मोजले का तू कधी ?
सोबती सारे किती, मोजले का तू कधी ?
मोसमी वारे किती, मोजले का तू कधी ?
भांडणे रुसणे तुझे अन मनवणे ते तिचे
रे, अरे, कारे किती, मोजले का तू कधी ?
पाहता तव यातना, आसवे ढाळी कुणी
त्यातले खारे किती, मोजले का तू कधी ?
भाषणे ऐकावया लाख जमले लोक ही
आपले नारे किती, मोजले का तू कधी ?
चालता रस्त्यावरी, एकटा मी लक्तरी
ओळ्खी दारे किती, मोजले का तू कधी ?
नाव गाळे नेहमी, सोयरे यादीतले
हे असे झारे किती, मोजले का तू कधी ?
मागण्या येती नव्या अन अपेक्षा वाढती
वाहशी भारे किती, मोजले का तू कधी ?
बघ, पसारा मांडला अंबराने हा पुन्हा
ओंजळी तारे किती, मोजले का तू कधी ?
गझल:
प्रतिसाद
अजय अनंत जोशी
शुक्र, 07/11/2008 - 10:22
Permalink
छान.
भाषणे ऐकावया लाख जमले लोक ही
आपले नारे किती, मोजले का तू कधी ?
बघ, पसारा मांडला अंबराने हा पुन्हा
ओंजळी तारे किती, मोजले का तू कधी ?
कलोअ चूभूद्याघ्या
भूषण कटककर
शुक्र, 07/11/2008 - 10:35
Permalink
माफ करा.
दिलदार मनाने वाचावेत अशी विनंती. मला आपली ही गझल फारशी भावली नाही. सार्वजनिक ठिकाणी असे म्हणणे अयोग्य आहे हे मला मान्य आहे. पण कल्पना जरी वर्षानुवर्षे त्याचत्याच असल्या तरी मांडणीमधले किंवा शब्दरचना, उपमा यातील नावीन्य दिसून येणे आवश्यक आहे असे माझे मत आहे.
१. मतल्यामधे सोबती नंतर 'सारे' हा जो शब्द आलेला आहे तो गझलेच्या बांधणीच्या गरजेमुळे घ्यावा लागल्यासारखा वाटत आहे.
२. मराठीमधे 'मोजले का?' असे न विचारता 'मोजलेस का?' असे म्हणणे योग्य आहे वृत्तामुळे 'मोजले' घ्यावे लागत आहे असे वाटत आहे.
३. कुणाचेही अश्रू आले ( खरे किंवा खोटे ) तरी ते खारेच असतात असा माझा समज होता. तो चुकीचा असल्यास माहीत नाही.
४. एकटाच लक्तरी
यामधे काहीतरी चुकतंय असे वाटते.
ज्ञानेश.
शुक्र, 07/11/2008 - 12:21
Permalink
हम्म...
भुषणजींची मते चिंतनीय आहेत. काही शेर अजून चांगले होतील असे वाटते. हा शेर आवडला-
बघ, पसारा मांडला अंबराने हा पुन्हा
ओंजळी तारे किती, मोजले का तू कधी ?
मोजलेस, दिलेस, घेतलेस ही शब्दरचना प्रमाण मराठीनुसार योग्यच आहे. पण बोलीभाषेत अनेकदा आपण मोजले/ दिले असे बोलतो, त्यामुळे ते चालेल असे वाटते.. अर्थात हे व्यक्तिगत मत आहे.
सोबतीने चालती, माणसांची अंतरे...
'साथ' देणारे किती? मोजले का तू कधी?
कौतुक शिरोडकर
शनि, 08/11/2008 - 11:10
Permalink
शंका
माझ्यासारख्या नवोदिताला वेळ दिल्याबद्द्ल आभार.
भुषणराव,
एखादी रचना भावणे व न भावणे हा ज्याच्या त्याच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा मुद्दा. ते चारचौघात सांगणे हा अभिव्यकी स्वातंत्र्याचा मुद्दा.
