मीच राही एक देहाती इथे

केवढीही लाभुदे ख्याती इथे
होउनी जाशीलरे माती इथे


शाप, हेवा, राग, धोका,बोचणे
नांव यांना लाभले नाती इथे


धाप लागे मोजताना, एवढ्या
सागराचे शिंपले 'जाती' इथे


का बरे माझ्या मनाला खोदता?
काय आहे लागले हाती इथे?


लग्न उंटाचे असे साहित्य हे
भोवताली गाढवे गाती इथे


ती जरा लांबून जाते ते बरे
फार आगी बाळगे! वाती इथे


गंध आहे या जगासाठी तिचा
मी गुलाबाची धरे पाती इथे


शायरांच्या या महानगरीमधे
मीच राही एक देहाती इथे



 



 


 



 

गझल: 

प्रतिसाद

ती जरा लांबून जाते ते बरे
फार आगी बाळगे! वाती  इथे..
क्या  बात  है!


शायरांच्या या महानगरीमधे
मीच राही एक देहाती इथे...
मी  पण  आहे हो दुसरा...!!!

का बरे माझ्या मनाला खोदता?
काय आहे लागले हाती इथे?
गंध आहे या जगासाठी तिचा
मी गुलाबाची धरे पाती इथे
शायरांच्या या महानगरीमधे
मीच आहे एक देहाती इथे
व्वा!!

का बरे माझ्या मनाला खोदता?
काय आहे लागले हाती इथे?

वा! हा शेर फार आवडला.  'नाती'ही छान.

सागराचे शिंपले 'जाती' मधले जाती म्हणजे काय?  स्पष्ट व्हायला हवे. कदाचित व्याकरणदृष्ट्या चूक असावे असे वाटते आहे. चूक भूल द्यावी घ्यावी.

गालिबचा शेर आठवला--
गिला है शौक़ को दिल में भी तंगी-ए-जा का
गुहर में महव हुआ इज़्तिराब दर्या का

ह्या हृदयात किती तोकडी जागा ह्याचे प्रेमाला, आसक्तीला वैषम्य, तक्रार. एका मोत्यात समुद्राची अस्वस्थता, बेचैनी कैद झाली आहे.

कटककर,
वृत्तावर तुमची पकड आहे. तंत्र सापडले आहे. विचारही चांगले असतात.

खालील बदल कसे वाटतात, ते सांगा.
याहूनही अधिका चांगले शेर होऊ शकतात. मातब्बर मार्गदर्शन करू शकतील.

हे खरे की लाभते ख्याती इथे
शेवटी होणार तू माती इथे 
किंवा
हे खरे की लाभते ख्याती इथे
सत्य अंतिम-  शेवटी माती इथे
किंवा
लाभली आहे तुला ख्याती इथे
शेवटी होशील पण माती इथे

स्वार्थ, मत्सर, लोभ, हेवा, चौकशा
नाव यांना या जगी  नाती  इथे

तेवढ्या मिळतील मोत्यांच्या त-हा
शिंपल्यांच्या जेवढ्या जाती इथे
किंवा
चालण्याच्या निरनिराळ्या पध्दती
खेकड्यांच्या केवढय्ा जाती इथे
किंवा
चाल याची ही अशी, त्याची तशी
खेकड्यांच्या केवढ्या जाती इथे

या मनाला एवढे खोदूनही
काय, सांगा, लागते हाती इथे ?

ती जरा लांबून जाते, हे बरे
पेटती ठिणगीमुळे वाती इथे

केदार, चांगले बदल सुचवले आहेत. ह्या बदलांमुळे ओळी प्रवाही आणि सफाईदार वाटत आहेत.

केदार,
बदल आवडले. बराच वेळ दिल्याबद्दल व विचार केल्याबद्दल धन्यवाद.
भटसाहेब,
धन्यवाद. आपल्याला आठवलेला गालीबचा जो शेर आहे तो तर अप्रतिमच!
'जाती' मधे मला असे म्हणायचे आहे की आपल्याकडे ज्या विविध जाती आहेत, म्हणजे ब्राह्मण वगैरे, त्या इतक्या आहेत की माणसाला माणुस भेटताना आधी जातीचाच विचार करतो. अर्थात हल्ली तसे काहीच राहिलेले नाही, शहरात तरी. हा शेर आपला एक सामाजिक विषयावर केला एवढेच.
आपण आपला वेळ दिलात व उत्तेजन दिलेत त्याबद्दल धन्यवाद!

