भावलेले
शब्द काही भावलेले
वेदनांनी चावलेले
रोप तू का जाळले ते ?
सोबतीने लावलेले
तव सयींचे खेळ इवल्या
या मनी ना मावलेले
एक अलबम दावतो मज
क्षण सुखाचे गावलेले
आज ठरले ते शहाणे
काल वेडे धावलेले
चेंगरूनी गाव मेले
देव नाही पावलेले
राज करती षंढ, ज्याने
दहशतींचे फावलेले
जेवढे आले बघाया
वाटले ते कावलेले
गझल:
प्रतिसाद
अजय अनंत जोशी
शुक्र, 07/11/2008 - 10:24
Permalink
शहाणे...
आज ठरले ते शहाणे
काल वेडे धावलेले
कलोअ चूभूद्याघ्या
भूषण कटककर
शुक्र, 07/11/2008 - 10:45
Permalink
मूड.
जाणकारांनी मत द्यावे. पण मला असे वाटते की जेव्हा आपण एक गझल करतो तेव्हा आपल्याकडे तंत्र म्हणुनः
वृत, काफिया, रदीफ व शब्द असतात.
आशय म्हणुनः कल्पना असतात.
त्यात परत असेही म्हणतात की गझलेतला प्रत्येक शेर ही एक स्वतंत्र कविता असते किंवा हो शकते किंवा व्हायला पाहिजे.
मग आपण 'भावलेले. चावलेले' असे काफिया घेऊन वरील गझल करू शकतो.
पणः
कुठल्याही दोन शेरांच्या विषयामध्ये जर अजिबातच संबंध नसेल तर एकंदर गझलेचा जो 'मूड' असतो तो 'डिस्टर्ब' होतो असे मला वाटते. म्हणजे 'प्रेम, सामाजिक, राजकारण,व्यथा' अशा अनेकविध गोष्टींवर जर शेर रचून एकाच गझलेत टाकले तर निश्चीतच तंत्राप्रमाणे असलेली गझलही नेमका भाव खाईलच असे नाही, असे मला वाटते.
माफ करा.
ज्ञानेश.
शुक्र, 07/11/2008 - 11:44
Permalink
छान..
अजून एक छोट्या वृत्तातली चांगली गझल.
मला हे दोन शेर आवडले-
रोप तू का जाळले ते ?
सोबतीने लावलेले
एक अलबम दावतो मज
क्षण सुखाचे गावलेले
कौतुक शिरोडकर
शनि, 08/11/2008 - 11:16
Permalink
आक्षेप
भुषणराव, आपले सारे आक्षेप मान्य.
वेगवेगळे मुड एकाच गझलेत असणे यात नवीन काहीच नाही. जर आपणाला ही गझल (?) आवडली नसेल तर निसंकोच सांगावे. मी नवा प्रयत्न करेन.
अजय व ज्ञानेशराव, आभारी आहे. चुका सांगाव्या ही विनंती.
भूषण कटककर
शनि, 08/11/2008 - 14:13
Permalink
सर्वसमावेशक गझला
सन्माननीय श्री कौतुक,
आपल्या मुद्यासाठी एक उत्कृष्ट उदाहरण सांगतो. माझी 'जिंदजानी' नावाची तथाकथित गझल वाचा. असंबद्ध मुद्दे एकत्र करून मी ती गझल लिहिली होती.
तसे यापुढे होऊ नये याची मी काळजी घेणार आहे.
आता माझ्या मुद्याबद्द्ल विस्तॄत स्वरुपात सांगतो.
१. गझल रचली जाण्याची कारणे :
गझल रचणे ही मनाची गरज असणे ( जसे मेडिटेशनने वाटते तसे गझल रचल्यामुळे वाटणे )
गझल रचायला आवडणे
गझल जाहीर करायला आवडणे
गझलेला मिळणारा प्रतिसाद पाहुन उत्साह वाढून आणखी गझल करणे
यातील आपल्या या वरील गझलेमधे पहिली दोन कारणे आहेत की नाहीत ते माहीत नाही, परंतू तिसर्या व चौथ्यापैकी एक कारण असलेच पाहिजे अन्यथा आपण ही गझल जाहीर केलीच नसतीत. खरे तर इथे गझल जाहीर करणार्यांपैकी जवळजवळ प्रत्येकाचे ते कारण असलेच पाहिजे असे माझे मत आहे. कुणीच या वेबसाईटवर सतत गझला येत रहाव्यात म्हणुन गझल जाहीर करत बसणार नाही असे मला वाटते.
२. ह्या दृष्टीने बघितले अन हे मान्य केले की गझलेतील प्रत्येक शेर स्वतंत्र असतो तर आपली गझल ही गझल तर आहेच पण वर चांगली गझल पण आहे.
