नाही

मायबोली ह्या संकेतस्थळावर नुकतीच एक गझल कार्यशाळा घेण्यात आली.. त्यासाठी 'नाही' हे अंत्ययमक दिलेले होते... त्या कार्यशाळेसाठी लिहिलेली ही गझल


"चार-चौघांसारखे जगणार नाही"
बोलणे सोपे! कृती जमणार नाही


जोडली आहे नभाशी नाळ माझी
मी कधीही पूर्ण कोसळणार नाही


वृक्ष आहे का असा बागेमधे - जो
पश्चिमी वाऱ्यांपुढे झुकणार नाही?


माणसे निष्क्रीय ही झालीत इतकी
थंड जितके प्रेतही असणार नाही


कोण चुकले, हे नको सांगू कुणाला
वाच्यता मी ही कुठे करणार नाही


व्यर्थ तू शोधू नको दाही दिशांना
तो जरी असला तरी दिसणार नाही


बोलते खोटे किती आयुष्य माझे
रोज म्हणते "मी तुला छळणार नाही"


घाव शेवटचा तरी घालू नको तू
मी तसाही फारसा तगणार नाही


एक वेडा बरळला चौकात परवा
लाल सिग्नलला मधे घुसणार नाही

गझल: 

प्रतिसाद

प्रिय मित्र मिल्या,
१. अंत्ययमक ठरवून गझल रचण्यास सांगणे या प्रकाराला 'तरही गझल' असे म्हणतात. पुर्वीच्या काळात शायरांमधे चढाओढ लवण्यासाठी ( एक प्रकारची स्पर्धा ) एक रदीफ दिली जायची. त्यावर कमीतकमी वेळात उत्तमोत्तम शेर रचणारा श्रेष्ठ समजला जायचा. त्याकाळी शायरीवर पोटे भरायची त्यामुळे 'तरही गझल' हा प्रकार तुफान लोकप्रिय झाला होता. आता शायरीमुळे फक्त डोळे भरतात. असो. पण एक संकट असे उभे राहिले की 'तरही गझल' च्या नादात फक्त रदीफाला महत्व जास्त मिळाल्यामुळे आशय हा 'गाभा' थोडासा दुर्लक्षित व्हायला लागला. म्हणजेच मुल्यांच्या दृष्टीने 'तरही गझल' थिटी पडायला लागली. त्यात परत लोकप्रियता असल्यामुळे मोठमोठे शायर ह्या भानगडीत पडायला लागले व स्वतःची शायरी प्रभावित करून घ्यायला लागले. शेवटी गझल ती गझलच असे नंतर जाणवायला लागले. पण 'दाग' या शायरने मात्र 'तरही गझल' या प्रकारात 'जरा कर जोर सीनेपर वोह तीरे पुरसितम निकले' या आव्हानावर अचाट शेर रचले होते व अख्ख्या दिल्लीची वाहवा मिळवली होती. असो.
२. आपण घेतलेली रदीफ 'नाही' ही इतकी साधी आहे व काफियाही इतके साधे आहेत की त्यावर खूप शेर रचता येतील.
३. मात्र आपली गझल आशयाच्या दृष्टीने चांगलीच आहे. 'पूर्ण कोसळणे, माणसे निष्क्रीय, कोणचुकले व दाही दिशा' हे शेर फार सुंदर आहेत. 'आयुष्य खोटे बोलते' हा विचार अनेकवेळा येऊन गेल्यामुळे त्यात नावीन्य आवष्यक आहे.
४. उल्लेख करतो म्हणुन गैर मानू नये पण माझी रचना 'असे करू नये १ ' 'जी गझल नाहिच्चे ',त्यावर मी सन्माननीय बापूजी यांना प्रतिसाद देताना अशी विनंती केली होती की 'तिच्याजवळ ती आगीपरी भासते' ही रदीफ व माझ्या रचनेतील काफिया घेऊन त्याच वृत्तात ' गझल आगीपरी भासते' या अर्थाचे आणखीन शेर कुणीतरी रचावेत. असे केल्यामुळे आपले शब्दप्रभूत्व व कल्पनाविलास यांच्यात वृद्धी होते असे माझे मत आहे, जे अर्थातच आग्रहाचे असू शकत नाही.
५. 'तरही गझल' मुळे कवी समृद्ध होतो किंवा किती समृद्ध आहे हे समजते.
आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद!

तिलकधारी,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद...
तरहि गझल बद्दल छान माहिती दिलीत..
मला वाटले होते की   पूर्ण  जमिन दिली कीच  'तरही' गझल म्हणतात म्हणून तसा उल्लेख केला नाही.
ही कार्यशाळा हे कविता लिहीणार्‍या पण गझलेचे तंत्र माहिती नसलेयांसाठी मुख्यतः आयोजित केलेली असल्याने आम्ही मुद्दामहून 'नाही' हा सोपा रदीफ निवडला होता.
साधे काफिये निवडण्याचा दोष मात्र माझा :(
 

तरही गझलला पूर्ण जमीन द्यावी लागते हे खरय.
पण एखादी अट घालून गझल रचायला सांगणे हा एक प्रकारचा तरही गझलचाच प्रकार म्हणायला हरकत नसावी.

मतला व मी तसाही फारसा तगणार नाही हे शेर फारच आवडले.

"चार-चौघांसारखे जगणार नाही"
बोलणे सोपे! कृती जमणार नाही
वाव्वा.. . गझल एकंदर सफाईदार, बोलती आहे. विशेषतः मतला.

जोडली आहे नभाशी नाळ माझी
मी कधीही पूर्ण कोसळणार नाही
वाव्वा.. .

मिल्या जी,
झकास!
मक्ता ......... ़खास पुणेरी!!


जयन्ता५२