मला वाटते की कवीला ओळी अधिक प्रवाही हव्यात हे सुचवावे, बदल सुचवण्यात कधी कधी मूळ शेरापेक्षा सुचवलेला शेर चांगला होऊन बसतो नि  तो नवीन शेर आपल्या गझलेत घेणे गझलकाराला  अव्घड जाऊ शकते.
मला वाटते गझलकाराने या गोष्टींना वेळ दिला तर आपण वर जे काही केले ते तो ही करू शकेल कमी-जास्तचांगले. तसे नाही म्हटल ेतरी ते आवश्य्क असले तरी book keeping च आहे असे मला वाटते. आपले काही बदल चांगले आहेत
(उदा. या मनाला एवढे खोदूनही
काय, सांगा, लागते हाती इथे ?)
नाव यांना या जगी  नाती  इथे मधे  या जगी आणि इथे - असे redundant  आहे.
ंंंत्यापेक्षा मुळातले  नांव यांना लाभले नाती इथे हे अधिक चांगले वाटते, मला तरी.

सांगाती    हा एक काफिया सुचवतो.
आणखी एक शेर होऊन जाऊ दे.

धन्यवाद केदार,
हे बघ दोन शेर. कसे वाटले सांग!
मी मला भेटायचे ना टाळतो
पण कुणाची एवढी छाती इथे?
संपती संबंध सार्‍यांचे जिथे
गझल उरते एक सांगाती तिथे

 
 
 
 
 

व्याज जादा लाभते माझ्या मनी
या जरा उघडायला खाती इथे
दाह आखाती मनामध्ये अता
जी असे छाया, न आता ती इथे 

शेवटी होशील रे माती इथे.. कसे वाटेल?
'जाती' विषयी भट साहेबांशी सहमत...जातीच्या संख्यांना शिंपल्या ऐवजी दुसरी प्रतिमा असल्यास ..?
वाती चा शेर चांगला आहे
पाती फारसा कळला नाही..
-मानस६

धन्यवाद मानस६, आपल्या प्रतिसादाबद्दल व सूचनेबद्दल. जाती या विषयावर आता मी ही जरा वेगळा विचार करून बघतो, काही नवीन सुचतंय का ते!
कुणीतरी खैराती हा काफिया वापरून एक शेर करावा अशी विनंती.
मला माझ्या वकुबाप्रमाणे असे सुचेलः
आठवांचे पूर बागा झेलती
चुंबनांच्या होत खैराती इथे
 

आपण मला हनीफ सागरांच्या एका शेराची आठवण करून दिलीतः
सुना है वहा फूल आने लगे
चले अपने आसू ठिकाने लगे

धन्यवाद

समीरच्या हनीफच्या शेरामुळे व चितरंजनच्या गालिबच्या शेरामुळे बाणाला फार मजा आली.
ते दोन्ही अत्यंत अर्थपूर्ण बाण आहेत.
भूषण, तुझे बाण तसे बरे आहेत. पण आरामात सुटले पाहिजेत. आरामात ध्येयापाशी पोहोचले पाहिजेत. कष्ट न करता सहज सुलभ शेर सुचणे व त्यात नवीन अर्थ किंवा नवीन मांडणी असणे हे गझल रचण्यास अत्यंत आवश्यक! धर्मयुद्ध तर खेळायचे पण त्याच त्याच बाणात नावीन्य आले पाहिजे.
 

'बाण' भट्टांशी सहमत. चांगली सुदृढ चर्चा.

असे करू नये.
दोन तीनच शेर चांगले अन बाकी सगळे सामान्य असणे म्हणजे हिंदी पिक्चरमधल्या स्मगलरच्या पैशाच्या बॅगांसारखे वाटते की नाही? वरून नोटा अन आत कोरे कागद?
असे करू नाही. सर्व शेर छान असण्याकडे लक्ष द्यावे.
मी आपला साईटवरचे वातावरण खेळकर व आनंदी रहावे म्हणुन येतो. बर का?