समज
मी मनी राखून होतो तप्त गोळा..
पण जगाला भासलो मी फक्त भोळा
चित्र माझे काढुनी ते श्रेष्ठ झाले..
अन् पुन्हा तो फिरविला त्यांनीच बोळा
ते जटायूचे स्मरण करण्यास आले
ठेविला पंखांवरी माझ्याच डोळा
आठवे प्रीती कुणाला सांजवेळी..
नेमका तेंव्हा असे मी विसरभोळा
आसुडे पाठीवरी घेऊन आता..
अश्रु करती साजरा हा बैलपोळा
मास फुलवी चंद्रही जितक्या कलांनी
फुलव तू ही लागले जे वर्ष सोळा
टीप : काही दिवसांपूर्वीच तयार झालेली ही गझल काही कारणाने देऊ शकलो नव्हतो. केदारच्या गझलेने आठवण झाली.
गझल:
प्रतिसाद
श्रीनिवास (not verified)
शुक्र, 10/10/2008 - 08:34
Permalink
वेगळे
वेगळेच आहे.
आसुडे पाठीवरी घेऊन आता..
अश्रु करती साजरा हा बैलपोळा
तिलकधारीकाका
शुक्र, 10/10/2008 - 11:00
Permalink
असे करू नये.
अजय,
असे करू नये.
असे छान छान शेर करू नयेत. परत परत वाचत बसावे लागतात.
बोळा व विसरभोळा हे शेर छान आहेत.
फक्तः
१. मतल्यातील दोन वेळा आलेला मी टाळता येतो का बघ बरे?
२. बोळा व बैलपोळा मधील तो व हा टाळता येतात का बघ बरे?
महत्वाचे: 'सांजवेळी' हा शब्द ( विसरभोळा या शेरातील ) तू मात्र फार परिणामकारकरीत्या वापरलायस बर का? म्हणजे ताटात चटणी जिथे वाढतात तिथेच वाढली गेलीय!
केदारच्या गझलेतील पाचोळा व धांडोळा हे शब्द तू अलामतीमुळे घेऊ शकणार नाहीस हे खरे आहे. 'मराठमोळा' घेता येईल का बघ बरे?
आता ही गझल आहेच. हो की नाही? कारण मुख्यत्वेकरून मनोव्यापार आले. असे अनुभव बर्याच जणांना आलेही असतील, जसे जटायु, आपले चित्र काढून श्रेष्ठ झालेले आपल्यालाच नष्ट करतात वगैरे! लक्षात राहण्यासारखे मुद्दे!
भूषण कटककर
शुक्र, 10/10/2008 - 13:08
Permalink
श्री अजय
श्री अजय,
उत्तम गझल. विसरभोळा व मतला आवडला. लिहीत रहा.
चाहता-
समीर चव्हाण (not verified)
शुक्र, 10/10/2008 - 14:40
Permalink
चांगला शेर आहे
आसुडे पाठीवरी घेऊन आता..
अश्रु करती साजरा हा बैलपोळा
अजय अनंत जोशी
मंगळ, 14/10/2008 - 22:42
Permalink
धन्यवाद.
प्रतिसाद देणारे, न देणारे - सर्वांना मनापासून धन्यवाद.
आणखी काही कुणाला सुचल्यास कळवावे.
कलोअ चूभूद्याघ्या
तिलकधारीकाका
मंगळ, 14/10/2008 - 22:47
Permalink
गप्प.
कसे काय सुचवणार? गप्प नाही का केले मला?
ॐकार
गुरु, 16/10/2008 - 21:35
Permalink
जुळवाजुळव
ळाकारान्त शब्दांनी केलेली जुळवाजुळव उघडी पडते आहे. जुळवाजुळव होत नाही असे म्हणणारनाही, परंतु अख्खी गझलच जर जुळवाजुळव वाटू लागली तर त्यात स्वारस्य उरत नाही.
अजय अनंत जोशी
शुक्र, 17/10/2008 - 15:52
Permalink
जुळवाजुळव
प्रतिसादाबद्दल धन्यवाद ॐकार. पण आपला प्रतिसादही जुळवाजुळव केल्यासारखा वाटत आहे. असो. मला मतला तर असाच सुचला होता आणि दोन-तीन शेरही.
कधीतरी दूरध्वनीसाठीही जुळवाजुळव करू.
अजय अनंत जोशी : ९२२६८०७३१३, ९९२३८२०८४२ (पुणे)
कलोअ चूभूद्याघ्या