कधीतरी चांदण्यात दोघे....

............................................... 
 कधीतरी चांदण्यात दोघे....
...............................................


कधीतरी चांदण्यात दोघे फिरायला जाऊ !
पुन्हा जुना काळ आपला तो स्मरायला जाऊ !

निघू चला साचलेपणाच्या पलीकडे आता...
चला कपारीत डोंगराच्या झरायला जाऊ !

खरेच रेखाटलेस हे चित्र तू कुणासाठी ?  
उगीच का  रंग त्यात माझे भरायला जाऊ ?

तुझ्या हिशेबी तरी तसा मी कधी कुठे होतो ?
उगीच का हातचा तुझा मी धरायला जाऊ ?

नको मना, एकटेपणाचा तुरुंग एकाकी....
फिरून गर्दीत भोवतीच्या शिरायला जाऊ... !

तिथे शहाणे बरेच होते करायला चर्चा...
उगीच  वेडा तिथे कशाला ठरायला जाऊ ?

सवंगडी एकही न माझा हयात गावी त्या ...
कुणास भेटू ? तिथे कशाला मरायला जाऊ ?

इथेच आहे बरा उभा मी...उभाच राहू द्या...
पुढे कशाला फिरून मागे सरायला जाऊ ?

पुन्हा झुगारून सर्व रीती, रिवाज दुनियेचे....
पुन्हा नको ते, नको नको ते, करायला जाऊ...!!

- प्रदीप कुलकर्णी

गझल: 

प्रतिसाद

नको मना, एकटेपणाचा तुरुंग एकाकी....
फिरून गर्दीत भोवतीच्या शिरायला जाऊ... !
वाव्वा!

तिथे शहाणे बरेच होते करायला चर्चा...
उगीच  वेडा तिथे कशाला ठरायला जाऊ ?
वाव्वा! वाव्वा!

सवंगडी एकही न माझा हयात गावी त्या ...
कुणास भेटू ? तिथे कशाला मरायला जाऊ ?
वाव्वा!

वरील तीन शेर अगदी मस्त आहेत. गझल फार फार आवडली.

मि. प्रदीप,
साचलेपण, हातचा, सवंगडी हयात नाही, शहाण्यांची चर्चा हे शेर नेहमीप्रमाणेच आपल्या इतर गझलाप्रमाणे गुंगवणारे आहेत व आनंद देणारे आहेत.
पण आपली गझल झळकते तेव्हा मुळात अपेक्षाच इतक्या ठेवल्या जातात की मला वाटते आपल्या नेहमीच्या गझलांइतकी ही गझल अपेक्षापुर्ती करत नाही. बहुतेक माणसाला एखादी गोष्ट मिळाली की त्याहुन सुंदर गोष्ट हवीशी वाटते त्यामुळे असावे. धन्यवाद!
 

गझल सुरेख आहेच. शीर्षक वाचून ज्या अपेक्षा निर्माण होतात, त्यांची  पूर्ती  करणारी आहे.
'झरायला'हा नवीन शब्द आवडला. तसेच हातचा, हयात आणि शेवटचा शेरही  सुरेख.

प्रिय मित्र प्रदीप,
( आदरासहित नमस्कार )
आपले एका गोष्टीवर मत जाणून घ्यायला आवडेल. आपली 'त्याचीच ओढा री पुन्हा' गझल, त्यातील काही उत्तम शेर खाली दिले आहेत.
टीकेस घाबरतोस का...? निंदेमुळे खचतोस का...?
तू धीर गोळा कर जरा...ठरशील तू भारी पुन्हा !
मज शब्द हे काही पुन्हा मोहात पाडू पाहती...
संन्यस्त मी...! कविते मला केलेस संसारी पुन्हा !


करतोस तू उपकारही...देतोस वर जाणीवही...
मिंधा तुझा आहेच मी...! आहेच आभारी पुन्हा !


