पुन्हा "भेट चोरटी.."
Posted by ज्ञानेश. on Saturday, 18 October 2008
====================
भेट चोरटी पुन्हा जहाल होत जाउदे,
आजही खुशाल गाल लाल होत जाउदे...
चंद्र, सूर्य, तारकांस मान झुंबरे इथे
झोपडीस आपल्या महाल होत जाउदे..
धारदार शब्द चार आरपार होऊ दे,
लेखणीसही कधी 'मशाल' होत जाउदे !
दात सुस्थितीत अन् चणे समोर ठेवले,
ईश्वरा ! कधी अशी कमाल होत जाउदे...
कोपरा धरून थांबलीत स्वप्न चोरटी,
आणुनी समोर ती हलाल होत जाउदे...
ऐसपैस राहतील संकुचीत माणसे,
तू मनास एवढे विशाल होत जाउदे..
देत राहतो तुला मरेपर्यंत उत्तरे..
जीवना, असेच तू सवाल होत जाउदे !!
===================
गझल:
प्रतिसाद
भूषण कटककर
सोम, 20/10/2008 - 13:40
Permalink
हाआआआआआ!
ज्ञानेश,
उत्तम! आधीच्या चोरट्या भेटीपेक्षा फारच सुंदर.
दात सुस्थितीत अन् चणे समोर ठेवले,
ईश्वरा ! कधी अशी कमाल होत जाउदे...
कोपरा धरून थांबलीत स्वप्न चोरटी,
आणुनी समोर ती हलाल होत जाउदे...
ऐसपैस राहतील संकुचीत माणसे,
तू मनास एवढे विशाल होत जाउदे..
देत राहतो तुला मरेपर्यंत उत्तरे..
जीवना, असेच तू सवाल होत जाउदे !!
हे चारही शेर फर्स्टक्लास!
तिलकधारीकाका
सोम, 20/10/2008 - 14:09
Permalink
गप्प.
प्रिय मित्र ज्ञानेश,
ही गझल आहे. पण ही गझल वाचुन मनात एक विचार आला. कदाचित प्रदीप, संतोष किंवा चित्तरंजन त्या विचारावर योग्य ते मतप्रदर्शन करू शकतील.
अशा स्वरुपाचे खयाल गझलेत मांडण्यासाठी किंवा कुठलेही विचार गझलेत मांडण्यासाठी जे वृत्त तू निवडले आहेस ते वृत्त मला गझलेस फारसे योग्य वाटत नाही. ठेक्यात ही गझल म्हणताना एक विशिष्ट प्रकारचा भास होतो ( ऐकणार्याला ) की ही एक कविता असावी. पण मला येईल तो अनुभव सर्वांना येईल असेही नाही आणि माझे मत योग्य असेल असेही नाही.
आणि मी माझी मते मांडुन ती योग्य आहेत किंवा नाही हे माहीत नाही असे म्हणणे म्हणजे नुसताच आव आणण्यासार्...असो. मी गप्प आहे.
[प्रतिसाद सपादित]
चांदणी लाड.
मंगळ, 21/10/2008 - 11:05
Permalink
विशाल ..
दात सुस्थितीत अन् चणे समोर ठेवले,
ईश्वरा ! कधी अशी कमाल होत जाउदे...
ऐसपैस राहतील संकुचीत माणसे,
तू मनास एवढे विशाल होत जाउदे.
देत राहतो तुला मरेपर्यंत उत्तरे..
जीवना, असेच तू सवाल होत जाउदे !!
वाह!! अप्रतिम शेर...
मानस६
मंगळ, 21/10/2008 - 20:24
Permalink
मतला..
मतला, मक्ता खास
-मानस६
गंभीर समीक्षक
बुध, 22/10/2008 - 19:26
Permalink
समीक्षा.
भेट चोरटी पुन्हा जहाल होत जाउदे,
आजही खुशाल गाल लाल होत जाउदे...
