एक कविता

येशील काय माझी होऊन एक कविता ..
देईल स्वप्न सारी बांधून एक कविता


तोडीत वॄक्ष होता कोणी तिथे कलंदर ..
पण त्या मुळांस होती पकडून एक कविता


मी घातली जराशी समजूत चांदण्यांची;
तेंव्हा क्षणांत गेली चमकून एक कविता


जेंव्हा कुण्या कवीला ठेवील जग उपाशी,
खाईल तेथ अपुली तोडून एक कविता


चंद्रास झाकले अन् सूर्यास झाकले पण ..
या चांदण्यास होती बिलगून एक कविता


गगनांत वीज असते, डोळ्यांत का नसावी?
लिहिलीच आसवांनी पेटून एक कविता


काळास बंध नाही, प्रतिभेस काळ नाही
होते जुन्या-नव्याला घुसळून एक कविता


काळे कुणीच नाही, गोरे कुणीच नाही
दे रंग जीवनाला ओतून एक कविता


....अपूर्ण

गझल: 

प्रतिसाद

काळास बंध नाही, प्रतिभेस काळ नाही
होते जुन्या-नव्याला घुसळून एक कविता
 

सर्वांना धन्यवाद.

काळास बंध नाही, प्रतिभेस काळ नाही
होते जुन्या-नव्याला घुसळून एक कविताव्वा

kalas bandh nahi..... ek kavita
he khoop aavadale changli kavita aahe. good

होते जुन्या-नव्याला घुसळून एक कविता
छान.
गगनांत वीज असते, डोळ्यांत का नसावी?
लिहिलीच आसवांनी पेटून एक कविता
काळे कुणीच नाही, गोरे कुणीच नाही
दे रंग जीवनाला ओतून एक कविता
हे ही छान.


गगनात वीज...हा अप्रतिम शेर आहे.
शेवटचे दोन शेरही चांगले. 

गगनांत वीज असते, डोळ्यांत का नसावी?
लिहिलीच आसवांनी पेटून एक कविता
सुरेख!

अजय,

एक कविता मध्ये एकच अक्षर लागोपाठ येत आहे.
..क.
यामुळे उच्चार कठीण होतात.
दैनंदिन जीवनातही असे होते, पण तिथे चालून जाते. कवितेत असे झाल्यास त्रास होतो.
शक्यतो अक्षर लागोपाठ येणे, टाळावे.
उदा. एक गाणे
यात दोन वेगळी अक्षरे आहेत.
क आणि ग. 
एक गाणे वा दुसरा एखादा रदीफ घेता येतो का पाहावे. अर्थातच, उर्वरीत गझल त्याप्रमाणे बदलावी लागेल.

माझ्याही एका ओळीत असे झाले आहे. मी तो दोष कसा दूर करता येईल, हे पाहतो आहे.


 

केदार?
असे करू नये. एकदा नीट ' क ' व 'ग' ही अक्षरे उच्चारून बघ बरे. स्वरयंत्राची जवळजवळ तीच हालचाल होते की नाही? म्हणजे 'क' व 'र' मधे जितका फरक आहे तितका 'ग' व 'क' मधे नाहीये की नाही? मग कवितेला गाणे हा पर्याय सुचवण्यापेक्षा रचना हा पर्याय बरा की नाही?
'क नंतर क' च्या ऐवजी 'क नंतर ग' म्हणजे आगीतून फुफाट्यात सारखे आहे की नाही?
गाणे, कविता व रचना यांत रचना व कविता जवळ जवळ उच्चारातही सारख्या वाटणार्‍या आहेत की नाही?
आता तुझ्या कुठल्या ओळीत असे संकट ओढवले होते ते सांगीतलेस तर त्याचेही सर्व शायर मिळून निवारण करतीलच.
मी आपला साईटवरचे वातावरण खेळकर व आनंदी रहावे म्हणुन येतो बर का?

सर्वांना (verified and not Verified) धन्यवाद.

केदार,
'एक कविता' म्हणावयास त्रास होतो आहे? काय माहित? मी तर अनेक ठिकाणी उत्तमपणे (न गाता) सादर केली आणि सर्वांना समजलीही. असो. अपना अपना खयाल है. धन्यवाद.
आणखी एक..
मा. चित्तरंजन भट यांनी सुचविलेला एक बदल मला चांगला वाटला.
देईल स्वप्न सारी ऐवजी
देईल सर्व स्वप्ने बांधून एक कविता
धन्यवाद.
कलोअ चूभूद्याघ्या


अजय,
काही मुद्दे
१. खूप नाही. किंचित् त्रास होतो.
२. आपल्याला तो त्रास होत नसेलही. केव्हातरी तो जाणवेल,  असे प्रामाणिकपणे वाटते.
३. कविता  हा शब्द ठेवल्याने खूप बिघडते, असे अजिबात नाही. आपल्याला तो शब्द ठेवावा, असे वाटत असेल, तर जरूर ठेवावा.
४. ग घेतला तरी स्वरयंत्राची निश्चितपणे क सारखीच हालचाल  होते. आपल्याकडे एक म्हण आहे, की आगीतून फुफाट्यात. एका संकटातून त्यापेक्षा मोठ्या संकटात जाणे. ग बाबत वाटते की, आपण फुफाट्यातून आगीकडे येतो. क पुन्हा येण्यापेक्षा ग बरा.
५. कविता आणि गाणे ऐवजी रचना शब्द घ्यावा, अशीही सूचना केवळ वृत्तात बसते म्हणून येऊ शकते. निर्णय अखेर आपलाच आहे. रचना शब्द ठेवून मी विचार करून पाहिला. 
    ...काय गझल झाली म्हणून सांगू ?
    बाकी,
६.  गगनात वीज असते..
       काळास बंध नाही..  हे दोन्ही शेर छान.
       

गगनांत वीज असते, डोळ्यांत का नसावी?
लिहिलीच आसवांनी पेटून एक कविता
अप्रतिम शेर!!