नशिबात पाहिजे ना
येण्यास पोहर्याला ,आडात पाहिजे ना
रे खोड जिंकण्याची, रक्तात पाहिजे ना
नाडा मला कितीही, तक्रार ना करी मी
वेडा कुणीतरी या, विश्वात पाहिजे ना
की ज्योतिषी कुणाच्या, दैवास काय जाणे
त्याचेच दैव त्याच्या, हातात पाहिजे ना
मदिरा खराब आहे ,कोणास सांगता रे?
की ऐकण्यास कोणी, शुद्धीत पाहिजे ना
गोडीस चुंबण्याच्या, हल्लीच जाणते ती
घेण्यामधील इच्छा, देण्यात पाहिजे ना
पापी जरी असे मी, हा देव गप्प आहे
जागा रिती जराशी, नरकात पाहिजे ना
कोणी मला विचारे ,आहेस तू कशाला
सांगे जिवंत कोणी ,तुमच्यात पाहिजे ना
विसरेल ती कशी रे, सांगा तुम्हीच मजला
विसरायला तिच्या ते, लक्षात पाहिजे ना
तो यायलाच माझा, मृत्यू तयार नाही
दुर्दैव हे तयाच्या, नशिबात पाहिजे ना
गझल:
प्रतिसाद
अजय अनंत जोशी
शनि, 13/09/2008 - 12:26
Permalink
नेहमीप्रमाणेच...
नेहमीप्रमाणेच... छान आहे. हा मिटर तुम्हाला छान जमतो हे अनेकांनी सांगितलेच आहे.
अजय अनंत जोशी
शुक्र, 03/10/2008 - 18:16
Permalink
नाडा
नाडा मला कितीही, तक्रार ना करी मी
वेडा कुणीतरी या, विश्वात पाहिजे ना
वरची ओळ पूर्ण समजत नाहिये.
बाकी उत्तमच आहे.
की ज्योतिषी कुणाच्या, दैवास काय जाणे
त्याचेच दैव त्याच्या, हातात पाहिजे ना
कोणी मला विचारे ,आहेस तू कशाला
सांगे जिवंत कोणी ,तुमच्यात पाहिजे ना
मस्तच.
पापी जरी असे मी, हा देव गप्प आहे
जागा रिती जराशी, नरकात पाहिजे ना
हे असे होईल का?
पापी जरी असे मी, का देव गप्प आहे?
जागा रिती जराशी, नरकात पाहिजे ना !
कलोअ चूभूद्याघ्या