माझा पत्ता असणारा हा गावच नाही


 


माझा पत्ता असणारा हा गावच नाही
माझ्या इथल्या पत्त्यावरती नावच नाही

मृत्यू कोठेही यावा... पण वीरावाणी..
भित्र्यावाणी जगण्याची मज हावच नाही

एकेकाच्या आघाताने कळवळतो मी...
प्रत्येकाला वाटे ...'हा तर घावच नाही...!'

ज्या शब्दांच्या लाटा देती मजला धडका..
..खडकांच्या लेखी तर त्यांना भावच नाही..!

ज्याला त्याला वाटे त्याचे मी ऐकावे..
बोलायाला मजला उरला वावच नाही

त्यांच्या हाती हुकमी पत्ते जातींचेही..
खेळायाला माझा कुठला डावच नाही !

वैचारिकता जपली जाते स्वार्थापुरती..
निष्ठेलाही त्याच्यापुढची धावच नाही

-- संतोष कुलकर्णी



प्रतिसाद

घावच नाही हा शेर छान आहे.

प्रा. डॉ. संतोष,
उत्तम गझल केलीत. मनापासून आवडली.

मलाही घाव शेर आवडला...

माझा पत्ता असणारा हा गावच नाही
माझ्या इथल्या पत्त्यावरती नावच नाही
मस्त...

ज्याला त्याला वाटे त्याचे मी ऐकावे..
बोलायाला मजला उरला वावच नाही
छान...
शुभेच्छा.