...केव्हातरी !


............................................
...केव्हातरी !
............................................


उगवणारा वाढतो अन् वाढणारा संपतो केव्हातरी !
खेळ हा चालू युगांपासून...का खोळंबतो केव्हा तरी ?


रोज मी कित्येकदा मन मारतो, संतापतो, कातावतो...
- आणि एकांतात माझ्याशीच मग मी तंडतो केव्हातरी !


फेड सारी बंधने; फेकून दे... अन् ये नभाखाली अता...
मेघ एखादा असा माथ्यावरी ओठंगतो केव्हातरी !


याच बाबीचे मला आश्चर्य वाटे का अताशा सारखे ?
रंग काळाही कसा अन् पांढराही... रंगतो केव्हातरी !


दाटते काहूर अन् साठून ते हृदयात माझ्या राहते...
सांजवेळी, कोरड्या रात्रीस मी ओथंबतो केव्हातरी !


ओरडावेसे कितीदा वाटते...ऐकून घेईना कुणी ...
मी मुका होऊन दुःखाने तुझ्या आक्रंदतो केव्हातरी !


ओळखू आला तुला हेतू...कधी शंका मनी डोकावते...
अन् तुझ्याशी बोलतां आवाज माझा कंपतो केव्हातरी !


तू कितीही घाल संबंधांस शर्तींची-अटींची कुंपणे...
शेवटी साधासुधा माणूस मी...उल्लंघतो केव्हातरी !


देव दगडाचा नि धातूचा असो की रक्त-मांसाचा असो...
पाय मातीचेच त्याचेही अखेरी...भंगतो केव्हातरी !!


- प्रदीप कुलकर्णी

गझल: 

प्रतिसाद

दुसरा  शब्दच  सुचत  नाही.
सर्वच शेर आवडले..

प्रदीप,
असे करू नये. सारख्या सारख्या अशा वाचनीय छान गझला करू नयेत. मग इतरांना काँप्लेक्स येऊ शकेल की नाही?
पण एक विचार मनात आला. ही बहर मुद्यांच्या मानाने मोठी वाटते. आपले मत जाणुन घ्यायला आवडेल.

बाण अंतर्मुख झाला. त्याअर्थी शेर परिणामकारक बाण असणार!

तिलकधारी,
नमस्कार...
ही बहर मुद्यांच्या मानाने मोठी वाटते. आपले मत जाणुन घ्यायला आवडेल.
- होय, तुमचे म्हणणे अगदी खरे आहे. मुद्दयांच्या मानाने हे वृत्त मोठे आहे...पण मोठे तरी किती ? तर आपल्या नेहमीच्याच `व्य़ोमगंगा`च्या शेवटी  केवळ  गुरू-लघू-गुरूची { -U -}जोड दिली, एवढेच !
पण सुचतानाच पहिली ओळ तशीच सुचली -
उगवणारा वाढतो अन् वाढणारा संपतो केव्हातरी....!
............................
आपल्या प्रतिसादाबद्दल मी मनापासून आभारी आहे...


ओरडावेसे कितीदा वाटते...ऐकून घेईना कुणी ...
मी मुका होऊन दुःखाने तुझ्या आक्रंदतो केव्हातरी !    पटले
तू कितीही घाल संबंधांस शर्तींची-अटींची कुंपणे...
शेवटी साधासुधा माणूस मी...उल्लंघतो केव्हातरी !    हे ही पटले
कलोअ चूभूद्याघ्या

मि. प्रदीप,
आपली ही गझल छानच आहे. विशेषतः ओथंबतो शेर आवडला.
शुभेच्छा!

ओळखू आला तुला हेतू...कधी शंका मनी डोकावते...
अन् तुझ्याशी बोलतां आवाज माझा कंपतो केव्हातरी !



देव दगडाचा नि धातूचा असो की रक्त-मांसाचा असो...
पाय मातीचेच त्याचेही अखेरी...भंगतो केव्हातरी !!


हे शेर आवडले.  बाकी शेर इतके आवडले नाहीत.