डोके कशाला खाजवा...? मेंदू कशाला चालवा...?
बोलेल जो आधी कुणी, त्याचीच ओढा री पुन्हा!!
मनात असे आले की एक गझलकार त्याच्या सर्व गझला तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण व 'गझलियत'ने युक्त अशा करतो. मग एक गझल खूप उत्स्फूर्त दाद देण्यासारखी व दुसरी त्याहुन कमी आवडणारी अशी होण्याची आपल्यामते कारणे काय असावीत? एक गोष्ट आधीच सांगतो की   कधीतरी चांदण्यात दोघे ही गझल मला आपल्या इतर गझलांइतकी मोहवत नाही. ( या विधानाबद्दल माफ करा व राग धरू नका )
माझ्या मते याची कारणे खालीलपैकी असावीत.
१. गझलकार गझल रचताना ज्या मनस्थितीत असतो ती त्या मनस्थितीची श्रेष्ठता पूर्णपणे गझलेत उतरत नाही.
२. ऐकताना किंवा वाचताना रसिक ज्या मनस्थितीत असतो त्या मनस्थितीत त्याला एखादी गझल अपील होत नाही किंवा तिचे श्रेष्ठत्व समजतच नाही.
मला आपल्याकडुन जे मत जाणून घ्यायचे आहे ते असे की कोणच्याही मनस्थितीतील रसिकाला भावणारी गझल होण्यासाठी नेमके काय करावे लागेल. अर्थात हे विचारताना मला याची जाणीव आहे की आपण याचे उत्तर नक्की देऊ शकता.
बाकी गैरसमज नसावेत.

आदरणीय तिलकधारी,
सप्रेम नमस्कार...
`कधीतरी चांदण्यात दोघे`ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभार आणि `त्याचीच ओढा री पुन्हा`ही जुनी गझल ` उपसून ` काढल्याबद्दल मनापासून धन्यवाद. :)
कवितेत रचनाबंधांच्या, आकृतिबंधांच्या, छंदांच्या दृष्टीने वेगवेगळे प्रयोग करायला मला आवडतात...अशा प्रयोगांमुळे स्वतःला तपासता येते...स्वतःचा वकूब, मगदूर कळू शकतो...आपली धाव,  मर्यादा कुठपर्यंत आहे, ते  समजते...अशाच एका प्रयोगांपैकीच हीही गझल आहे.     :)
या रचनेची पहिली आणि दुसरीही ओळ (मतला) एकापाठोपाठ एक लगेचच सुचली. आता ही गझल होईल की गाणे, असा विचार मनात तरळून गेला...म्हटले, आधी गाणे करू या. नंतर गझल करू या...आधी गाणे केले. ते www.manogat.com या संकेतस्थळावर वाचायला मिळेल.  :)
गाण्यात हाच मुखडा आणि गझलेत हाच मतला कायम ठेवून पुढे रचना करण्याचे ठरविले आणि दोन्ही काव्यप्रकार निर्माण झाले !!!
..........................

आता तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे यथामती देतो...पटलीच पाहिजेत असे नाही; तुमचे समाधान झाले तरी पुष्कळ आहे. :)
तुम्ही म्हटले आहे की -

मनात असे आले की एक गझलकार त्याच्या सर्व गझला तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण व 'गझलियत'ने युक्त अशा करतो. मग एक गझल खूप उत्स्फूर्त दाद देण्यासारखी व दुसरी त्याहुन कमी आवडणारी अशी होण्याची आपल्यामते कारणे काय असावीत?
- कोणत्याही कवीची प्रत्येकच रचना प्रत्येकाला सारख्याच प्रमाणात आवडत नसते. आवडणारही नाही. कारण, पसंद अपनी अपनी !  (यासंदर्भात याच संकेतस्थळावर असलेली गझल आपल्याला पाहता येईल...`नाही कुणीच आसपास...एकटाच मी.`
या गझलेमधील कोणता ना कोणता वेगवेगळा शेर कुणाला ना कुणाला तरी आव़डलेला आहे. काही शेर याला आवडले, तर काही शेर त्याला आवडले...या दोघांनाही जे शेर आवडले ते शेर वगळून अन्यच शेर तिसऱ्या कुणाला आवडले...अशी गंमत त्या गझलेबद्दल झाली आहे.
यावरून असे म्हणता येईल की, या गझलेतील (कधीतरी चांदण्यात दोघे...) जे शेर तुम्हाला आवडले, ते अन्य कुणाला आवडणार नाहीत; पण अन्य कुणाला न आवडणारे शेर तुम्हाला आवडलेले असतील...(तुम्ही एकाही शेराचा उल्लेख केलेला नाही, याचा अर्थ तुम्हाला ही संपूर्ण गझल आवडलेली नाही, असे गृहीत धरायला वाव आहे.). वाचकाला [(आणि स्वतः कवी असलेल्या वाचकाला :)] काहीच न आवडणे, असे होते एखाद्या गझलेसंदर्भात कधी कधी :) 
- कोणतीही रचना लिहायची तर ती अगदी मनापासूनच लिहायची, (पाट्या टाकायच्या नाहीत) हे पथ्य मी आजवर नेहमीच कटाक्षाने सांभाळत आलो आहे...पण आपण मनापासून लिहिले म्हणजे, ते इतरांना आवडेलच, असेही नसते...य़ात समाधान एकच असते, ते म्हणजे, आपण स्वतःशी प्रामाणिक राहिलेलो आहोत...आपण स्वतःचीच फसवणूक केलेली नाही, स्वतःशीच लबाडी केलेली नाही...ही एवढी सुस्पष्टता आपली आपल्याशीच असली की पुरे. नंतर वाचकाला ती रचना आवडली तर उत्तम. न आवडली तर.. त्या वाचकाच्या मतांचा आदर करायचा...! 
समोरच्याला कोणती रचना आवड़ेल, कोणती आवडणार नाही, हे तर तसे सापेक्षच असते...आणि हे कित्येक वर्षांपासून चालत आलेले आहे.
................