पण आपल्या सांगण्याला मी गुरूचा सल्ला मानेन कारण हेच शिकण्यासाठी मी येथे आलोय.
१. सारे सोबती एवजी सोबती सारे हे बांधणीमुळे आहे हे मान्य.
२. दुसर्या मुद्याचे उत्तर ज्ञानेशरावांनी दिले आहेच.
३. अश्रु हे खारेच असतात. इथे ते खरे की खोटे या अर्थाने वापरलय हे आपण जाणलेलेच आहे. वस्तुस्थिती हा समज नव्हे.
४. एकटाच लक्तरी यात भणंग अवस्था झाल्यावर एकाकी होण्याचा उल्लेख आहे. काहीतरी म्हणजे नेमकं काय चुकलय ते आपण सांगाल ही अपेक्षा.
ज्ञानेशराव आपला शेर सुरेख.
पुन्हा एकदा आभार.
भूषण कटककर
शनि, 08/11/2008 - 13:30
Permalink
विनंती
सन्माननीय श्री कौतुक,
१. प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मी आपला प्रतिसाद आधी पाहिला असता तर ताबडतोब उत्तर दिले असते.
२. सर्वात पहिल्यांदा: मुळात इथे कुणी कुणाचा गुरू असू शकत नाही.
३. दुसरे म्हणजे : मला या साईटवरील लोकांनी 'गझल ' या क्षेत्रात अक्षरशः एवढ्याचा एवढा होताना पाहिले आहे. अर्थात मी अजून 'एवढा' झालो आहे असे म्हणतच नाहीये, पण निदान गझला विचाराधीन होत नाहीत अन दोन चार उत्स्फूर्त प्रतिसाद ( चांगले ) मिळतात इथपर्यंत आलो आहे. तेव्हा मला तर कुणाचा गुरू म्हणवुन घ्यायचा नैतिक अधिकारच नाही. तसेच ती क्षमताही माझ्यात नाही. तेव्हा कृपया तशी अपेक्षा न ठेवता फक्त चर्चा व्हावी अशी विनंती.
४. सोबती सारे किती, मोजले का तू कधी ?
मोसमी वारे किती, मोजले का तू कधी ?
या शेरामधे 'सारे' हा शब्द जो आहे त्याचे प्रयोजन खालीलप्रमाणे असू शकते.
एकंदर सोबती किती आहेत बघ अन त्यातले मोसमी किती आहेत ते तपास ...
किंवा
वाटायला सारे सोबती वाटतात पण मोसमी असतात...
( आशय एकच असला तरी मांडणी वेगळी आहे )
पण मोठी रदीफ घेतल्यामुळे तसा आशय व्यक्त होत असला तरी काही शब्द आहेत असे अध्यारुत धरावे लागत आहे. जसे:
सोबती ( साथीला ) सारे किती ( आहेत ) ( ते ) मोजले (स) का तू कधी?
मला मान्य आहे की पद्यात्मकतेसाठी ते सूट होईलही, पण
मुद्दा एचढाच की पद्यात्मकतेतही ओळ उच्चारल्यावर अपुरेपणाची जाणीव होऊ नये. जसे 'मोसमी वारे किती मोजले का तू कधी' मधे तशी अजिबात होत नाही.
५. वृत्तामुळे 'मोजले' घ्यावे लागत आहे असे वाटत आहे.
ज्ञानेश यांनी जे मत व्यक्त केले आहे ते मला योग्य वाटतनाही. याचे कारण, बोली भाषेत ज्या सुटी घेतल्या जातात त्या सुटींमुळेच बोली अन लेखी भाषा भिन्न होतात. इथे निश्चीतच व्यक्तिस्वातंत्र्य आहे हे मला मान्य आहे. म्हणजे आपल्याला तसे लिहायचे असल्यास कुणी काही म्हणु शकणार नाही. पण प्रमाण मराठीची अपेक्षा करणारे तुम्हाला काहीतरी म्हणतील याला तुम्हीही काही म्हणु शकणार नाही. हा निर्णय अर्थातच आपला आहे.
