माझा खून

तुझे उपकार देशी दु:ख! इतका शूर होतो मी
तुझ्या विरहात होते काय? चिंतातूर होतो मी


शहर सोडायची नाही गरज तू हुकुम कर नुसता
सुखामध्ये तुझ्या आनंद माझा, दूर होतो मी


तुझे अस्तित्व असताना जगाचा नूर होतो मी
अता या मौसमांचा कापरा काहूर होतो मी


पुन्हा भेटायचे नाहीच का आयुष्यभर आता?
'शिरावर ठेवणारा हात' भस्मासूर होतो मी


तुला येणार नाही आठवण त्या धुंद काळाची
रियाजाला मनाच्या लागणारा सूर होतो मी


 



 

गझल: 

प्रतिसाद

 मतला कळला नाही. (तुझे उपकार देशी दु:ख! इतका शूर होतो मी  ..ही ओळ)


शहर सोडायची नाही गरज तू हुकुम कर नुसता
सुखामध्ये तुझ्या आनंद माझा, दूर होतो मी-  हा  शेर खास.

काय रे बाबा भूषण?
मौसमांचा कापरा काहूर म्हणजे काय रे? ऑ? एक आपला काहूर शब्द टाकायचा म्हणुन जुळवायचे आपले काहीतरी का?
भस्मासूर - ऊर ऊर ऊर मधे आणखीन काही आठवले नाही, मग घेतला भस्मासूर. टाकला शेरात. तूर का नाही घेतला? तू करतेस त्या वरणाला लागणार्‍या डाळीतला तूर होतो मी. चक्काचूर, भरपूर, आसूर, आतूर, खूर, भूर, हूर, धूर कितीतरी 'ऊर' आहेत की!
म्हणे तिलकधारी गप्प हो!

आपला सुपरिचीत शैलीमधील प्रतिसाद पाहिला. आपण श्री मिल्या यांना 'तरही गझल' या विषयावर जे  विवेचन केले आहेत, त्याला अनुसरून मी अशी विनंती करतो, की आपण स्वतःच दिलेल्या सर्व 'ऊर' वर एकेक शेर याच वृत्तात याच विषयाचा संदर्भ घेऊन रचावात.
आपली शैली आता अपेक्षित असते, त्यामुळे त्यावर बोलण्यात तसा काही अर्थ उरलेला नाही.
 
 

तुझ्या विरहामधे जी स्वप्न येती त्यातही माझा
अपेक्षाभंग होतो, पार चक्काचूर होतो मी
पराकोटी तुटकतेची, जणू प्रीती नसे माझी
मला माझाच ना विश्वास, शंकासूर होतो मी
पुढे इतिहास जो वाचेल तो करणार नाचक्की
'तुझ्या आगीत गेला जन्म ज्याचा' धूर होतो मी

खडा काढून फेकावा तसे फेकू नको मजला
कि पश्चात्तापसा व्हावा उद्याला 'तूर' होतो मी
मला पाहून दाबे पाय ती मातीमधे ऐशी
जणू की ठणकणारा अंगठ्याचा 'खूर' होतो मी
भूर हा शब्द सहसा बालके वापरतात. हूर हा शब्द स्त्रीलिंगी आहे. भरपूर हा शब्द एखाद्या शेरामधे सहज बसेल. भूर, हूर व भरपूर वर मी हवे असल्यास शेर करून देतो. पण ते थोडेसे विचित्र होतील. वर दिलेले शेरही विचित्र वाटत असल्यास सांगावे. मला स्वतःला तूर व खूर हा शेर विचित्र वाटत आहे.

श्री तिलकधारी,
आपला संताप एवढा का होता मला समजले नाही. आपण रचलेले शेर हेही काही अगदी ग्रेट आहेत अशातला भाग नाही.  भूर, हूर व भरपूर वर शेर रचून उगाच हसे करुन घेऊ नये.

पावसाचा खून होऊ शकतो तर आणखी कुणाचा का नाही? हा हा हा.
शहर सोडायची नाही गरज तू हुकुम कर नुसता
सुखामध्ये तुझ्या आनंद माझा, दूर होतो मी
तुला येणार नाही आठवण त्या धुंद काळाची
रियाजाला मनाच्या लागणारा सूर होतो मी

रियाजाला मनाच्या लागणारा - सुंदर
कलोअ चूभूद्याघ्या

तिलकधारी काका...
पुढे इतिहास जो वाचेल तो करणार नाचक्की
'तुझ्या आगीत गेला जन्म ज्याचा' धूर होतो मी

आणी
खडा काढून फेकावा तसे फेकू नको मजला
कि पश्चात्तापसा व्हावा उद्याला 'तूर' होतो मी...
सुपर्ब... जबर्दस्त आहेत.....
 
 

भूषणजी , मस्त गजल.....
हा शेर विशेष आवडला -
तुला येणार नाही आठवण त्या धुंद काळाची
रियाजाला मनाच्या लागणारा सूर होतो मी...
 

जमीर साहेब,
आपला मला मिळालेला पहिलाच प्रतिसाद. मनापासून धन्यवाद!