अफवा
माझ्या तुझ्या कथेच्या उडती अजून अफवा
जातो जिथे तिथे मी येती फिरून अफवा
नाही तुक्या तुझीही गाथा तरून गेली
गेली बुडून पाने, आल्या तरून अफवा
त्यांचेच शब्द त्यांना लखलाभ होत गेले
ओठामधून ज्यांच्या गेल्या निघून अफवा
मी ऐकवू कशाला माझी खरी कहाणी
सार्या दिशादिशांना होत्या भरून अफवा
इतकाच जीवनाचा निष्कर्ष काढला मी
जगणेच सर्व माझे होते बनून अफवा
जेव्हा खरेपणा हा मी शब्धबध्द केला
टीकेमधून तेव्हा आल्या फुलून अफवा
अफवांमधेच आहे हा भूत काळ माझा
जगणे पुढे निघाले हाती धरून अफवा
- प्रसाद कुलकर्णी
पूर्व प्रसिद्धी - सकाळ कोल्हापूर २२/०७/१९९०
गझलांकित, २००४
गझल:
प्रतिसाद
भूषण कटककर
रवि, 14/09/2008 - 17:55
Permalink
२ & ५
दुसरा व पाचवा शेर छान!
ज्ञानेश.
सोम, 15/09/2008 - 09:59
Permalink
अप्रतिम!
सम्पुर्ण गझल आवडली. (तुमच्या गझलेला याहून वेगळा प्रतिसाद देता येत नाही.)
चित्तरंजन भट
मंगळ, 16/09/2008 - 00:01
Permalink
माझ्या तुझ्या कथेच्या उडती अजून अफवा
छान... अफवा हे अन्त्ययमक आवडले.
नाही तुक्या तुझीही गाथा तरून गेली
गेली बुडून पाने, आल्या तरून अफवा
वा!
अजय अनंत जोशी
मंगळ, 16/09/2008 - 17:14
Permalink
हे ...
इतकाच जीवनाचा निष्कर्ष काढला मी...
जगणेच सर्व माझे होते बनून अफवा
हे आवडले.