मोजले का तू कधी च्या ऐवजी:
मोजले आम्ही कधी
मोजले होते कधी
मोजले ना मी कधी
यासारख्या रचना ऐकल्यावर स्वीकारार्ह वाटतात.
६. त्यातले खारे किती -
या ओळीमधे आपले म्हणणे असे आहे की खारे हा शब्द खरे या अर्थाने घ्यावा. मान्य आहे. पण एखादी गझल रचतानाची जी प्रक्रिया असते त्यात जर असे होत असेलः
मतला सुचला ( बरोबर जमीनही सुचली )
नंतर काफिया गोळा केले ( आठवले )
नंतर कल्पना आठवल्या किंवा अंदाज बांधले
मग त्या कल्पना त्या काफियांमधे अन त्या जमिनीवर गुंफल्या
तर खारे या शब्दावरून आपल्याला प्रथम अश्रू अन सागराचे पाणी हे सुचले असावे. त्यातील अश्रू आपण निवडले असावेत. अन मग कुणाचे अश्रू किती खरे आहेत हे म्हणण्यासाठी आपण खारे हा शब्द ओवला असावात. ह्याला मी गझल रचतानाची सर्वत्र दिसणारी प्रक्रिया मानतो. ( अर्थात हे आपल्या बाबतीत झाले असेल हे सर्व माझे अंदाज आहेत, ते गैरही असतील ). माझ्यामते ५ - ६ विचार आधी सुचणे अन मग जमीन तयार होणे अन मग ते विचार ओवले जाणे ही प्रक्रिया जास्त निरोगी असावी. त्यात शब्दांच्या प्रयोजनाबद्दल वा कृत्रिम उपस्थितीबद्दल शंका उपस्थित होत नाहीत असे माझे मत आहे. अर्थातच मी आग्रह करूच शकत नाही.
७. एकटाच लक्तरी यात भणंग अवस्था झाल्यावर एकाकी होण्याचा उल्लेख आहे. काहीतरी म्हणजे नेमकं काय चुकलय ते आपण सांगाल ही अपेक्षा.
या ओळीत माझ्यामते वृत्त चुकलेले आहे
गा ल गा गा गा ल गा
मो ज ले का तू क धी
ए क टा च ल क्त री
अर्थात तेही मी इथेच शिकलो अन माझ्यापेक्षा अनेक मातब्बर मंडळी इतेह आहेत तेव्हा योग्य अयोग्य ते सांगतीलच.
८. माझा कसलाही आग्रह नाही. आपण प्रतिसाद मागीतलात म्हणुन दिला. हे सर्व वैयक्तिक विचार समजुन सोडुन दिल्यासही मला वाईट वाटणार नाही.
धन्यवाद!
कौतुक शिरोडकर
सोम, 10/11/2008 - 11:11
Permalink
आभार
ज्यांना माझ्यापेक्षा जास्त कळते त्यांना मी गुरूस्थानी मानतो.
प्रमाण मराठीची अपेक्षा करणारे तुम्हाला काहीतरी म्हणतील याला तुम्हीही काही म्हणु शकणार नाही.
पुर्ण मान्य व प्रमाण मराठीत रचना करण्याचा मी प्रयत्न करेन.
खारे - जमीन लाभल्यावर गुणगुणताना इतर शेर सुचत गेलेत. हे एका दिवसात माझ्या बाबतीत घडत नाही. एखादा चांगला काफिया सुचला तर मग मी तो लिहून ठेवतो. मग जेव्हा कधी शक्य असेल तेव्हा ते गुणगुणत जे सुचेल ते लिहीतो.
एकटाच लक्तरी - हा माझा शुद्ध मुर्खपणा आहे. जो दुरूस्त केलाय.
प्रतिसाद नेहमीच द्या व परखड द्या. गरज आहे त्याची.