तुम्ही म्हटले आहे की,

एक गोष्ट आधीच सांगतो की   कधीतरी चांदण्यात दोघे ही गझल मला आपल्या इतर गझलांइतकी मोहवत नाही. ( या विधानाबद्दल माफ करा व राग धरू नका )
- आपल्या या विधानाबद्दल मला अजिबातच राग आलेला नाही...तुम्हाला माझी रचना न आवडणे, हा काय तुमचा गुन्हा किंवा चूक आहे की काय ? तुम्हाला तसा पूर्ण अधिकार आहे. तुमची काही चूकच झालेली नाही तर मी तुम्हाला माफ तरी कशासाठी करू ? आणि समजा जाणता-अजाणता तुम्ही चूक केलीही असती, तरी तुम्हाला माफ करण्याइतका मी असा कोण मोठा लागून गेलो आहे ? [हां, मी तिकडे दुर्लक्ष मात्र नक्कीच केले असते :) ]
ही रचना तुम्हाला आवडली नाही, हे मत तुम्ही मनमोकळेपणाने व्यक्त केलेत, याबद्दल उलट मीच तुम्हाला धन्यवाद देईन.  ही रचना तुमच्या दृष्टीने फसली, इतकेच.
...पण याच मुखड्याचे गाणे लिहून झाल्यानंतर पुढे त्याच मतल्यावर गझल लिहिताना मी ती अगदी मनापासून लिहिलेली आहे, एवढे मात्र नक्की. 
..........................

तुम्ही म्हटले आहे की,

माझ्या मते याची कारणे खालीलपैकी असावीत.
१. गझलकार गझल रचताना ज्या मनस्थितीत असतो ती त्या मनस्थितीची श्रेष्ठता पूर्णपणे गझलेत उतरत नाही.

- हां, असे होतही असेल...पण व्यक्त होण्यासंदर्भात माझ्यात जी काही छटाक-अधपाव ताकद असते, ती पूर्णपणे वापरण्याचा प्रयत्न मी करत असतो.
२. ऐकताना किंवा वाचताना रसिक ज्या मनःस्थितीत असतो, त्या मनःस्थितीत त्याला एखादी गझल अपील होत नाही किंवा तिचे श्रेष्ठत्व समजतच नाही.

- असेही होऊ शकत असेल. :) . कधी कधी पूर्वग्रहदूषित नजरेनेही काही गोष्टी केल्या जातात...त्यामुळे नजर हवी तेवढी स्वच्छ, साफ राहत नाही आणि मग संबंधित रचना गढूळल्यासारखी दिसू लागते. :) हे विधान मी या गझलेसंदर्भात आणि तुमच्याबाबतीत करीत नसून, एकंदरच करीत आहे. या विधानामागे स्वानुभव आहे, एवढे जरूर नमूद करतो.
तुम्ही म्हटले आहे की,

मला आपल्याकडून जे मत जाणून घ्यायचे आहे ते असे की कोणच्याही मनस्थितीतील रसिकाला भावणारी गझल होण्यासाठी नेमके काय करावे लागेल.

