तसा कुठे मी....




तसा कुठे मी धर्माच्या चौकटीत बसतो
कधी तरी देवळात जातो पाया पडतो

काही तू, काही मी ठरलेले होते पण
अनेकदा मी, मीच मला बोलावत असतो

थेट तुझ्याशी बोलून काही साधत नाही
अनुत्तरित प्रश्नांचा गठ्ठा मागे उरतो

मला पाहिजे काय मला हे कुठे उमगले
मागी बनुनी दिशा दिशा धुंडाळत फिरतो

माणुस मरतो म्हणजे नक्की जातो कोठे
उत्तर मिळ्ण्याआधी काटा पुढे सरकतो

निर्मळ हसून तू जन्माचे गूढ उकलले
मी व्याख्येच्या वनात अजुनी वणवण फिरतो

-- अनंत ढवळे


प्रतिसाद

हा शेर विचार करायला लावतो...

थेट तुझ्याशी बोलुन काही साधत नाही
अनुत्तरित प्रश्नांचा गठ्ठा मागे उरतो
वा...वा...

निर्मळ हसून तू जन्माचे गूढ उकलले
मी व्याख्येच्या वनात अजुनी वणवण फिरतो
छान...