माणुसकीही मरण्याच्या बेतात जणूं
माणुसकीही मरण्याच्या बेतात जणूं
जीवन इथले सरण्याच्या बेतात जणूं...
वाहत जातो घटिकांचा हा ओघ असा..,
घागर वाटे भरण्याच्या बेतात जणूं.....
धावत असतो जो तो मिथ्याच्या मागे,
..सत्य भयानक धरण्याच्या बेतात जणूं...
आजवरी मी लढलेला जोशात किती..!
आज कसा पण हरण्याच्या बेतात जणूं...
ती जाताना सोबत नेते सर्व ॠतू..
...श्रावण उरतो झरण्याच्या बेतात जणूं...
मी कोणाला कळतो आहे, - वा नाही...!
..हेही नाही ठरण्याच्या बेतात जणूं....
हा भवसागर मोहांचे जंजाळ खरे,
जो तो बुडतो..तरण्याच्या बेतात जणूं...
का मनमोहक हसते आहे रात्र अशी...?
घाव मनावर करण्याच्या बेतात जणूं...
-- संतोष कुलकर्णी
Taxonomy upgrade extras:
प्रतिसाद
अनंत ढवळे
शनि, 08/11/2008 - 10:10
Permalink
घागर
वाहत जातो घटिकांचा हा ओघ असा..,
घागर वाटे भरण्याच्या बेतात जणूं.....
धावत असतो जो तो मिथ्याच्या मागे,
..सत्य भयानक धरण्याच्या बेतात जणूं...
दोन्ही शेर अप्रतिम आहेत !
पुलस्ति
रवि, 09/11/2008 - 08:54
Permalink
वा!
सत्य आणि श्रावण हे शेर अप्रतिम आहेत!
संतोष कुलकर्णी
रवि, 09/11/2008 - 11:30
Permalink
धन्यवाद...
मनापासून........
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०
प्रदीप कुलकर्णी
गुरु, 20/11/2008 - 19:09
Permalink
छान....
ती जाताना सोबत नेते सर्व ॠतू..
...श्रावण उरतो झरण्याच्या बेतात जणूं...
मी कोणाला कळतो आहे, - वा नाही...!
..हेही नाही ठरण्याच्या बेतात जणूं....
हा भवसागर मोहांचे जंजाळ खरे,
जो तो बुडतो..तरण्याच्या बेतात जणूं...
छान....
हे तिन्ही शेर खूप आवडले.
वेगळ्या अन्त्ययमकाबद्दल काय बोलायचे ? छानच... :)
वेगळ्या अन्त्ययमकाची गझल खूप दिवसांनी वाचली. शुभेच्छा.