या शेराचा एकंदर गझलेशी संबध जोडणे कठीण जाते. त्यातही फक्त हा शेर पाहिला तर जहाल, आजही अन लाल या शब्दांचे प्रयोजन फारसे वाटत नाही. म्हणजे चोरटी भेट जहाल होणे ( मिसळ किंवा तांबडा रस्सा जसा असतो तसा ) म्हणजे नेमकी कशी होणे? चटकदार असा अर्थ अभिप्रेत असावा. खुशाल हा शब्द 'आजही' या शब्दानंतर येणे म्हणजे सारख्या सारख्या चोरट्या व जहाल भेटी होतात असे वाटते. बर गाल लाल होणे हे लज्जेचे निदर्शक आहे असे मानले तर 'तुला सतत लाज वाटत राहुदेत' असा अर्थ होतो. म्हणजे चोरून भेटुन पुन्हा झाले काहीच नसावे व नुसतेच जहाल वाटावे असे काहीतरी.
चंद्र, सूर्य, तारकांस मान झुंबरे इथे
झोपडीस आपल्या महाल होत जाउदे..
ही द्विपदी चांगली आहे. यातही इथे या शब्दाचे प्रयोजन समजले नाही. 'आपल्या' या शब्दातून कवी हे कुणालातरी किंवा स्वतःलाच सांगत असावा असे वाटते. होत जाउदे ही रदीफ घेतल्यामुळे झोपडीस महाल व्हावे लागत आहे असे वाटते. उदा: ' आहे' ही रदीफ असती तर माझी झोपडी महाल आहे असे म्हणावे लागले असते.
धारदार शब्द चार आरपार होऊ दे,
लेखणीसही कधी 'मशाल' होत जाउदे !
याही शेरात आरपारचा संदर्भ समजत नाही. कुणाच्या आरपार? वाचणार्याच्या असेल तर कवी हे सांगतोय कुणाला ते समजत नाही. गझलकारांना सांगत असेल तर तसे भासत नाही. स्वतःला सांगत असेल तर काही हरकत नाही. काफियामुळे मशाल हा शब्द घ्यावा लागला असावा. वास्तविक पाहता आरपार मशाली जात नाहीत, सुरे वगैरे जातात.
दात सुस्थितीत अन् चणे समोर ठेवले,
ईश्वरा ! कधी अशी कमाल होत जाउदे...
उत्तम शेर. सर्व शब्द चपखल आहेत.
कोपरा धरून थांबलीत स्वप्न चोरटी,
आणुनी समोर ती हलाल होत जाउदे...
परत तेच! स्वप्न हलाल होणे म्हणजे नेमके काय होणे? का हलाल करायची? ती चोरटी का आहेत? बर ही इच्छा व्यक्त करणे आहे की कुणालातरी दिलेली सूचना आहे ते कळत नाही.
ऐसपैस राहतील संकुचीत माणसे,
तू मनास एवढे विशाल होत जाउदे..
उत्तम शेर! यात 'तू' म्हणजे कोण? वाचक? तसे असेल तर चांगले आहेच, पण स्वगत असले तरी चांगलेच आहे.
देत राहतो तुला मरेपर्यंत उत्तरे..
जीवना, असेच तू सवाल होत जाउदे !!
पर्यंत हा शब्द वृत्तात बसत नाही. तिन्हीत्रिकाळ हा शब्द बसला असता. या शेरात होत जाउदे ही रदीफ अगदी नेमकी बसली आहे.
एकंदर गझल 'रचणार्याला अडचणीत आणणारी' पण उत्कृष्टपणे निभावलेली! आशयाच्या दृष्टीने साधारण!
१०० पैकी ३८.
निरज कुलकर्णी
गुरु, 23/10/2008 - 01:38
Permalink
अफलातून!
अफलातून गझल!
विशेषतः -
दात सुस्थितीत अन् चणे समोर ठेवले,
ईश्वरा ! कधी अशी कमाल होत जाउदे...