यासंदर्भात तीन-चार मुद्दे सांगावेसे वाटतात,  ते असे-
अ) रसिकाची / वाचकाची आवड लक्षात घेऊन काहीही लिहू नये, असे मला वाटते. वाचकानुनयी होऊ नये. स्वतःच्या मनाचा ठणका कमी व्हावा यासाठी किंवा स्वतःचा आनंद द्विगुणित करण्यासाठी लिहीत जावे... आपल्या सगळ्यांचेच मनोव्यापार -थोडाफार फरक सोडल्यास - एकसारखेच असतात...म्हणून तर एखादी चांगली गझल, कविता वाचली की वाटते की, आपल्याच मनातील हे लिहिलेले आहे...आपल्यालाही हेच वाटले होते !
ब) स्वतःच्या आय़ुष्याच्या रंगाशी मिळत्याजुळत्या रंगात लिहिण्याचा प्रयत्न कवीने करायला हवा (हे माझे इतरांना सांगणे नसून, मी काय करतो, ते सांगत आहे. याला कुणीही उपदेश कृपया समजू नये.) स्वतःच्या मनाचा पोत, मनाचा घाट, मनाची रचना कशी आहे, हे जाणून घेऊनच लिहायला हवे. या मुद्द्यासंदर्भात पुढे परचित्तप्रवेशाचा मुद्दा वाचावा....
क) स्वतःला जग ज्या रंगांत  दिसते, त्या रंगात कवीने ते रंगवावे.
ड) आता याशिवाय, आणखी एक बाब महत्त्वाची असते, ती म्हणजे परचित्तप्रवेश.  समोरच्याच्या जागेवर स्वतःला कल्पून त्याची सुख-दुःखे कवीला आत्मसात करता यायलाच हवीत...
आता तुम्हाला कदाचित हसायलाही येऊ शकेल माझ्या यासंदर्भातील विचारांबद्दल...पण सांगूनच टाकतो...
कधी कधी माझ्या मनात विचार येतो की, काय हे एखाद्या भिकाऱ्यासारखं (प्रत्यक्षात भिकाऱ्याचं नव्हे; ते तर खूपच भयानक असणार)  आयुष्य आपल्या वाट्याला येतं असतं कधी कधी. आरही नाही नि पारही नाही...मध्येच कुठंतरी लटकवणारं. प्रत्येक गोष्टीत वंचना ! मनासारखं काहीच नाही. सगळीच अगतिकता, हतबलता. मग त्याच मनोवस्थेत मनातील त्या `भिकाऱ्या`संदर्भात विचार सुरू झाले आणि एक विचार असाही मनात चमकून गेला की, खरोखरच आपण जणू काही रस्त्याच्या कडेला असलेल्या भिकाऱ्याच्याच जागी आहोत...त्याच `भिकाऱ्या`चे मन मी कवितेतून [ `मांडला गेलो इथे मी ऐन गर्दीच्या ठिकाणी...` हीही कविता www.manogat.com वर वाचायला मिळेल तुम्हाला :) ] मांडण्याचा प्रयत्न केला होता मागे...
बाकी गैरसमज नसावेत.

- अजिबातच गैरसमज नाही. :) काळजी नसावी.  विचारण्यामागील हेतू साफ, स्वच्छ असेल (आणि तो हेतू ओळखता येतो !!!) तर गैरसमज होऊच शकत नाही. उलट मीच तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो, प्रतिसादाबद्दल.
भेटू या !
- प्रदीप कुलकर्णी

प्रदीपभाई?

मान गये. काय प्रतिसाद आहे! अप्रतिम! खरच! मान गये!

आपले सगळे मुद्दे पटले.

आपण मराठी गझल या क्षेत्रातील एक महत्वाचा मैलाचा दगड आहात हे मी सांगू शकतो.

आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

 

प्रिय मित्र प्रदीप,
खरे तर आपला प्रतिसाद वाचून मीच अंतर्मुख झालो आहे.
आपण खरच खूप विचार करता , एक गझल करताना!
मित्रांनो,
हा एक श्रेष्ठ असा गूण आहे जो खरे तर सर्वांनी आत्मसात केला पाहिजे.
म्हणजे, एक रसिक म्हणुन मी उर्दू शायरांच्या गझलांना ज्या प्रकारे बघतो त्यापेक्षा प्रदीपचे गझल रचतानाचे विचार मला खूप उदार मनोवृत्तीचे व गंभीर वाटतात.

झरायला, मरायला आणि सरायला हे शेर आवडले!!

निघू चला साचलेपणाच्या पलीकडे आता...
चला कपारीत डोंगराच्या झरायला जाऊ !

तसेच

तिथे शहाणे बरेच होते करायला चर्चा...
उगीच  वेडा तिथे कशाला ठरायला जाऊ ?