३. आता मुद्दा असा आहे की जाहीर केल्या जाणार्या गझलांकडुन वाचक किंवा श्रोते काय अपेक्षा ठेवू शकतात. ( असे गृहीत धरू की त्यांना गझलेचे तंत्र मंत्र यांची ओळख असून गझलेकडुन अपेक्षा ठेवण्याची त्यांची पात्रता आहे )
अंतर्मुख व्हावे असे वाटणे
व्वाह्..असे म्हणावेसे वाटणे
मजा येणे
आपल्या दु:खांना वाट मिळाली असे वाटणे
गझलेचा एका गीताप्रमाणे आस्वाद घेता येणे ( जे गुणगुणता येईल )
इत्यादी.
अशा रसिकाला जर खालील शेर ऐकवले:
शब्द काही भावलेले
वेदनांनी चावलेले ( व्यथा )
रोप तू का जाळले ते ?
सोबतीने लावलेले ( असफल प्रेम )
तव सयींचे खेळ इवल्या
या मनी ना मावलेले ( एक शेर )
एक अलबम दावतो मज
क्षण सुखाचे गावलेले ( स्मृती व प्रेम किवा इतर )
आज ठरले ते शहाणे
काल वेडे धावलेले ( सामाजिक )
चेंगरूनी गाव मेले
देव नाही पावलेले ( मे बी अध्यात्मिक )
राज करती षंढ, ज्याने
दहशतींचे फावलेले ( सामाजिक्/राजकीय )
जेवढे आले बघाया
वाटले ते कावलेले ( अनुभुती )
अशा सफरीला नेले तर त्यांच्या मनस्थितीचा इतका जोरदार वेगात रंग बदलेल की ते शांत बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यात आणखीन वृत्त लहान असल्यामुळे दोन शेरामधे आशयाच्या दृष्टीकोनातून पूल बांधता येत नाहीये हे ठळकपणे लक्षात येईल. आता कुणी असे म्हणेल की एखाद्याला हे आवडेल तर एखाद्याला ते. पण मुळात गझल रचणार्याला एकाच गझलेत किती अनेकविध मुद्दे घालायची इच्छा होऊ शकते किंवा व्हावी यावर कायदेशीररीत्याजरी बंधने नसली तरी अलिखित मर्यादा असाव्यात अन पाळल्या जाव्यात असे मला वाटते. परत, ही माझी वैयक्तिक मते आहेत. आपली मते कळवावीत. धन्यवाद.
कौतुक शिरोडकर
सोम, 10/11/2008 - 10:59
Permalink
मत
१. गझल रचली जाण्याची कारणे :
गझल हा काव्यप्रकार फार आवडत असल्याने गझलेत अनुभूती मांडण्याचे धाडस केले. मायबोलीवर व येथे अनेक मान्यवरांच्या गझला वाचल्या. आनंद मिळाला. तो द्विगूणित करण्याच्या नादात असताना भटसाहेबांची बाराखडी वाचली. अनेक बंध पाळणारी गझल ही कविताच. म्हणून बंधनाशिवाय मोकळ्या होणार्या भावनांना बंधनात बांधण्याचा विचार मनात रुजला. मायबोलीवर अनेक मान्यवरांनी सडेतोड मार्गदर्शन केले. माझ्या मठ्ठ डोक्यात सगळेच शिरले असे नाही. पण तरीही अजून मार्गदर्शन मिळतेय. ही त्यांची उदारता.
जाहीर केल्याशिवाय मला असे मार्गदर्शन मिळण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही. प्रसंगी सगळे टोमणे खाऊन शिकण्याची तयारी केलीय. म्हणून जे लिहीतोय ते जाहीर करतोय.
आपली गझल ही गझल तर आहेच पण वर चांगली गझल पण आहे.
असली वाक्ये प्रोत्साहन देतात व मग सहजच पुन्हा लेखणी उचलण्याची हिंमत होते.
मी मुळात एक स्वार्थी माणूस असल्याने हे सारं स्वतःसाठी करतोय. यात वाचकांच्या व श्रोत्यांच्या मनस्थितीचा विचार मुळी लिहीताना डोक्यात नसतो. तसाच तो जाहीर करतानाही नसतो. तो असायला हवा याची जाणिव आहे. पण मुळात स्वानंदाला जास्त महत्त्व दिल्याने बाकी मुद्दे लक्षात येतच नाही.
अलिखित मर्यादा
हे पटतय पण तरीही घोळ होतोच. मी 'पापणी' या गझलमध्ये याचे भान राखण्याचा प्रयत्न केलाय. शक्य असल्यास त्यावर आपले मत कळवावे.
आपल्या सार्या सुचनांचा पुर्ण विचार करीन याचे याक्षणी फक्त आश्वासन देऊ शकतो. आपण माझ्यासाठी एवढा वेळ काढलात त्याबद्द्ल धन्यवाद.