जत्रा

एका जत्रेत थोडयाशा गोंधळाने असंख्य लोक चिरडून मेले.
त्यानंतरची ही रचना...


जत्रा

निर्जीव देवतांच्या करतात येथ जत्रा
जातात जीव तरीही भरतात येथ जत्रा

ओझे परंपरांचे ठरतेय जीवघेणे
वेठीस बापुड्यांना धरतात येथ जत्रा

तो देव का दयाळू होई असा कठोर?
प्रश्नांसमोर असल्या हरतात येथ जत्रा

झाले ठिकाण जत्रा, चिंता आणि भयाचे
चिरडून सर्व श्रद्धा सरतात येथ जत्रा

आता पुढील वर्षी पुन्हा नवीन गर्दी
असले धडे कधी ना स्मरतात येथ जत्रा.


-अविनाश ओगले

गझल: 

प्रतिसाद

मला कविता खूप आवडली . खरच दर वर्षि हजारों लोक जत्रांमधे चिरडुन मरतात. तेव्हा त्यांचे निर्जिव देव त्यांना का वचवू  शकत नाहित. लोकानी ह्यावर विचार केला पाहिजे आणि खरा जिवंत देव ओळखून त्याची आराधना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे.
अविनाश

मित्रा,
असे करू नये. सगळी रचना छान चालवून शेवटच्या शेरात वृत्ताला फाटा देणे म्हणजे लग्नाला ६० वर्षे झाल्यावर मुलगा वकील झालाय व त्याच्या कारकीर्दीचा शुभारंभ व्हावा म्हणुन आईवडीलांनी घटस्फोट घेण्यासारखे आहे की नाही?
बाकी सामाजिक विषय घेतलास हे फार छान केलेस.

मी आपला साईटवरचे वातावरण खेळकर व आनंदी रहावे म्हणुन येतो. बर का? 
[प्रतिसाद संपादित]

बाण सामाजिक आहेत. सोडलेत चांगले. पण विशिष्ट परिस्थितीत परिणामकारक! जसे कवितांच्या स्पर्धा, दिवाळी अंक!

आता पुढील वर्षी पुन्हा नवीन गर्दी
असले धडे कधी ना स्मरतात येथ जत्रा.