हवा

                                     गझल

                   कोणत्या गावातुनी आली हवा
                  का अशी वेडीपिशी झाली हवा

                  गाल हे पडद्यामधे झाकून घे
                 उडवुनी नेईन ही लाली हवा

                  आग होती एवढीशी लागली
                  पण अचानक वाढली साली हवा

                   लाभले तुजला जसे तारुण्य हे
                  भोवती पिंगा तुझ्या घाली हवा

                   निर्मितो पाऊस गाणे लाघवी
                  लाविते अन रेशमी चाली हवा

                   एवढा विश्वास तू टाकू नको
                  का कुणाची राहते वाली हवा......

      

 

      

 

 

 

 

 

 

 

 

 

 

गझल: 

प्रतिसाद

लाभले तुजला जसे तरुण्य हे
भोवती पिंगा तुझ्या घाली हवा
सुंदर...

निर्मितो पाऊस गाणे लाघवी
लाविते अन रेशमी चाली हवा
वा...वा...वा...
शुभेच्छा !
 

हे २ शेर मलाही फार आवडले!

आग, तारुण्य व रेशमी चाली हे शेर फारच सुंदर.
पडद्यात जा या शेरात काय म्हणायचे आहे?
इत्के सुंद्र शेर रच्ल्यावर शुध्धलेख्नाकडे न बघ्णे म्हणजे - घरातल्या गृहिणीने सत्यनारायणाच्या पूजेला जीन्स घालून बसण्यासार्....माफ करा....मी गप्प आहे.

एवढा विश्वास तू टाकू नको
का कुनाची राहते वाली हवा......
कलोअ चूभूद्याघ्या

निर्मितो पाऊस गाणे लाघवी
लाविते अन रेशमी चाली हवा

हा शेर आवडला. बाकीही आवडले, अजून सुधारणेस वाव आहे , थोडी थांबायची तयारी ठेवावी, बाकी शेरदेखील लक्षात राहण्याजोगे होतील.

 कोण्त्या गावातुनी आली हवा
 का अशी वेडीपिशी झाली हवा
इथे कवी हवेवर गझल रचत आहे हे कळते. म्हणजे, ही जमीन पाहुन एवढे निश्चीत होते की काहीही झाले तरी प्रत्येक शेर हवेवर असणार. हवा, नवा, तवा, गवा, रवा असे काफिया असते तर वेगळा अंदाज करावा लागला असता. पण रदीफच हवा असल्यामुळे अख्खी गझल हवेत आहे हे लक्षात आहे. आता प्रश्न असा आहे की 'हवा' या विषयावर एक संपूर्ण गझल रचणे सोपे आहे का? तर नाही. अजिबात सोपे नाही. पण कवीने हा विषय चांगला निभावला आहे. वाचकांनो, अशा जरा नेहमीपेक्षा ( म्हणजे 'आहे', 'नाही', 'झाले', 'होता' ) यापेक्षा वेगळ्या रदीफा घेउन गझल रचायला लागलो की कवीला अन रसिकांनाही जास्त मजा येउ शकते. हा शेरही तसा चांगला आहे. इथे रसिकाच्या कल्पनाशक्तीला एक छोटेसे आवाहन आहे की हवा वेडिपिशी का झाली असावी याचा अंदाज घेणे. काही शक्यतांपैकी प्रेयसीच्या गावाहुन आलेली हवा ही सर्वात ठळकपणे मनात येणारी शक्यता आहे.

                  गाल हे पड्द्यामधे झाकून घे
                 उडवुनी नेईन ही लाली हवा
इथे मात्र कवी जरासा घसरला आहे. याचे कारण असे की लाली हा काफिया घेउन शेर रचण्याची उर्मी जाणवत आहे. लाली हा काफिया घेताना काय शेर रचता येईल याचा पूर्ण विचार झालेला दिसत नाही. पहाटेची लाली, रक्ताची लाली यांचाही विचार व्हायला हवा होता. मुळात अपुरा विचार झाला आहे असे वाटण्याचे कारण म्हणजे शेराचा अर्थ फारच तोकडा आहे. त्यात अजून बराच आशय मांडता आला असता.

