तुझी आठवण
धगधगणारा एक निखारा तुझी आठवण
कधी फूल तर कधी शहारा तुझी आठवण
कसे तरावे कुठे बुडावे समजत नाही...
कधी भोवरा कधी किनारा तुझी आठवण
पाचोळ्यागत दिशाहीन मी उडत राहतो..
शिशिरामधला सुसाट वारा तुझी आठवण
सर्व अर्थ शब्दांचे जेथे धूसर होती..
मौनामधला असा इशारा तुझी आठवण
मरेपर्यंत ह्या कैदेतुन सुटका नाही..
श्वासांवरती कडा पहारा तुझी आठवण
रूपेश देशमुख.
अकोला.४४४००१.
मों. नं. : ९९२३०७५७४३
गझल:
प्रतिसाद
आजोबा (not verified)
बुध, 03/09/2008 - 20:14
Permalink
किती छान लिहितोस
रुपेश बेटा,
किती छान लिहितोस रे तू. भाषा अगदी ओघवती आहे गझलेत.
मतला तर किती जिवंत वाटतोय ?
-तुझे खूश झालेले आजोबा
मानस६
बुध, 03/09/2008 - 20:31
Permalink
धगधगणारा एक निखारा
धगधगणारा एक निखारा तुझी आठवण
कधी फूल तर कधी शहारा तुझी आठवण
कसे तरावे कुठे बुडावे समजत नाही...
कधी भोवरा कधी किनारा तुझी आठवण... सही शेर
-मानस६
चित्तरंजन भट
बुध, 03/09/2008 - 23:02
Permalink
कसे तरावे कुठे बुडावे समजत नाही...
कसे तरावे कुठे बुडावे समजत नाही...
कधी भोवरा कधी किनारा तुझी आठवण
वावाव्वा... फारफार आवडला हा शेर. रूपेश, अगदी चांगली सफाईदार गझल झाली आहे.
केदार पाटणकर
गुरु, 04/09/2008 - 10:31
Permalink
नव्या रदीफमुळे आकर्षक
रुपेश,
गझल छान आहे.
पारंपरिक कल्पना अाहेत पण नव्या रदीफमुळे रचना आकर्षक झाली आहे.
भूषण कटककर
गुरु, 04/09/2008 - 10:53
Permalink
बास......
बास...
अशी गझल पाहिजे. कसली जमलीय. एक एक शेर म्हणजे खल्लास!
ऐकवा राव आणखीन काहीतरी? चालू ठेवा.
भूषण कटककर
गुरु, 04/09/2008 - 11:00
Permalink
कळते.
सर्वात महत्वाचे म्हणजे या गझलेत काय अन कुणाला उद्देशून लिहिले आहे ते स्पष्ट आहे.
नाहीतर बर्याच वेळा कळतच नाही की लिहिलय काय अन कुणासाठी? एकदम तंत्रशुद्ध मात्र असते.
ही गझल वाचकाची मनस्थिती बदलवू शकते हे नक्की!
प्रदीप कुलकर्णी
गुरु, 04/09/2008 - 22:10
Permalink
कसदार गझल
रूपेश,
उत्तम गझल...फार फार आवडली... कसदार लिहिले आहेस. असाच लिहीत राहा. तुझ्या गझललेखनाला माझ्या मनापासून शुभेच्छा.
या `तुझी आठवण`ने मला माझ्याही `तुझी आठवण`ची आठवण करून दिली....! थेट १९९५ सालात नेले मला तुझ्या या गझलेने...एरवी `जरा पांढऱ्यावरती काळे` केलेल्या कागदांच्या अनेक गठ्ठ्यांमधील एक कपटा एवढाच अर्थ असलेली माझी ती गझल - मी अगदीच विसरून गेलो नसलो तरी - आजच्या पोटापाण्याच्या धबडग्यात ती काहीशी स्मरणाआड झाली होती खरी...
तुझ्या गझलेने तिचे पुनःस्मऱण करून दिले...धन्यवाद...आणि तुला पुन्हा एकवार शुभेच्छा !
..................................
...तुझी आठवण !
रिमझिम, रिमझिम, रिमझिम श्रावण...तुझी आठवण !
ऊन्ह कोवळे, सोनेरीपण...तुझी आठवण !
झाले आहे मन माझे हे अगदी हलके...
मला भासते ओझे मण मण...तुझी आठवण !
माझ्या साऱ्या आयुष्यावर तुझीच छाया...
आलेला क्षण, गेलेला क्षण...तुझी आठवणा !
उजाड माझ्या मन-माळावर सैरभैर ही...
हिंडत आहे अजून वणवण...तुझी आठवण !
तुझी आठवण छळते आहे कुठे, कशीही...
किणकिण कंकण, छुनछुन पैंजण...तुझी आठवण !
सांग मला तू सारे काही विसरायाला...
विसरू आता सांग कशी पण...तुझी आठवण ?
एवढेच मी मागत आहे माझ्यासाठी...
फक्त हवी मज तुझी आठवण...तुझी आठवण !!
- प्रदीप कुलकर्णी
१८ जुलै १९९५
भूषण कटककर
शुक्र, 05/09/2008 - 01:16
Permalink
च्यायला
ही प्रदीप कुलकर्णींची गझल तर आणखीनच बेहतर आहे. अशा गझला का नाही येत राव येथे?