडुन बसला. वाचकांनो, हा शेर म्हणजे जातिवंत गझल-शेर आहे. नेमकी कहाणी काय आहे हे न सांगता ती कहाणी नेमकी कशी असावी याचे चित्रण करणे हे तसे अवघडच आहे. त्यातही परत सामान्य माणसालाही त्याचे आकलन तर होतेच पण दादही द्यावीशी वाटावी. इथे गझलची ४थी व ५ वी व्याख्या 'कंबाईंड' स्वरुपात लागू होताना दिसते. 

 

 


हा हवा होता गुलाबी ना जरा ?
रंग मेंदीचा न तळव्यासारखा !

परत पहिली व्याख्या लागू पडते. स्त्रीशी केलेला संवाद! मात्र हा शेर उंचीवर गेलेला नाही.


 


दाबली माझ्यातली ठिणगी कुणी ?
मी अता पसरेन वणव्यासारखा !!

उत्तम शेर! हेही तसे स्वगतच आहे. या शेरामधे 'कुणी' या शब्दाचे प्रयोजन थोडे अशक्त आहे. म्हणजे 'ठिणगी दाबली गेली' अशा अर्थाचे विधान केले ( ज्यात 'कर्ता' नाही ) तरी शेराचा अर्थ तोच राहील. मात्र 'दाबले माझ्यातल्या ठिणगीस मी' असे म्हंटले तर अर्थ खूप बदलतो. तसेच 'दाबले' या शब्दाबद्दल संदेह आहे. ठिणगी बहुतांशी 'दाबली' जात नसून 'लावली' जाते. पण इथे कवीच्या मनात एक ठिणगी लपलेली आहेच. ती फक्त 'छेडायचा' अवकाश आहे. 'छेडली' हा शब्दही बसावा ( बसावा म्हणजे जास्त प्रयोजनाने बसावा ). गझलेची पहिली व्याख्या लागू पडते.


 


चेहरा डोळ्यांपुढे येतो तुझा...
जे न सुचले, त्याच कडव्यासारखा !!

व्वाह! उत्तम शेर. यावर फार म्हणजे फारच लिहिता येईल. कवी एक कविता किंवा गीत करत आहे. ते करताना त्याला नैसर्गीकरीत्याच एखादे कडवे किंवा एखादा मुद्दा सुचत नाही. अन तिचा चेहरा दिसला की त्याला असे वाटते की आपल्या गीतामधे हा चेहरा म्हणजे आपल्याला न सुचलेल्या कडव्यासारखा आहे. हा झाला एक अर्थ! दुसरा अर्थ म्हणजे ' न सुचणारे कडवे' म्हणजे जे लाभत नाही त्याच्यात प्रेयसीची गणना करण्यात आली आहे. म्हणजे बाकी सगळे सुचले ( लाभले ) पण हे काही सुचले नाही ( लाभले नाही ). इथे पहिली अन तिसरी व्याख्या लागू पडते.


 


वाट मृत्यूच्या दिशेने चालता...
लागला हा जन्म चकव्यासारखा !

सुंदर शेर. संपूर्ण जीवन म्हणजे एक 'चकवाच' आहे असे विधान करणारा शेर. याच्यात 'तत्वज्ञान' पण आहे अन 'स्वगत' पण आहे. सारे जीवन जगून झाल्यावर असे वाटले की असे काय विशेष होते या जीवनात? काहीच नाही! आलो अन चाललो. 'इब्राहीम जौक' या गालीबच्या 'काव्यस्पर्धका'च्या ओळी आठवतात.


लायी हयात आये कजा ले चली चले
अपनी खुषी न आये न अपनी खुषी चले!


नाजॉ न हो खिरदपे, जो होना है वो ही हो
दानिश तेरी न कुछ मेरी दानिशवरी चले


दुनियाने किसका राहे फना मे दिया है साथ?
तुम भी चले चलो युंही जबतक चली चले


कम होंगे इस बिसातपे हम जैसे बदकिमार
जो चाल हम चले वोह निहायत बुरी चले.


वाचकांनो, गझलेच्या आम्हाला ज्ञात असलेल्या व्याख्या इथे देण्याचे कारण एवढेच की नेमके कुठल्या रचनेला गझल म्हणता येईल ( अर्थातच आमच्यामते ) ते नमूद करता यावे. इथे प्रत्येक शेराला एक तरी व्याख्या लागू होतेच आहे. तेव्हा गझलसदृश रचना करताना या व्याख्या विचारात घेऊन रचना निर्मान व्हावी अशी एक आमची साधीसुधी अपेक्षा!


आशय, वृत्त, गझल या काव्यप्रकाराच्या जवळ जाण्याची क्षमता किती आहे या मुद्द्यांवर गझल खूप चांगली.


१०० पैकी  ६५


 


 



या गझलेवर मी एक अत्यंत दीर्घ व चांगला असा प्रतिसाद दिला होता. त्यात गझलेच्या ५ विविध व्याख्या देऊन त्या निकषांवर ही गझल कशी पूर्णपणे उतरते ते सिद्ध केले होते. असेही लिहिले होते की कुठलीही किंवा कुणाचीही गझल कशी या गझलेसारखी असायला हवी. मात्र तो प्रतिसाद गुप्त होऊन फक्त एक रिकामा चौकोन आलेला आहे.

आपला गुप्त झालेला प्रतिसाद पुन्हा द्या. वाचायला आवडेल नक्की.
(गुप्त होण्यामागे टंकलेखनीय चूकही असू शकते.)
तसा मी फारसा बोलत नाही.

प्रदीप,
दाबली माझ्यातली ठिणगी कुणी ?
मी अता पसरेन वणव्यासारखा !!
चेहरा डोळ्यांपुढे येतो तुझा...
जे न सुचले, त्याच कडव्यासारखा !!
...............खास 'प्रदीपस्पर्श' शेर! सुंदर गझल.
जयन्ता५२





जयन्ता५२


दाबली माझ्यातली ठिणगी कुणी ?
मी अता पसरेन वणव्यासारखा !!चेहरा डोळ्यांपुढे येतो तुझा...
जे न सुचले, त्याच कडव्यासारखा !!

वाट मृत्यूच्या दिशेने चालता...
लागला हा जन्म चकव्यासारखा !वाह