                  आग होती एवढीशी लागली
                  पण अचानक वाढली साली हवा
संदिग्धता ही कधीकधी कवितेला सुंदर बनवते तर कधीकधी रंजकता कमी करते. इथे 'कुठे कशाला एवढीशी आग लागली होती, अन अचानक साली हवा का वाढली, बर वाढली तर वाढली पण त्यात हवेचा दोष काय? ' असे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात.  शास्त्रीय व्याख्येप्रमाणे हवा आग वाढवण्यास कारणीभूत ठरते या विधानाचा शेरात उपतोग करताना त्याचे व्यक्तिगत भावनांशी सशक्त नाते जोडणे फार आवश्यक होते. ही आग 'प्रणयाची' असेल तर हवेला 'साली' म्हणणे म्हणजे प्रणयाची आग लागायला नको होती असे काहीतरी विधान निर्माण होते. ही आग विरहाची किंवा प्रेयसीने दुष्टपणे मैत्री तोडल्यामुळे लागली असेल तर अचानक हवा वाढली याच्यात बिचार्‍या हवेची काय चूक ते समजत नाही. हां! म्हणजे जर असे असेल की थोड्याथोड्या कुरबुरी ( प्रेमात ) सुरू झाल्या होत्या पण त्यांची चिंता करण्याचे कारण नव्हते पण अचानक असे काहीतरी झाले की त्या कुरबुरींचे रुपांतर एका मोठ्या स्फोटात झाले तर समजता येते. पण ते समजणे रसिकावर सोडणे हे कवीच्या व्यक्तिकरणाच्या सक्षमतेवर प्रश्नचिन्ह उमटवून जाते.  

                   लाभले तुजला जसे तरुण्य हे
                  भोवती पीन्गा तुझ्या घाली हवा
या शेरात नेमकी सवंगता नसली तरी तसा संदेह घेण्यास वाव आहे. प्रेयसीच्या रुपावर शेर रचताना फार काळजी घेणे भाग आहे. त्यात स्वस्त उपमा किंवा सवंगता अजिबात येणार नाही याकडे लक्ष पुरवणे हे कवींचे काम आहे, विशेषतः गझलकारांचे! कारण लावणी रचणार्‍याला ती बाब टाळणे शोभणारच नाही, पण गझल मधे मात्र वर्णनाचा दर्जा अत्यंत उच्च स्वरुपाचा असावा. आता इथे प्रेयसीचे सौंदर्य इतके अप्रतिम आहे असे सांगण्यात आले आहे की त्यामुळे हवा तिच्याभोवती पिंगा घालत आहे. मुळात हा आशय फार म्हणजे फार वेळा कवितेत येउन गेला आहे, पण त्यात कवीची चुकी नाही कारण निसर्गतः मनात येणार्‍या भावना या बहुतेकवेळा समानच असणार, कितीही दशकांच्या किंवा शतकांच्या कविता बघितल्या तरी!  पण या शेरामधे 'तारुण्य' या शब्दाऐवजी काहीतरी वेगळे वर्णन असते तर ते स्मूथली मनात गेले असते. म्हणजे केसांचा सुगंध वगैरे सुद्धा घेणे फारसे उत्तम ठरणार नाही. सुगंधी श्वास म्हणणेही योग्य वाटणार नाही. पण 'आपण एकांतात भेटलो आहोत अन अशी भेट बघायला हवा पिंगा घालत आहे' वगैरे काहीतरी जरा परिपक्व प्रेम किंवा वर्णन वाटु शकेल.


                   निर्मितो पाऊस गाणे लाघवी
                  लाविते अन रेशमी चाली हवा
हा शेर फार सुंदर व अर्थपूर्ण आहे. हवा रेशमी चाली लावते हे विधान यापुर्वी आम्ही तरी ऐकलेले नाही. सुंदर विधान आहे. म्हणजे डोळ्यासमोरे येते की वातावरण कसे असेल. यशस्वी शेर आहे.


                   एवढा विश्वास तू टाकू नको
                  का कुनाची राहते वाली हवा......
हवा बदलणे म्हणजे दिवस पालटणे या अर्थी हवा वाली रहात नाही असे विधान केले आहे. ठीक शेर.
शुद्धलेखन या विभागाकडे का बघितले गेले नाही ते समजत नाही. गझल संपादीतही करता येते नंतर! पण केली नाही. दुसरे म्हणजे, 'साली' हा शब्द 'शिवी' व 'उद्विग्नतादर्शक स्वीकारार्ह शब्द' या दोघांच्या सीमारेषेवर आहे. तो कधी कसा वापरावा यावर मतभिन्नता असणार. पण आमच्यामते या गझलेत तो ठीकपणे वापरलेला नाही.
पण मुळातच 'हवा' या विषयावर गझल असल्यामुळे, आधीच एक बंदिस्तता निर्माण होते ज्यात फार संचार करणे कुठल्याही कवीसाठी जरा कठीण असावे.
त्यामुळे, आशय, वृत्त, मांडणी, कल्पना या निकषांवर एकंदर गझल चांगली!
१०० पैकी ५०.

निर्मितो पाऊस गाणे लाघवी
 लाविते अन रेशमी चाली हवा... अप्रतिम कल्पना

ओढणीने गाल हे झाकून घे
उडवुनी नेईल ही लाली हवा..!.. (असे केले तर).. पण शेर हा ही मस्त
-मानस६

  सुरेख गझल.
लाभले तुजला जसे तारुण्य हे
भोवती पिंगा तुझ्या घाली हवा
वाव्वा!
निर्मितो पाऊस गाणे लाघवी
लाविते अन रेशमी चाली हवा
वैभवराव, वाव्वा! वरील शेर फारच आवडले.


गझल व प्रतिसाद वाचून मजा आला.