खेळ

माकडांचा खेळ करतो हा मदारी
अन् पुढे त्याचाच का होतो भिकारी ?


जीवनाचे मर्म जगती सांगण्याला
वेदनांची आजही वाजे तुतारी


सांत्वने करुनी जगाला धीर देता..
तोच का बनतो पुन्हा त्यांचा शिकारी ?


काय केले पाच वर्षे आसवांनी ..?
नाव ना बुडली, न ती लागे किनारी


माप घेऊनी चला काही मणांचे..
रोज पिकती तोलण्या अश्रू शिवारी


जाळण्या ग्रंथास कुठल्या हेच कारण..
की तुझ्या रक्तात मिसळो 'वेद' चारी

गझल: 

प्रतिसाद

माप घेऊनी चला काही मणांचे
रोज पिकती तोलण्या अश्रू शिवारी
हा शेर फार आवडला. आपली शैली वेगळीच आहे. 'रीड बिटवीन द लाईन्स' स्वरुपाची! चांगली गझल!

अच्छा लिखते है. मला पसंतीचा शेर
जीवनाचे मर्म जगती सांगण्याला
वेदनांची आजही वाजे तुतारी
काय केले पाच वर्षे आसवांनी ..?
नाव ना बुडली, न ती लागे किनारी
या साठी भूषणसाहेबांप्रमाणे 'रीड बिटवीन द लाईन्स'

माप घेऊनी चला काही मणांचे..
रोज पिकती तोलण्या अश्रू शिवारी
हे खरेच आहे. अनेक विचार छान शब्दबद्ध केले आहेत. शुभेच्छा.

माकडांचा खेळ करतो हा मदारी
अन् पुढे त्याचाच का होतो भिकारी ?
चांगलाय हा शेर! असा केला की आणखीन चांगला होईल.
माकडांचा खेळ करतो हा मदारी
माकडे श्रीमंत तो होतो भिकारी
काय चाललंय! ससे काय, माकडे काय! घेतला प्राणी, टाकला गझलेत!


वेदनांची आजही वाजे तुतारी

तुम्ही काय पाहिलेत मला माहित नाही. तुम्हाला मतल्यातील माकडे दिसली मग मदारीची परिस्थिती का नाही कळाली? तुम्ही जो शेर म्हणून सुचविला आहे तो मूळ कल्पनेलाच धक्का लावणारा आहे. सगळ्याच गोष्टी रूपकात्मक नसतात.
तुम्ही कधी माकडांचा खेळ रस्त्यावर पाहिला आहे का? मदारीला भेटला आहात का? एक माणूस म्हणून त्याच्याशी बोलला आहत का? मी भेटलोय म्हणून सांगतो. खेळ संपला की माकडांकरवी हा मदारी थाळी फिरवितो. काही लोक देतात तर काही थाळी समोर आली की पसार होतात. कष्ट करूनही सहजी मिळत नाही, भीक मागावी लागते. माणूसच माणसाला भिकारी बनवितो हा संदेश.

कलोअ चूभूद्याघ्या

भूषण...
आपला प्रतिसाद :
माप घेऊनी चला काही मणांचे
रोज पिकती तोलण्या अश्रू शिवारी
हा शेर फार आवडला.
याबद्दल मनापासून धन्यवाद.
आपला प्रतिसाद : 'रीड बिटवीन द लाईन्स' स्वरुपाची! चांगली गझल!
आपणही याचा विचार करता हे पाहून बरे वाटले. पण यातून गैरअर्थ कोणी काढू नये.

मी कुणावरही वैयक्तिक शेरेबाजी करीत नाही. तसेच आपल्या रोजच्या पाहण्यातील गोष्टी काव्यात येतातच. रामायणात राम येतो तसा रावणही येणारच.  पण यातून गैरअर्थ कोणी काढू नये.

कलोअ चूभूद्याघ्या

जीवनाचे मर्म जगती सांगण्याला
वेदनांची आजही वाजे तुतारी

माप घेऊनी चला काही मणांचे..
रोज पिकती तोलण्या अश्रू शिवारीव्वा!!!


मतला आणि अश्रू हे शेर फार आवडले!

सुचलेले बदल 
खेळ सारा दावतो आधी मदारी
शेवटी त्याचाच का होतो भिकारी ?

मर्म जगण्याचे जगाला सांगण्याला  
वेदनांची नेहमी वाजे तुतारी

अजय,
चर्चा गझलेवर झालेली चांगली.  
माझी विनंती अशी आहे की आपल्या तिसर्‍या, चौथ्या व सहाव्या शेरांचा अर्थ सांगावात व तो अर्थ त्या शब्दांतून कसा प्रकट होतो आहे ते स्पष्ट करावेत. हे फक्त गझलमुल्यांसाठी असून गैरसमज होऊ नयेत अशी विनंती.[प्रतिसाद संपादित]

जर रूपकात्मक घ्यायचे झाले तर मतल्यातील आणखी एक अर्थ... (मदारी उवाच)
प्रत्येक प्रौढ माणूस हा मदारीच असतो. आपल्या तालावर घरातील इतरांना वागायला लावतो. बालकावस्थेत सर्वच माकडाप्रमाणे असतात. म्हातारपणी मागवे लागते. आपण कोणावरतरी अवलंबून असतो म्हणून भिकारी.
कुणाला मानवेल कुणाला नाही. सरळसोट अर्थ घेतला तरी हरकत नाही. माणूसच माणसाला भिकारी बनवितो हा संदेश.

कलोअ चूभूद्याघ्या

श्री अजय,
आपण मदारी या शेराचा आता सांगीतलेला अर्थ फार सुंदर वाटला.