कोपरा धरून थांबलीत स्वप्न चोरटी,
आणुनी समोर ती हलाल होत जाउदे...
देत राहतो तुला मरेपर्यंत उत्तरे..
जीवना, असेच तू सवाल होत जाउदे !!
हे तीन शेर फारच आवडले! पुढच्या गझलसाठी शुभेच्छा!!
ज्ञानेश.
गुरु, 23/10/2008 - 11:52
Permalink
आभार.
@भुषणजी, तिलकधारी, निशा, मानस, नीरज.... सर्वांचे आभार !
ज्ञानेश.
गुरु, 23/10/2008 - 12:44
Permalink
आदरणीय गंभीर समीक्षक,
सर्वप्रथम आपण माझी गझल एवढ्या बारकाईने वाचल्याबद्दल तुमचे आभार मानतो. तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो आहे-
१)मतला- ही गझल माझ्या आधीच्याच 'भेट चोरटी' या गझलेचे continuation आहे. मूळ मतला असा होता-
आज तू खुशाल गाल लाल होत जाउदे
भेट चोरटी जरा 'जहाल ' होत जाउदे..
ही गझल इथेच पोस्ट केलेली असल्याने, ती सर्वांनी वाचली आहे असे गृहीत धरून मी मतल्यात जरा बदल केला. त्यामुळे 'आजही' आणि 'पुन्हा' हे शब्द त्यात आले आहेत. अर्थात, हीच गझल पहिल्यांदा वाचली तर हा शेर कळणार नाही, हे मान्य ! (आणि हो, गाल लाल होण्याचे लज्जेशिवायही दुसरे कारण असतेच... ;)
२)चंद्र, सूर्य, तारकांस मान झुंबरे इथे
झोपडीस आपल्या महाल होत जाउदे..
हा शेर आपल्या सखीला उद्देशून आहे. आपल्या अभावग्रस्ततेचा बाऊ न करता, जे आहे त्यातच आपण आनंद मानूया... असा काहीसा अर्थ मला त्यातून अपेक्षित होता. 'इथे' या शब्दाचेही प्रयोजन तेच.
३)धारदार शब्द चार आरपार होऊ दे,
लेखणीसही कधी 'मशाल' होत जाउदे !
यात 'आरपार' म्हणजे वाचणा-याच्या आरपार असे अभिप्रेत आहे. लिहीणा-या (गझल किंवा इतर काहीही) कुणालाही उद्देशून हा शेर आहे. 'मशाल' आरपार जात नाही, हे खरे आहे. यामुळे तो शब्द चपखल बसत नाही. ती फक्त काफिया ची सोय आहे.
४)कोपरा धरून थांबलीत स्वप्न चोरटी,
आणुनी समोर ती हलाल होत जाउदे...
हा शेर माझ्या मते समजण्यास काहीच अडचण नसावी. (पुरेसा अपेक्षाभंग झाला आहे, दु:ख झाले आहे, तरी..) अजून काही स्वप्ने/इच्छा/आकांक्षा (मनाच्या) कोप-यात अंग चोरून उभीच आहेत, त्यांना समोर आणून 'हलाल' कर, मारून टाक असे कवी (स्वतःलाच) म्हणतो आहे. (जेणे करून परत स्वप्न भंग झाल्याचे दु:ख होणार नाही..)
५)ऐसपैस राहतील संकुचीत माणसे,
तू मनास एवढे विशाल होत जाउदे..
यातला 'तू' म्हणजे कोणीही.
६)देत राहतो तुला मरेपर्यंत उत्तरे..
जीवना, असेच तू सवाल होत जाउदे !!
यात 'पर्यंत' हा शब्द वृत्तात नाही? कृपया जाणकारांनी खुलासा करावा. ('तिन्हीत्रिकाळ' हा शब्द फारच 'अक्राळविक्राळ' आहे, एकंदर गझलेच्या प्रकृतीच्या मानाने. स्विकारू शकत नाही. क्षमस्व.)